
Solapur, 24 April : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. माजी मंत्री देशमुख यांनी ‘अवघ्या तीन जागांसाठी भारतीय जनता पक्षात फूट पाडणाऱ्या सचिन कल्याणशेट्टी यांना काय मिळाले, असा सवाल जळजळीत सवाल विचारला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या (Solapur Bazar Samiti Election) निमित्ताने भारतीय जनता पक्षामध्ये फूट पडल्याचे दिसून येत आहे. अक्कलकोटचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांना सोबत घेऊन बाजार समितीसाठी पॅनेल उभे केले आहे.
कल्याणशेट्टी यांच्या विरोधात पक्षाचे माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी दंड थोपटले आहेत. त्यांना कट्टर विरोधक विजयकुमार देशमुख यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, काँग्रेसचे बाळासाहेब शेळके यांनीही देशमुखांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे बाजार समितीची निवडणूक रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे.
सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांबरोबर हातमिळवणी करणारे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना तीन जागा मिळाल्या आहेत. एकीकडे पॅनलचे नेतृत्व करत असताना मिळालेल्या तीन जागांवरून भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी कल्याणशेट्टी यांना टोला लगावला आहे.
सुभाष देशमुख म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या जीवावर भारतीय जनता पक्ष आणि आम्ही मोठे झाले आहोत. आगामी काळात कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, असे पक्षनेतृत्व सांगत आहे. मग पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस नेत्यांच्या पॅनलचे नेतृत्व करून काय साध्य केले.
काँग्रेसचे बाळासाहेब शेळके यांनीही कल्याणशेट्टींवर निशाणा साधला आहे. सर्वांना सोबत घेतले असते तर बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली असती. मात्र, कल्याणशेट्टी यांनी भाजपच्या दोन आमदारासह मतदारांनाही अंधारात ठेवून काँग्रेसच्या दोन नेत्यांशी चर्चा करून पॅनेल उभारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बळीराम साठे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यालाही त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे. सतत फसवणूक करणाऱ्या मंडळींशी कल्याणशेट्टी यांनी हातमिळवणी केली आहे, असा टोलाही शेळके यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.