Mumbai News : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चारीमुंड्या चित करीत महायुतीने घवघवीत यश मिळवले. त्यानंतर 5 डिसेंबरला देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार व देवेंद्र फडवणीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर महायुतीमध्ये खातेवाटप व पालकमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच पहावयास मिळाली. त्यामुळे महायुतीमधील अंतर्गत मतभेद नाराजी पाहता सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत नाही. त्यातच आता भाजपने मित्रपक्षाचे पालकमंत्री असलेल्या ठिकाणी संपर्कमंत्र्यांची समांतर यंत्रणा राबवण्याचा निर्णय घेतला असल्याने मित्र पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोटात गोळा आला आहे.
एकीकडे राज्यातील रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा विषय अद्याप रखडलेला आहे. त्यातच दुसरीकडे भाजपने (Bjp) जिल्हा संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर केली. विशेष म्हणजे भाजपच्या मंत्र्यांकडे पालकमंत्रिपद असलेल्या एकाही जिल्ह्यासाठी भाजपने जिल्हा संपर्क मंत्री दिलेला नाही.
भाजपने 17 जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्री जाहीर केले आहेत. या सगळ्याच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मित्रपक्षांचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे मित्रपक्षांकडे गेलेल्या जिल्ह्यांमध्ये भाजप आपली समांतर यंत्रणा निर्माण करतोय का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
भाजपने राज्यातील 17 जिल्ह्यांसाठी संपर्कमंत्री नुकतेच जाहीर केले आहेत. त्यासाठी 17 नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असलेल्यांना भाजपनं मित्रपक्षांचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांचं संपर्क मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. पक्ष आणि सरकारमध्ये समन्वय ठेवण्यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती भाजपकडून देण्यात आलेली आहे. पण मित्रपक्ष असलेल्या जिल्ह्यांमध्येच संपर्क मंत्र्यांची नियुक्ती का, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे (Shivsena) 9 जिल्ह्यात तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ जिल्ह्यात मंत्री आहेत. या जिल्ह्यात आता त्या ठिकाणी संपर्क मंत्रिपदाची नेमणूक केली आहे. त्यामुळे या ठिकाणी येत्या काळात जोरदार रस्सीखेच पहावयास मिळणार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी भाजपचे सर्वच बाबीवर लक्ष असणार आहे. त्यामुळे या निर्णयावरून महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे, बीडचे पालकमंत्रिपद आहे. भाजपने पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्याकडे संपर्क मंत्रिपद दिले आहे. तर बीडमध्ये हीच जबाबदारी पंकजा मुंडेंकडे दिलेली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे, मुंबई शहराचे पालकमंत्रिपद आहे. भाजपने ठाण्याची जबाबदारी गणेश नाईक आणि मुंबई शहरची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिली आहे. गणेश नाईक आधीच ठाण्यात जाऊन स्वबळाचा नारा देत असताना आता त्याठिकाणी नाईक यांच्या पाठीमागे भाजपने संपर्क मंत्रिपदाची ताकद उभी केली आहे.
गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील पालकमंत्री असताना याठिकाणी आता भाजपचे पंकज भोयर संपर्कमंत्री असणार आहेत तर बुलढाणा येथे राष्ट्रवादीचे मकरंद पाटील पालकमंत्री असताना आकाश फुंडकर हे संपर्कमंत्री असणार आहेत तर यवतमाळमध्ये शिवसेनेचे संजय राठोड पालकमंत्री असताना अशोक उईके संपर्कमंत्री असणार आहेत. वाशिममध्ये राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ पालकमंत्री आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील संपर्कमंत्री असणार आहेत. तर संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या संजय शिरसाट यांच्या सोबतीला अतुल सावे असणार आहेत.
बीडमध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या सोबतीला पंकजा मुंडे असणार आहेत तर धाराशिवमध्ये शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांच्या सोबत जयकुमार गोरे तर हिंगोलीमध्ये राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवळ यांच्या सॊबत मेघना बोर्डीकर असणार आहेत. जळगावमध्ये शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांच्यासोबत गिरीश महाजन असणार आहेत तर नंदूरबारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माणिकराव कोकाटे यांच्यासोबत जयकुमार रावल तर मुंबई शहरमध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंगलप्रभात लोढा तर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेसोबत गणेश नाईक तर रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे सॊबत आशिष शेलार तर रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांच्यासोबत निलेश राणे तर सातारामध्ये शिवसेनेच्या शंभूराज देसाईसोबत शिवेंद्रराजे भोसले तर कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या प्रकाश आबिटकरसोबत माधुरी मिसाळ असणार आहेत तर पुण्यामध्ये अजित पवार यांच्यासोबत चंद्रकांत पाटील असणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.