Chhagan Bhujbal-Mahavikas Aghadi Leader Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Politics: 'दी बुक दॅट शॉक्ड बीजेपी!' भुजबळांच्या कथित दाव्यांनी विरोधकांच्या हाती कोलीत

Rajdeep Sardesai Book Controversy: भाजपने तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला, या आरोपाला पुष्टी मिळेल, असे छगन भुजबळ यांचे कथित दावे राजदीप सरदेसाई यांच्या ‘2024 दी इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया' या पुस्तकात आहेत. विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना या पुस्तकामुळे महाविकास आघाडीच्या हातात आयतेच कोलीत मिळाले असून, त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढणार आहेत.

अय्यूब कादरी

Mumbai News: निवडणुकीचा काळ राजकीय पक्षांसाठी अत्यंत संवेदनशील असतो. एखादी घडामोड निवडणुकीचे नॅरेटिव्ह पार बदलून टाकत असते. राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार भरात आलेला असताना सत्ताधारी महायुतीच्या समोर बाका प्रसंग उद्‌भवला आहे. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांचे पुस्तक यासाठी कारणीभूत ठरले आहे. या पुस्तकात मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या कथित दाव्यामुळे ईडीचे भूत पुन्हा एकदा भाजपच्या मानगुंटीवर येऊन बसले आहे.

'2024 दी इलेक्शन दॅड सरप्राइज्ड इंडिया,' हेच ते राजदीप सरदेसाई (Rajdeep Sardesai) यांचे पुस्तक, ज्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे. विरोधकांना शांत करण्यासाठी किंवा आपल्या पक्षात, आपल्या बाजूने करण्यासाठी भाजपकडून तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातो, हा आरोप जुनाच आहे. या पुस्तकामुळे हा आरोप आता आणखी गडद झाला आहे.

मी ओबीसी असल्यामुळेच माझ्यावर ईडीची कारवाई झाली, असे छगन भुजबळ यांनी म्हटल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. ईडीच्या तावडीतून सुटल्यानंतर माझा पुनर्जन्म झाला, असे मला वाटले. नवाब मलिक, अनिल देशमुख आदी नेतेही तुरुंगात गेले होते. ईडीपासून सुटका हवी असेल तर भाजपसोबत जावे लागेल, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची झाली होती, असेही भुजबळ यांनी म्हटल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.

अजितदादा पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार (Sunetra Pawar) यांच्यासह हसन मुश्रीफ, सुनील तटकरे यांचीही ईडीने चौकशी केली होती. त्यामुळे भाजपसोबत गेल्यास आपली ईडीपासून सुटका होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना वाटत होते. मात्र, शरद पवार यांना मान्य नव्हते, असेही भुजबळ यांनी म्हटल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. अर्थात, छगन भुजबळ यांनी याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. पुस्तकाच्या लेखकावर म्हणजे राजदीप सरदेसाई यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

भाजपकडून तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला, हा आरोप काही नवा नाही. मात्र भुजबळांच्या कथित दाव्यामुळे त्या आरोपाला पुष्टी मिळाली आहे. भाजपने तपासयंत्रणांचा गैरवापर केला, असा लोकांच्या मनातील समज आता आणखी घट्ट होणार आहे.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भाजपसाठी हा शुभसंकेत नाही. पुस्तकातील दावे समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. संजय राऊत, सुप्रिया सुळे यांनी भाजपला निशाण्यावर घेतले आहे. संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी नेहमीप्रमाणे खालच्या पातळीची भाषा वापरली आहे.

असे म्हटले जाते की, संकटे एकट्याने येत नाहीत, ते समूहाने येतात. आता या पुस्तकातील भुजबळ यांचे कथित दावे समोर आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांचा संबंध अर्बन नक्षलवादाशी जोडला. राहुल गांधी यांनी त्याचा संदर्भ थेट राज्यघटनेशी जोडत भाजप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सतत अपमान करत असल्याचा आरोप केला.

दोन दिवसांपूर्वीच भाजपने विधान परिषदेवर पाठवलेले वाचाळ आमदार सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्यावर मर्यादा सोडून टीका केली. खोत यांच्या प्रकरणापासून काहीही शिकणार नाही, असा चंग बांधलेल्या नीतेश राणे यांनी संजय राऊत यांच्याविषयी आज आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. या बाबींचा आपल्याला फायदा होणार की नुकसान, याची पर्वा भाजप नेतृत्वाला नाही, असे दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात छगन भुजबळ आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघावरून वाद झाला होता. नाशिकमधून निवडणूक लढवण्यासाठी भुजबळ इच्छुक होते. आपली उमेदवारी दिल्लीतून निश्चित झाल्याचा दावा त्यांनी केला होता. असे असले तरी एकनाथ शिंदे यांनी अखेरपर्यंत माघार घेतली नाही.

अगदी शेवटच्या टप्प्यात नाशिक मतदारसंघ शिवसेनेलाच सुटला आणि हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळाली. त्यावेळी भुजबळ नाराज झाले होते. ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार, हे निश्चित झाल्याचे सांगितले जात होते. मात्र तो योग जमून आला नाही. भुजबळांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विरोध करण्यात आला, असे सांगितले जात होते.

भुजबळ यांच्यामुळेच आपला पराभव झाला, असा दावा हेमंत गोडसे यांनी काही दिवसांपूर्वीच केला आहे. भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा अप्रत्यक्ष प्रचार केला होता, असा आरोपही गोडसे यांनी केला आहे. एकंदरीत, छगन भुजबळ हे काही दिवसांपासून नाराज असल्याचे दिसत आहेत. त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगाव मतदारसंघात बंडखोरी करत शिवसेनेचे उमेदवार आमदार सुहास कांदे यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे.

या सर्व घडामोडी पाहिल्या की छगन भुजबळ हे महाविकास आघाडीत परत येण्यासाठी इच्छुक आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पुस्तकातील कथित दाव्यांमुळे उडालेला धुराळा लवकर खाली बसणार नाही, हे निश्चित आहे. मतदानापर्यंत यावरून दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप सुरूच राहणार आहेत आणि त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT