BJP's Manifesto  Sarkarnama
विश्लेषण

BJP's Manifesto : भाजपचे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी अन्‌ विकसित महाराष्ट्राचे स्वप्न!

Assembly Election 2024 : महायुतीच्या पंचसूत्रीत अर्थातच या योजनेला मानाचे पहिले स्थान होते. पंधराशे रुपयांची ओवाळणी नव्या संकल्पपत्रात ‘भाऊराया’ने 2100 रुपयांवर नेली. भाजपच्या वेगळ्या संकल्पपत्रात पहिला उल्लेख आहे, तो या ओवाळणीचाच. बाकी केंद्रस्थानी आहे ती विकसित भारताच्या धर्तीवर विकसित महाराष्ट्र ही संकल्पना.

मृणालिनी नानिवडेकर.

Maharashtra Political News : महिला मतांची जादूची कांडी सध्या महायुतीला सापडली आहे. लोकसभेच्या निकालांपेक्षा महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल वेगळे लागतील, असे वाटू लागले ते मुख्यत्वे लाडकी बहीण योजनेमुळे. तिचा प्रतिसाद थक्क करणारा आहे. भाजपने मध्य प्रदेश, काँग्रेसने कर्नाटक व तेलंगण जिंकले ते महिलांना दिलेल्या ओवाळणीमुळे. महायुतीच्या पंचसूत्रीत अर्थातच या योजनेला मानाचे पहिले स्थान होते. पंधराशे रुपयांची ओवाळणी नव्या संकल्पपत्रात ‘भाऊराया’ने २१०० रुपयांवर नेली. भाजपच्या वेगळ्या संकल्पपत्रात पहिला उल्लेख आहे, तो या ओवाळणीचाच. बाकी केंद्रस्थानी आहे ती विकसित भारताच्या धर्तीवर विकसित महाराष्ट्र ही संकल्पना.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या प्रेरणेने भारत विकसित होणार, ही भाजपची धारणा. या धारणेच्या यशानेच भाजपच्या जागा कमी झाल्या तरी तो तिसऱ्यांदा सत्तेत आला. आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजप व महायुतीने हे राज्य विकसित करताना ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे स्वप्न पुन्हा एकवार दाखवले आहे. गेल्या वेळीही ते दाखवले होते. त्यातील अर्धे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. विकसित महाराष्ट्रासाठी शेती ओलिताखाली आणण्याचे स्वप्न पाहिले जाते. नारपार, नळगंगा, वैनगंगा, मराठवाडा वॉटर ग्रीडची अंमलबजावणी हे वैशिष्ट्य. गेल्या निवडणुकीतही सिंचन क्षमता वाढवण्यावर भर दिला गेला होता.

‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘मेक इन महाराष्ट्र’ करताना जिल्ह्याजिल्ह्यांत उद्यमींना सवलत, मका, बांबू इथेनॉलनिर्मितीची वाट दाखवली आहे. २५ लाख नवे रोजगार तयार करण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. फॉर्चून ५०० कंपन्यांशी करार करीत ओव्हरसीज प्लेसमेंट सेल सुरु होणार आहे. ‘एआय’चा वापर आणि फिनटेक ही भाजपची (BJP) कायम आग्रहस्थळे राहिली आहेत. ती संकल्पपत्रात आहेतच.

भाजपने राज्यभरात ५० अत्याधुनिक कला स्टुडिओ उभारण्याचा इरादा जाहीर केला आहे. युवकांना आकर्षित करताना स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पण निवड न झालेल्या युवाशक्तीसाठी प्लेसमेंटचे आश्वासन दिले गेले आहे. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रदेश. संकल्पपत्र नरेंद्र मोदींना किल्ले रायगडावर नतमस्तक होताना दाखवते. महाराजांचे गडकिल्ले संवर्धित करणे, जिल्ह्याच्या मुख्यालयात पोवाडे गायन सादर करणे, धार्मिक स्थळांचा विकास ही देखील घोषणा आहे. दिव्यदर्शन पर्यटन सर्किट सुरु केले जाणार आहे.

यंदा महिला, शेतकरी व युवकांवर भर

भाजपच्या २०१९च्या जाहीरनाम्यात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याचे आश्वासन दिले होते. भाजपचा २०२४ चा जाहीरनामा सादर झाला, तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत. यावेळी भर आहे तो महिला, शेतकरी व युवकांवर. लाडकी बहीण योजना महायुतीसाठी ‘गेमचेंजर’ मानली जाते आहे. १५०० रुपयांच्या मदतीने वातावरण बदलले आहे. खरे तर गेल्या वेळीही सिंचन सोयी निर्माण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ती कामे सुरु झाल्याचे या संकल्पपत्रादरम्यान सांगण्यात आले. जलयुक्त शिवार योजनेसारख्या माध्यमातून महाराष्ट्राला सिंचित करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येते आहे. त्यामुळे राज्यातील कृषी समस्या सोडवायला मदत होईल, असेही सांगण्यात येते आहे.

सर्व सुखाय, भाजप हिताय

महाराष्ट्रातील निवडणूक जिंकण्यासाठी महायुती आणि विशेषतः भाजप वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करीत आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’ पासून तर ‘एक है तो साथ है’ या घोषणा सुरु असताना संकल्पपत्र पुढची दिशा दाखवते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतला भारत प्रत्यक्षात उभे करणे ही संकल्प पत्राची मध्यवर्ती कल्पना. शेती, महिला, युवक या क्षेत्रांबरोबरच ‘मेक इन इंडिया’ योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात उत्पादनवाढीच्या योजना, नागरी क्षेत्रात सुविधा, युवकांचा विकसित महाराष्ट्रातला सहभाग आणि क्रीडा क्षेत्रात नवे प्रकल्प अशा वेगवेगळ्या विषयांचा आवाका संकल्पपत्रात घेतला आहे.

लाडकी बहीण योजनेची रक्कम 2100 रुपये करताना वृद्धांना मिळणारे पेन्शन पंधराशे झाले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर भाजपने त्यांच्या संकल्पपत्रात भर दिलेला दिसतो. महाराष्ट्रातील तरुणांची मते आपल्याकडे वळवण्यासाठी २५ लाख रोजगार निर्मितीचे आश्वासन भाजपने दिले आहे. प्रत्येकाला अन्न आणि निवारा हे आश्वासन देताना मोदी सरकारने मोफत धान्य योजना आणि पंतप्रधान आवास योजना अगोदरच जाहीर केल्याचे लक्षात घेत ही बांधणी केलेली दिसते.

वीज बिल ग्राहकांना दिलासा हा भाजपच्या संकल्प पत्रातून एक अत्यंत महत्वाचा विषय. सौरऊर्जेवर महाराष्ट्राने भर दिला आहे. अपारंपारिक उर्जास्रोतांमुळे वीज देयके काहींशी स्वस्त करणे भाजपला थोडेसे सोपे जावू शकेल. त्यामुळे तीस टक्के कपात करण्याची घोषणा केलेली दिसते. ग्रामीण भागातील शेतीला चांगले दिवस यावेत, यासाठी कृषी आणि संबंधित क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मिळणारी सन्मान योजना यासंदर्भात महत्वाची. केंद्र सरकार शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देते, महाराष्ट्र राज्य त्यात सहा हजारांची भर घालील. १२ हजारांच्यावर मदतनिधी जाईल. आता ही रक्कम थेट पंधरा हजारावर नेण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या नगदी मालाला भाव मिळावा, यासाठी भावांतरण योजनेवरही भर दिला गेला आहे. जलयुक्त शिवार अभियान तसेच मराठवाडा वॉटर गीड प्रकल्प नारपार-गिरणा आणि नळगंगा-वैनगंगा यांच्या जोडणीचे एक मोठे चित्र भाजपने जनतेसमोर रेखांकित केले. त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी संकल्पपत्रात मोठ्या घोषणा केल्या आहेत. डाळ उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रक्रिया केंद्र स्थापन करण्याची घोषणा आहे. ही मागच्या वेळीही करण्यात आली होती.

सहकारी चळवळ ही ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा कणा. काँग्रेस विचारसरणीच्या हाती असलेल्या या क्षेत्रात भाजपला प्रवेश करायचा आहे. त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँका आणि प्राथमिक सहकारी संस्थांच्या कार्यक्षमतेत वाढ करून पारदर्शकता आणण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

इज ऑफ डुइंग बिझनेस

शेतीपाठोपाठ भाजपने उद्योगांवरही या वेळेला विशेष लक्ष दिलेले दिसते. मेक इन इंडिया हे मोदींचे स्वप्न त्यावर भर देताना उद्यम सुलभता अधिनियम अर्थात इज ऑफ डूइंग बिझनेस महाराष्ट्रात लागू केले जातील, असे भाजपचे संकल्पपत्र सांगते. तरुणांना केंद्रिभूत मानून ज्या आखण्या झाल्या आहेत. त्यातच आयटी आणि ए आय विद्यापीठ तसेच फिनटेकवर महाराष्ट्रात भर दिला जाईल, असे नमूद केले गेले आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे फिनटेकवर प्रेम असून ते यासाठी सातत्याने काहीतरी घोषणा करत असतात. युवा आणि क्रीडा या विषयांवर मोदींनी दिलेला अतिरिक्त भर लक्षात घेता भाजपने संकल्प पत्रात यासाठी विशेष पान तयार केले आहे. महाराष्ट्रात ऑलिंपिक प्रशिक्षण अकादमीची स्थापना हे त्यातले महत्त्वाचे पाऊल!

क्रीडा, आरोग्यसेवा

खेलो इंडियाच्या धर्तीवर ‘खेळू महाराष्ट्र’ हे देखील एक नवे पाऊल उचलले गेले आहे. क्रीडा विज्ञान पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचेही सांगण्यात आले आहे. प्रत्येक गावामधला एक एक क्रीडा प्रकार विकसित व्हावा, यासाठी फुटबॉलची संस्कृती असलेल्या कोल्हापुरात जागतिक दर्जाचे स्टेडियम, नांदेडमध्ये हॉकी स्टेडियम अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. आरोग्य या पायाभूत सुविधेवर अधिक भर देण्यासाठी यावेळी सिकलसेल आणि थॅलेसेमियाचे उच्चाटन, महिला आणि बालकांसाठी उत्तम सेवा क्षयरोग मुक्त महाराष्ट्र आणि मोतीबिंदू निवारणासाठी योजना यावर भर देतानाच आयुर्वेद युनानी या गोष्टींनाही विशेष स्थान देण्यात आले आहे.

बळकट दळणवळण सुविधा

महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये हवाई वाहतूक व्यवस्था सुरू करणे, हे देखील एक उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मेट्रोचे जाळे विस्तारले जाईल यासाठीचे नियोजन आखण्यात आले आहे. ग्रामीण विकासासाठी आधुनिक काळातील डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि शिक्षण, स्थानिक प्रशासन आणि सामाजिक सक्षमीकरण या दृष्टीनेही आश्वासन देण्यात आली आहेत.

या संकल्पपत्रांचे प्रमुख सुधीर मुनगंटीवार हे होते. त्यांच्या खात्यातील वन आणि पर्यावरणावर विशेष भर देण्यात आला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे वनांचा विकास करणे, नद्या स्वच्छ करण्यासाठी अत्याधुनिक सफाई आणणे, ही महाराष्ट्रातील आधुनिकीकरणाची नवी बलस्थाने असल्याचे नमूद केले आहे.

मुंबई माझी लाडकी

मुंबई महानगरातील यश हा भाजप शिवसेना युतीला हवे आहे. या भागामध्ये अधिकाधिक सोयी उपलब्ध करून देणे, त्यासाठी योग्य ते प्रयत्न करण्यावर संकल्प पत्राने भर दिला आहे. नवीन गृहनिर्माण योजनेंतर्गत झोपडपट्टीमुक्त मुंबईचा पुन्हा एकदा गजर, वाहतूक सोपी व्हावी, यासाठी बेस्ट बसमध्ये नव्या बारा हजार गाड्यांना समावेश, मोकळ्या जागांचे संरक्षण, स्वच्छता कामगारांना मालकीचे घर तसेच उड्डाणपुलांची निर्मिती, मुंबईला जवळच्या शहरांशी जोडण्यासाठी वंदे मेट्रो सेवा आणि कोची केरळच्या धर्तीवर वॉटर मेट्रो सुरु करण्याच्या घोषणा याही या संकल्प पत्रात करण्यात आल्या आहेत. हा जाहीरनामा संकल्प पत्र म्हणून कसा लागू होतो, त्यासाठी भाजपला विजय मिळतो का हे बघणे आता महत्त्वाचे  ठरेल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT