Eknath shinde, Manish Kalje Sarkarnama
विश्लेषण

Shivsena News : मुख्यमंत्रीसाहेब, 'या' जिल्हाप्रमुखाची 'काळजी' घ्या, त्यांचा 'चिवट'पणा पक्षासाठी धोकादायक!

अय्यूब कादरी

Shivsena News : सोलापूरचे शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यावर गेल्या तीन महिन्यांत फसवणूक, धमकी, खंडणीचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्या अंगी इतका 'चिवट'पणा भिनला कसा, याचा शोध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार की आपल्या पक्षाची प्रतिमा अशी मलिन होत असलेली नुसतेच पाहत बसणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे पक्षवाढीसाठी, विकासकामे करण्यासाठी पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. आपल्या पक्षाची वाढ व्हावी, यासाठी ते पदाधिकाऱ्यांना मान देत आहेत, बळही देत आहेत, असे असताना काही पदाधिकाऱ्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या तीन महिन्यांत काळजे यांच्यावर तीन गुन्हे दाखल झाले आहेत. पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री शिंदे आता कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

शासनाकडून केल्या जाणाऱ्या विविध विकासकामांच्या दर्जाबाबत सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण होतात. या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे सातत्याने समोर आलेले आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, गैरसोयींना मुकाट्याने सामोरे जाण्याशिवाय नागरिकांसमोर पर्याय नसतो. आवाज उठलाच तर कारवाई होते, मात्र तोपर्यंत व्हायचे ते नुकसान होऊन गेलेले असते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुखाच्या कृत्यावरून हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कामे निकृष्ट का होतात, हे समोर आले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे एकीकडे पक्षवाढीसाठी झटत असताना त्यांच्याच जिल्हाप्रमुखाला अशी कृत्ये करण्याचे बळ कसे आणि कुठून मिळत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विकासकामांच्या बाबतीत सोलापूर महापालिकेची चर्चा नेहमीच नकारात्मक पद्धतीने होते. या शहरातील स्मार्ट सिटीच्या कामांबाबतही सातत्याने ओरड सुरू असते. पिण्याच्या पाण्याची समस्या तर सोलापूरकरांच्या पाठिशी कायम लागलेलीच असते. शहरातील विविध कामांचा दर्जा निकृष्ट असतो.

काम मिळवण्यापासून ते पूर्ण होईपर्यंत ठेकेदारांना किती कसरती करावी लागतात, हे शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख मनीष काळजे (Manish Kalje) यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर पुन्हा एकदा नागरिकांच्या लक्षात आले असेल. महापालिकेच्या ठेकेदाराला खंडणी मागितल्याचा गुन्हा काळजे यांच्यावर दाखल झाला आहे. या ठेकेदाराला काळजे यांनी महापालिकेतच मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

मनीष काळजे यांचे नाव यापूर्वीही वादात आलेले आहे. कार खरेदी करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणीही त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. काळजे यांनी चार लाख रुपये देऊन वाहन खरेदी केले होते. त्यातील एक लाख रुपये दिले, उर्वरित तीन लाख रुपये दिले नाहीत, अशी तक्रार त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आली होती. त्यावरूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एका हॉटेलच्या व्यवस्थापकालाही मारहाण केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला आहे. दुचाकी लावण्याच्या कारणावरून त्यांनी हॉटेलचालकाला त्यांनी हॉटेल पेटवून देण्याची धमकी दिली होती. त्याप्रकरणीही त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आता ठेकेदाराला खंडणी मागितल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आहे. प्रत्येकवेळी काळजे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मनीष काळजे यांनी मागे आरोग्य विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार केली होती. त्यावरून आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी चौकशी लावली होती.

गुन्हे दाखल होतील, अशी कामे करण्याचा 'चिवट'पणा मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या जिल्हाप्रमुखाच्या अंगी कसा आला, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. यावरूनच काळजे यांची पाठराखण केली जाते, त्यामुळे त्यांचे बळ, 'चिवट'पणा वाढत आहे, अशी चर्चा सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात सुरू असते. त्यातूनच महापालिकेच्या ठेकेदाराला खंडणी मागण्यापर्यंत त्यांची मजल गेली. अर्थात, काळजे यांनी एक स्वतंत्र पत्रक प्रसिद्धीस देऊन याचा इन्कार केला आहे.

ठेकेदार आकाश कानडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. एमआयडीसी परिसरात ड्रेनेज लाइनच्या कामाची निविदा जारी झाली आहे. मला 15 टक्के रक्कम द्यावी, अन्यथा निविदा परत घ्यावी, अशी धमकी काळजे यांनी दिली. याला विरोध केल्यानंतर काळजे यांनी आपल्याला महापालिका अधिकाऱ्यांच्या दालनातच मारहाण केली, असे कानडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून काळजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर दुसऱ्या फळीतील अनेक तरुणांना संधी मिळाली. अनेकांनी त्या संधीचे सोने केले. मनीष काळजे यांनाही अशीच संधी मिळाली, मात्र जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यानंतर काळजे आणि वाद असेच समीकरण तयार झाले. त्यांच्या वागण्याबाबत अधिकाऱ्यांमध्येही नाराजी असल्याचे सांगितले जाते.

अधिकारी, कर्मचाऱ्यांशी बोलताना ते मर्यादा पाळत नाहीत, असाही आक्षेप त्यांच्याबाबतीत आहे. सोलापुरात शिवसेना तशीही फारशी मजबूत नव्हती. फूट पडल्यानंतर शिवसेनेचे होती ती ताकदही विभागली गेली. आपल्या पक्षाला बळ देणे, पक्षाचा विस्तार करणे, जनमानसात पक्षाची चांगली प्रतिमा निर्माण करणे याची काळजी जिल्हाप्रमुखांनी घ्यायची असते. काळजे यांच्याबाबतीत मात्र तसे होताना दिसत नाही. जनमानसातही त्यांचे मजबूत स्थान नसल्याचे सांगितले जाते. त्यांच्या कृत्यांमुळे शिवसेनेची प्रतिमा मलिन होत आहे. असे असतानाही ते मुख्यमंत्री शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय बनले आहेत.

मतदार अत्यंत जागरूक झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्यय आला आहे. राजकीय पक्षांचे पदाधिकारी मुजोरी करत असले, लोकांचे प्रश्न सोडवत नसले तर लोक आता त्यांच्या तोंडावर बोलत नाहीत. मतदानाच्या माध्यमातून मात्र निश्चितपणे धक्का देतात. काळजे यांच्यासारखे शिवसेनेचे पदाधिकारी त्याची पर्वा करत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यांत त्यांच्यावर तीन गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत.

सत्ताधारी पक्षाच्या, मुख्यमंत्र्यांच्या आणि त्यांच्या एका 'ओएसडी'च्या अत्यंत जवळच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हाप्रमुखावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे किंवा खातरजमा न करता गुन्हा दाखल करण्याचा धोका पोलिस पत्करतील, असे वाटत नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

माझा संबंध नाही, गुन्हा खोटा : काळजे

ठेकेदाराला खंडणी मागितल्याचा मनीष काळजे यांनी इन्कार केला आहे. आकाश कानडे हे ब्लॅकलिस्टमध्ये असलेले ठेकेदार असून, त्यांना मी कधीही भेटलेलो नाही, असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी तेच माझ्या संपर्क कार्यालयात आले होते. एमआयडीसीतील काम मला मिळावे, अशी मागणी त्यांनी केली. यात माझी काही भूमिका नसते, निविदा प्रक्रियेत सहभाग घ्या, असे मी त्यांनी सांगितले.

दुसऱ्या दिवशी मी महापालिकेत गेलो होते. तेथे कानडे हे एका अधिकाऱ्याशी काम मिळण्याबाबत वाद घालत होते. काम मला द्या, अन्यथा मी मनीष काळजे यांना माझ्या फायनान्सरकरवी बघून घेतो, असे ते म्हणत होते. प्रक्रियेनुसार काम करा, असे सांगून मी निघून गेलो. माझा काही संबंध नसताना कानडे यांनी माझ्याविरोधात खोटी तक्रार दिली. सीसीटीव्ही फूटेज तपासले की हे लक्षात येईल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT