Mahayuti News : महाराष्ट्रात सत्ता कुणाचीही असली तरी सर्वाधिक चर्चा ही गृहखात्याची असते.याच खात्यानं आजपर्यंत सहावेळी उपमुख्यमंत्री राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार एवढंच नव्हे महायुती सरकारच्या गेल्या टर्ममध्ये मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंनाही हुलकावणी दिली आहे. गेली दहा वर्षे त्यात महाविकास आघाडी सरकारचे अडीच वर्षे सोडले तर हे गृहमंत्रिपद देवेंद्र फडणवीसांनी स्वत:कडेच ठेवलं आहे.पण आता त्यांच्याकडे असलेल्या गृहखात्याची भुरळही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नाही तर त्यांच्याच भाजपमधील मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) पडल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
भाजपाचे नेते तथा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्रिपदाबाबत काही दिवसांपूर्वी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गृहखात्याची चर्चेत आलं आहे. विधानसभा निवडणुकीतील प्रचंड यशानंतर महायुतीत गृहखात्यावरुन पडद्यामागं बरंच नाट्य घडलं होतं. या खात्यावरुनच महायुती सरकारचा शपथविधी सोहळाही लांबणीवर पडल्याची चर्चा होती.
महाविकास आघाडी सरकार पाडून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत एकनाथ शिंदेंना बसवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र,महायुती सरकारच्या दुसर्या टर्ममध्ये मुख्यमंत्रीपद नाकारल्यानंतर एकनाथ शिंदे हे याच गृहखात्यासाठी ते प्रचंड आग्रही होते. मात्र,त्यांची ही मागणी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं फेटाळून लावली.यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा गृहखातं आपल्याकडे ठेवण्यात यश आलं.
महायुती सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तासगावमधील एका कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्रात माझं फक्त गृहखातंच राहिलं आहे.बाकी सगळी खाती माझी झाली,असं विधान करुन महायुतीत पुन्हा एकदा गृहखातं चर्चेत आणलं.त्यामुळे अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता भाजपच्या चंद्रकांत पाटलांचीही गृहखात्याची अपेक्षा असलेल्या नेत्यांच्या यादीत समावेश झाला आहे.
मी राज्य मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आहेत.सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आता केवळ गृह खात्याचा पदभार हाती येणे बाकी उरले असल्याचं पाटील यांनी बोलून दाखवलं आहे. सध्या राज्याचे गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने मंत्री पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात लगेच उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. तसेच चंद्रकांत पाटलांचं पोटातलं ओठावर आल्याचंही बोललं जात आहे.
महायुती सरकारमध्ये सामील होण्याआधीच काही दिवस तत्कालीन विरोधीपक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनीही आपल्याला आजपर्यंत गृहखातं मिळालं नसल्याची खंत व्यक्त केली होती.'राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ हे नेते गृहमंत्रीपदी विराजमान झाले, मात्र मला गृहमंत्रीपद मिळाले नाही,'असं सूचक विधान अजित पवार केलं होतं.
तसेच महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतरही अजित पवारांनी एकदा सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलताना थांबवत गृहखात्याची खंत व्यक्त केली होती. ओळीने आमचे तीन नेते गृहमंत्री झाले.पण,मलाच गृहमंत्रीपद मिळाले नाही,असं ते म्हणाले होते.
मुख्यमंत्र्यानंतर दुसऱ्या नंबरचं खातं हे गृहखातं समजलं जातं.मात्र,विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार हे जवळपास निश्चित झालं होतं. तर यापूर्वीच गृहखातं फडणवीसांनी स्वतःकडे ठेवलंय. त्यामुळे गृहखातं सोडण्यास भाजप तयार नाही. तर फडणवीसांनी गृहखातं स्वतःकडे ठेवल्यास अर्थखातं अजित पवार यांच्याकडे गेल्यानं अजित पवार नंबर दोनचे नेते होणार होते.त्यामुळे शिवसेना गृहखात्यासाठी आग्रही होते.
भाजपकडून एकनाथ शिंदेंना गृहखात्याऐवजी नगरविकास,महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची ऑफर देण्यात आली होती. पण गेल्या सरकारमध्ये गृहखातं उपमुख्यमंत्र्यांकडे होतं, म्हणून आताही तोच फॉर्म्युला हवा असल्याचं शिंदेंचा गृहखातं स्वत:कडे ठेवण्यासाठी आग्रह होता. पण अखेर अमित शाहांनी गृहखातं भाजपकडंच राहणार असल्याचं ठणकावत शिंदेंची मागणी धुडकावून लावली होती.त्यानंतर फडणवीसांकडेच हेच गृहखातं आलं.
मात्र,महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं आल्यानंतर महाराष्ट्रात संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरण,नागपूर हिंसाचार,नाशिक दंगल,यांसारख्या घटना घडल्या होत्या. तसेच दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे कायदा व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच विरोधकांकडून फडणवीसांच्या गृहखात्याच्या कारभारावरही टीकेची झोड उठवली जात आहे.
दरम्यान,भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच गृहखात्याविषयी सूचक विधान केलं आहे.या विधानाची आता जोरदार चर्चा रंगली आहे. चंद्रकांत पाटलांनी गृहमंत्री पदाबाबत असणारी अपेक्षा बोलून दाखवल्यामुळे त्यांची फडणवीसांच्या गृहखात्यावर डोळा आहे की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.