Beed Politics : संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहेत. कराडच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यासह इतर पक्षांतील नेत्यांनीही मुंडेंना टार्गेट केले. ते कृषिमंत्री असताना कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोपही पुढे आला. त्यांच्या राजीनाम्याची मागणीने जोर धरला आणि अखेर काही दिवसांपूर्वी त्यांनी मंत्रिपद सोडलं. पण आता पुढं काय?, अशी चर्चा सुरू असतानाच धसांसह मुंडेंवर आरोप करणाऱ्या नेत्यांच्या कार्यकर्त्याचे व्हिडीओ बाहेर येऊ लागले आहेत. हे व्हिडीओ अचानक बाहेर कसे आले, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
देशमुख यांच्या हत्येने बीडमधील गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला. धस यांनी कराडचे कारनामे बाहेर काढण्यास सुरूवात केली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही त्यात उडी घेत सोशल मीडियात बंदुकधारी तरुणांचे फोटो-व्हिडीओ शेअर करायला सुरूवात केली. त्यापैकी काही मुंडेंचे कार्यकर्ते होते, असा दावाही त्यांच्याकडून सातत्याने केला जात होता. देशमुख हत्याप्रकरणात कराड आणि त्याचा टोळीला अटक झाल्यापासूनच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी वाढत गेली. पण त्याला मुंडेंनीही सावधपणे सामोरे जात ठाम भूमिका घेतली.
देशमुख यांच्या हत्याप्रकरणी जे कोणी दोषी असेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका ते सातत्याने मांडत राहिले. याप्रकरणाशी मुंडे यांचा थेट संबंध नाही. पोलिस तपासात कुठेही ते निष्पन्न झालेले नाही. पण विरोधकांकडून त्यांनाही सहआरोपी करण्याची मागणी आता होत होती. त्यातच देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो बाहेर आले आणि मुंडेंनी दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला. हा राजीनामा का दिला याची दोन कारणे त्यांनी सांगितली. एक म्हणजे हत्येच्या फोटोंमुळे व्यथित झालेले आणि दुसरे वैद्यकीय.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा आनंद धसांसह अनेकांना झाला. पण तो फार काळ टिकणारा नव्हता. काही तासांतच धसांचा कार्यकर्ता सतीश भोसलेचे व्हिडीओ व्हायरल झाले. त्याचा कारनामे समोर आले आणि धस बॅकफुटवर गेले. मुंडे यांच्या राजीनाम्यानंतरच हा व्हिडीओ कसा व्हायरल झाला, याची चर्चा सुरू झाली. त्यावरून उठलेले वादळ शांत होत नाही तोवरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी संबधित एकाचा मारहाणीचा व्हिडीओ समोर आला. त्यानंतर मंगळवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्याशी संबंधित एकाचा व्हिडीओही व्हायरल झाला.
एकामागोमाग एक तीन आमदारांशी संबंधित व्यक्तींचे व्हिडीओ अचानक सोशल मीडियात व्हायरल होणे, हा योगायोग नक्कीच नाही. हे कोण करतंय, का करतंय, याबाबत वेगवेगळ्या चर्चाही सोशल मीडियात रंगल्या आहेत. या आमदारांना अडचणीत आणण्यासाठी कोणती अदृश्य शक्ती काम करत आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. यापुढे आणखी कुणाचे व्हिडीओ, फोटो बाहेर येणार, हे दिसून येईलच. पण यामुळे कुणीच धुतल्या तांदळासारखे नाही, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर ते विधिमंडळ अधिवेशनातही दिसत नाहीत. प्रकृतीच्या कारणास्तव ते कामकाजात सहभागी झाले नसावेत. ते आमदार असताना पहिल्यांदाच ते अधिवेशनाच्या कामकाजात नाहीत. असो. तीन आमदारांशी संबंधित व्यक्तींचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. मुंडेंच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याने पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत आतापर्यंतच्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे.
अजय मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची नाहक बदनामी सुरू असल्याचे सांगत सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला. मुंडेंच्या राजीनाम्याने भविष्यातील बीडमधील राजकारण अधिकच तापणार आहे. अजय मुंडेंची यांची पत्रकार परिषद त्याचेच संकेत आहेत. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, पण ते परळीचे आमदार आहेत. त्यांचा पक्ष सत्तेत आहे. हे विसरून चालणार नाही. त्यामुळे मुंडेंकडून पुढील राजकीय (वाटचालीचा) प्लॅन निश्चितपणे तयार केला जात असावा किंवा तयारही असेल. नेमकं काय सुरू असेल मुंडेंच्या मनात?, याचे उत्तर बीडमधील राजकीय घडामोडींवरून मिळतच राहील...
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.