Maharashtra Political News : रस्त्याच्या कडेला वस्तूंचा सेल लागला की विक्रेता त्याची माहिती देण्यासाठी जोरजोरात ओरडत असतो. विधानसभेची निवडणूक लागल्यापासून राजकीय पक्षांचे नेते असेच जोरजोरात ओरडत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रत्येकी तीन पक्ष सामावलेले आहेत. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या उमेदवारीवर पाणी फेरले गेले आहे. काही ठिकाणी मित्रपक्षांनीच बंडखोरी केली आहे.
लोकसभा निडणुकीत सांगली पॅटर्न गाजला होता. सांगली हा काँग्रेसचा पारपंरिक मतदारसंघ, मात्र महाविकास आघाडीत तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटला. मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, यासाठी नेत्यांनी दिल्लीपर्यंत धडक मारली, मात्र काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. त्यावेळेपासून सांगली पॅटर्न हा शब्द रूढ झाला आहे. विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीतही अनेक मतदारसंघांत हा पॅटर्न राबवण्याचा इशारा मित्रपक्ष एकमेकांना देत आहेत.
अनेक मतदारसंघांत महाविकास आघाडी आणि महायुतीतील (Mahayuti) मित्रपक्षांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 नोव्हेंबर आहे. बंडखोरी शमवण्यात वरिष्ठाांना किती प्रमाणात यश येते, हे त्यानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यानच्या काळात सांगली पॅटर्न, मावळ पॅटर्न करू अशी भाषा सुरू झालेली आहे. राज्यभरात परिणाम भोगावे लागतील, असे इशारेही मित्रपक्षांना दिले जात आहेत.
जनताच निवडणूक हाती घेणार, अशाही एका पॅटर्नची चर्चा लोकसभा निवडणुकीपासून सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधक कमकुवत दिसत होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यामुळे उद्धव ठाकरे, शरद पवार यांची कोंडी झाली होती. ती कोंडी फुटणारच नाही, असे सत्ताधाऱ्यांना वाटत होते. मात्र शरद पवार यांच्या डापवेचांनी महायुतीला घाम फोडला.
शरद पवार, उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती, प्रत्येक गावांत पोहोचलेली काँग्रेस आणि तरुण नेत्यांची फळी यामुळे महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या. तसाच, पॅटर्न जनता विधनसभा निवडणुकीतही राबवणार, असे महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत. कोल्हापूर उत्तरचा उमेदवार हा जनतेचा पॅटर्न आहे, असा दावा काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केला होता.
बहुतांश मतदारसंघांत बंडखोरी झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी आमदार राहुल मोटे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), रणजित पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) या दोघांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. तुळजापूर मतदारसंघात काँग्रेसने धीरज पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे तरुण नेते ऋषी मगर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जीवनराव गोरे, अशोक जगदाळे यांनीही अर्ज भरले आहेत. भाजपने आमदार राणाजगजतिसिंह पाटीला यांना उमेदवारी दिली असून, पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व्यंकट गुंड यांनीही उमेदवारी दाखल केली आहे.
धाराशिव कळंब मतदारसंघात शिवसेनेने अजित पिंगळे यांना उमेदवारी दिली आहे. अजित पिंगळे हे भाजपचे कळंब तालुकाध्यक्ष आहेत. उमेदवार आयात केल्यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांच्यासह शिवाजी कापसे, सुधीर पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आमदार कैलास पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. ते खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे चुलतबंधू आहेत. उमरगा-लोहारा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रवीण स्वामी यांना उमेदवारी दिली आहे. स्वामी यांना ऐनवेळी पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे नाराज झालेले निष्ठावंत विलास व्हटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कोल्हापूर, मावळसह विदर्भातील काही मतदारसंघांतही अशी समस्या निर्माण झाली आहे. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याच पक्षातील बापू भेगडे यांनी बंडखोरी केली.
बापू भेगडे यांना भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह सर्वच पक्षांनी पाठिंबा दिल्याचे आमदार शेळके सांगत आहेत. आपल्याला संपवण्यासाठी मावळ पॅटर्न राबवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. याचे परिणाम भाजपला राज्यभर भोगावे लागतील, अशा इशाराही त्यांनी दिला आहे. मावळमध्ये भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने ठेवला होता.
उत्तर कोल्हापूर मतदारसंघात जनात पॅटर्न राबवणार, असे काँग्रेसचे नेते सतेज पाटील म्हणाले होते. त्यानुसार राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, 27 नगरसेवकांनी लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यामुळे उमेदवार बदलण्यात आला. मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मधुरिमाराजे या माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी, तर खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या स्नुषा आहेत.
राजेश लाटकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघाच्या आमदार जयश्री जाधव यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. लाटकर यांना उमेदवारी देण्यास त्यांची काही हरकत नव्हती, असे सांगितले जात आहे. मात्र, मधुरिमाराजे यांना उमेदवारी दिल्यानंतर जयश्री जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे सतेज पाटील यांच्या जनता पॅटर्नचीही कसोटी लागणार आहे.
Edited By : Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.