Devendra Fadnavis Sarkarnama
विश्लेषण

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या 'धर्मयुद्धा'ला मतदारांची साथ; सोयाबीन, कापूस, मराठा आरक्षणाचे मुद्दे निष्प्रभ

Devendra Fadnavis gains voter support in 'Dharmayuddha': महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. प्रचारात भाजपने ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला होता. त्याला यश आल्याचे दिसत आहे.

अय्यूब कादरी

Maharashtra Vidhan Sabha 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने शेवटच्या टप्प्यात ध्रुवीकरणावर भर दिला होता. महायुतीला त्याचा फायदा होताना दिसून येत आहे.

दुपारी 12 वाजता निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील नोंदींनुसार महायुती 221 जागांवर आघाडीवर होती. ही आघाडी निर्णायक मानली जात असून, यात फार मोठे बदल होण्याची शक्यता कमीच आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, शेतमालाला दराचे भाव आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे मुद्दे निकाली निघाले आहेत.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दुपारी 12 वाजता भाजप 127, शिवसेना 56 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार 38 जागांवर पुढे होते. महाविकास आघाडीचे उमेदवार केवळ 50 जागांवर पुढे होते. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 18, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार 15 जागांवर पुढे होते. इतर पक्षांचे आणि अपक्ष उमेदवार 17 ठिकाणी आघाडीवर होते.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. सहा महिन्यांनंतर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्रात प्रचारासाठी आले होते. त्यांनी कटेंगे तो बटेंगेचा नारा दिला होता. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार यांनी विरोध केला होता. ही शिवरायांची भूमी आहे, येथे कटेंगे तो बटेंगे चालणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनीही या घोषणेला विरोध केला होता. त्यांच्या नजरेसमोर विशेषतः धनंजय मुंडे यांचा परळी मतदारसंघ होता. या दोघांच्या विरोधानंतरही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगी आदित्यनाथ यांच्या त्या घोषणेचे समर्थन केले होते.

फडणवीस यांनी व्होट जिहादला उत्तर देण्यासाठी धर्मयुद्ध करण्याचे आवाहन मतदारांना केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्याचे उघड दिसत आहे. देवेंद्र फडणवीस हे 2014 मध्ये मुख्यमंत्री बनले होते. त्यावेळी त्यांची प्रतिमा वेगळी होती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मात्र त्यांचा कल ध्रुवीकरणाकडे झुकू लागला होता. या निवडणुकीत त्यांनी उघड उघड ध्रुवीकरणाची भाषा केली. त्याचा भाजपला फायदा होताना दिसत आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री होणार, हे जवळपास निश्चित आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते कशी भूमिका घेतात, यावर महाराष्ट्राची वाटचाल कशी राहील, हे स्पष्ट होणार आहे.

अजितदादा पवार यांनी कटेंगे तो बटेंगे या घोषणेला केलेला विरोध त्यांच्यासाठी फायद्याचा ठरला आहे. पंकजाताई मुंडे यांची भूमिकाही परळीसाठी पोषक ठरल्याचे दिसून येत आहे. महायुतीतील तीन नेत्यांनी एकाच मुद्द्यावर घेतलेली वेगवेगळी भूमिका त्यांच्या फायद्याची ठरली आहे. असे प्रसंग राजकारणात फार कमी वेळा दिसून येतात. या निवडणुकीत अंडरकरंट होता, मात्र तो महायुतीच्या विरोधात होता, असा अंदाज लावला जात होता. निकाल मात्र एकदम विरोधात येताना दिसत आहेत.

मराठावाडा आणि विदर्भात मिळून जवळपास 80 ते 90 मतदारसंघांत सोयाबीन आणि कापसाच्या पडलेल्या दराचा मुद्दा होता. हा मुद्दा प्रभावी ठरेल, अशी चिन्हे होती. मात्र तसे झाल्याचे दिसत नाही, सोयाबीनला 6000 रुपये हमीभाव देऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. त्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी महायुतीच्या पारड्यात वजन टाकल्याचे दिसत आहे. लाडकी बहीण योजनाही महायुतीच्या मदतीला धावून आल्याचे दिसत आहे. महिलांच्या वाढलेल्या मतदानांचा फायदा महायुतीला होणार, हा फडणवीस यांचा दावा खरा ठरला आहे.

मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठा समाजात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नाराजी असल्याचे चित्र निर्माण झाले होते. फडणवीस यांच्यामुळेच मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा सुपडा साफ करा, असे आवाहन त्यांनी केले होते, मात्र त्यांनी शेवटपर्यंत ही भूमिका कायम ठेवली नाही. ज्याला पाडायचे ते पाडा, ज्याला विजयी करायचे ते करा, असे आवाहन त्यांनी केले. त्यांची ही भूमिका महायुतीच्या पथ्यावर पडल्याचे दिसत आहे.

नागरिकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांपेक्षा ध्रुवीकरणाच्या मुद्द्यांना अधिक महत्व मिळाल्याचे आतापर्यंतच्या कलांवरून सिद्ध होत आहे. येणारे सरकार महायुतीचेच असणार, यात आता शंका राहिलेली नाही. भाजपचे नितेश राणे, अनिल बोंडे आदी नेत्यांनी एका विशिष्ट समाजाविरुद्ध टोकाची भूमिका घेतलेली आहे. निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनीही तीच लाइन पकडली होती. फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री बनल्यानंतर ते टोकाची भूमिका घेतात की अजितदादा पवार यांच्यामुळे संतुलन राखले जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT