Param Bir Singh-Anil Deshmukh- Sachin Waze Sarkarnama
विश्लेषण

ईडीला दिलेला जबाब मागे घेण्यासाठी वाझेवर देशमुखांकडून दबाव!

सचिन वाझे याच्यावर तुरुंगात दबाव टाकला जात असून, त्याचे कपडे काढले जात आहेत.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शंभर कोटींची वुसली आणि ॲंटालिया स्फोटकप्रकरणी आरोप असलेला सचिन वाझे (Sachin Waze) याच्या समर्थनार्थ मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह (Param Bir Singh) पुढे आले आहेत. वाझे याने ईडीला दिलेला जबाब मागे घेण्यासाठी तुरुंगात त्याच्यावर दबाव टाकला जात आहे. त्याच्यावर रोज अत्याचार होत आहेत, असा खळबळजनक आरोप माजी पोलिस आयुक्त सिंह यांनी केला आहे. (Deshmukh pressures Waze to withdraw his statement to ED : Param Bir Singh)

माजी आयुक्त सिंह यांनी महाविकास आघाडीचे नेते आणि पोलिसांच्या विरोधात विविध आरोपांची माळच लावली आहे. सचिन वाझे याला मुंबई पोलिस दलात पुनर्नियुक्ती देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याला सूचना केली होती, असा जबाब परमवीर सिंह यांनी बुधवारी (ता. २ फेब्रुवारी) ईडीपुढे दिला होता. त्यानंतर त्यांनी आज (ता. ३ फेब्रुवारी) पोलिस प्रशासनालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी ईडीला दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे की, ठाणे गुन्हे शाखेचे डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांनी सचिन वाझे याची गुप्तभेट घेतली आहे. तसा उल्लेख त्यांनी ईडीला दिलेल्या पत्रात केला आहे. लक्ष्मीकांत पाटील यांनी चांदिवाल आयोगाच्या चौकशीदरम्यानही वाझे याची भेट घेतली असून ते वाझेवर दबाव टाकत आहेत, असा आरोप परमवीर सिंह यांनी केला आहे.

चांदीवाल आयोगाच्या चौकशीदरम्यान वाझे याच्यासह लक्ष्मीकांत पाटील यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही भेट घेतली आहे. ईडीला दिलेला जबाब मागे घेण्यासाठी पाटील यांनी वाझेवर दबाव टाकत आहेत, असेही परमवीर सिंह यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. तसेच, चांदीवाल आयोगाच्या सुनावणीदरम्यान देशमुख यांनी 30 नोव्हेंबर 2021 रोजी वाझे याची भेट घेतली होती, असा दावाही सिंह यांनी केला आहे.

सचिन वाझे याच्यावर तुरुंगात दबाव टाकला जात असून, त्याचे कपडे काढले जात आहेत. तसेच, त्यांच्यावर रोज अत्याचार होत असल्याचेही आपल्याला समजले आहे, असा आरोप खंडणीचे वेगवेगळे गुन्हे दाखल असलेले माजी आयुक्त परमवीर सिंह यांनी केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT