Jayant Patil -Girish Mahajan-Eknath Khadse
Jayant Patil -Girish Mahajan-Eknath Khadse Sarkarnama
विश्लेषण

Jalgaon News : एकनाथ खडसेंमुळे ‘राष्ट्रवादी’ बळकट; म्हणूनच भाजप नेते अस्वस्थ : जयंत पाटलांनी सुनावले

कैलास शिंदे

जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला नव्हे; तर राष्ट्रवादी अधिक बळकट झाली आहे. तेच आता भारतीय जनता पक्षाला खुपतंय, त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना लगावला आहे. (Eknath Khadse makes 'NCP strong; That's BJP leaders are upset : Jayant Patil)

भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे हे राष्ट्रवादीत गेल्यामुळे त्यांच्या जिल्हा दूध संघ, जिल्हा बँकेमधील सत्ता गेली आहे. आता आगामी निवडणुकीतही त्यांचा पराभव होईल, असे मत व्यक्त केले होते. त्याबाबत प्रश्‍न विचारला असता, त्यावर जयंत पाटील यांनी खडसेंमुळे राष्ट्रवादी अधिक भक्कम झाल्याचे सांगितले.

जयंत पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षाला बळकटी मिळाली आहे. धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पक्षांतर्गत बेरीज वाढली आहे. समाजाचे अनेक प्रश्‍न त्यांनी सोडविले आहेत. विधान परिषदेतही राज्य सरकारची लक्तरे त्यांनी वेशीवर टांगली आहेत. ते भाजपला तोडीस तोड उत्तरे देत आहेत. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना उत्तरे देणेही कठीण झाले आहे.

एकनाथ खडसे यांच्यासारखा कणखर नेता पक्षातून गेल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातीलच नव्हे राज्यातील नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळेच भाजपचे नेते खडसे यांच्यामुळे पराभव झाल्याचे वक्तव्य करीत आहेत, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

जळगाव जिल्हा बॅंकेतील पराभवाबाबत पाटील यांचे भाष्य...

जळगाव जिल्हा बॅंकेतील पराभवाबाबत खडसे म्हणाले की, भारतीय जनता पक्षात अद्यापही विरोधकांना पराभव करण्याचे सामर्थ्य नाही. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच माणूस शोधावा लागतो. त्या शिवायही त्यांच्याकडे पर्याय राहिलेला नाही .

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय पवार यांना फोडून भाजप-शिवसेना शिंदे गटाने चेअमनपद बहाल केले. त्यावर बोलतांना जयंत पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षाला स्वबळावर विरोधकांना पराभूत करण्याचे सामर्थ्य नाही, त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पराभव करण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचा माणूस शोधावा लागतो, त्या शिवाय त्यांना कोणताही पर्याय नसतो, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT