BJP Politics Sarkarnama
विश्लेषण

BJP Political News : काठावरच्या नेत्यांनो...; भाजपचे 'रेड कार्पेट' तयार आहे, संधी साधून घ्या!

अय्यूब कादरी

BJP News : तुमचे राजकीय वजन आहे, लोकांमध्ये पोहोच आहे... आणि तुम्हाला स्वतःलाही पक्ष सोडायचा असेल तर त्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. तुम्ही एखाद्या घोटाळ्यात अडकला असाल किंवा तसे आरोप जरी झाले असतील तर तुमची पात्रता अधिक असेल आणि संधीही अधिक असतील. एकदा का तुम्ही त्यांच्या आडोशाला गेलात की तुम्हाला निवांत झोप येईल. असा आडोसा देणारा पक्ष आहे गेल्या दहा वर्षांत देशाचे रूप बदलल्याचा, प्रचंड विकास केल्याचा डंका पिटणारा भाजप. इतका प्रचंड 'विकास' केलेला असतानाही या पक्षाला आपल्या मूळ, निष्ठावंत नेते आणि कार्यकर्त्यांवर विश्वास नाही का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भाजप (BJP) हा केंद्रात आणि राज्यातही सत्ताधारी आहे. प्रचंड शक्तिशाली, प्रादेशिक पक्ष फोडण्याची, संपवण्याची मोठी ताकद असलेल्या या पक्षाला प्रादेशिक पक्ष संपवायचेच आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. विरोधात असताना ते भ्रष्टाचाराचे आरोप करतील, चौकशांचा ससेमिरा मागे लावतील, मात्र भाजपमध्ये प्रवेश करताक्षणी हे सारे बंद होईल.

अन्य पक्षांतील नेत्यांना हेरून आपल्या पक्षात येण्यासाठी भाग पाडण्याची भाजपची चिकाटी, कला वाखाणण्याजोगी आहे. अन्य पक्षांतील नेत्यांचा प्रचंड भरणा झालेला असतानाही या पक्षाला नेत्यांची आणखी आयात करावयाची आहे, विरोधी पक्षांतील लोक भाजपमध्ये घ्यायचेच आहेत, असे चित्र आहे. याचे कारण काय असेल? स्वतःच्याच यंत्रणेवर नसलेला विश्वास किंवा जास्तीत जास्त जागा जिंकण्याची एकही संधी सोडायची नाही. मात्र, यामुळे मतदारांना अजीर्ण तर होणार नाही ना, याची चिंताही भाजपने करायला हवी.

पुण्यातील कसबा पेठेतील पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी इतिहास घडवला. त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. या मतदारसंघात गेली २८ वर्षे भाजपचा पराभव झाला नव्हता. सतत लोकांमध्ये राहणाऱ्या धंगेकर यांनी ही भाजपच्या पराभवाची किमया करून दाखवली. त्यांच्या विजयाची राज्यभरात चर्चा झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता धंगेकर पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. धंगेकरांच्या तोडीस तोड उमेदवार भाजपकडे नाही काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे, कारण भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी त्यांना भाजपमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. काकडे हे भाजपचे नसले तरी त्यांची त्या पक्षाशी जवळीक आहे. भाजपकडून काकडे यांचे विधान खोडून काढण्यात आल्याचे ऐकिवात नाही.

काही दिवसांपूर्वी धाराशिव येथे महायुतीच्या समन्वय समितीची बैठक झाली. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत केले जाईल, असे त्या मेळाव्यात सांगण्यात आले. महिनाभरात काही नेत्यांचे भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचेही सांगण्यात आले. महायुतीमध्ये भाजपसोबत आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गट आले आहेत. त्यामुळे भाजपची ताकद वाढणे अपेक्षित आहे. काही ठिकाणी अद्यापही अन्य पक्षांतील नेत्यांचे भाजपमध्ये प्रवेश सुरू आहेत. मात्र आणखी नेत्यांनी आपल्या पक्षात यावे, असे भाजप नेत्यांना का वाटत आहे? लोकांना हे कळत नाही का, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होऊ शकतो.

भाजपला राज्यात लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. या मोहिमेला भाजपने मिशन 45 असे नाव दिले आहे. ते साध्य करण्याच्या हेतून भाजपने शिवसेनेचा एक गट आपल्या सोबत घेत राज्यात सत्ता स्थापन केली. यानंतरही भाजपला आत्मविश्वास नसावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचाही एक सोबत घेण्यात आला. एवढे करूनही पुन्हा भाजपने आपले दरवाजे उघडे ठेवले आहेत.

काही नेते तर असे आहेत त्यांच्या मूळ पक्षात असताना भाजपने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. अशा नेत्यांनाही भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर काही नेत्यांविरुद्ध सुरू असलेल्या प्रकरणांची चौकशी थंड बस्त्यात गेली. या सोबत घेतलेल्या पक्षांचे, नेत्यांचे लोकसभेच्या निवडणुकीनंतर काय होणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT