Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज-उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यावरूनच सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात असतानाच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत काम केलेल्या व आता शिंदेंच्या शिवसेनेत असलेल्या माजी मंत्री गजानन कीर्तिकर यांनी मोठे विधान केले आहे.
कीर्तिकर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून त्यांच्या मनातील सल बोलून दाखवली. सध्याची एकनाथ शिंदेंची शिवसेना ही भाजपप्रणित बनल्याची खोचक टीका करतानाच त्यांनी घरचा आहेर दिला असल्याची चर्चा रंगली आहे. महायुतीतीलच एका ज्येष्ठ नेत्याने अशी भूमिका घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
बाळासाहेबांसोबत काम केलेला मी शिवसैनिक असून अडीच वर्षे एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत (Shivsena)आहे, पण आपल्याला कामाची संधी मिळाली नसल्याची खदखद कीर्तिकर यांनी बोलून दाखवली. त्यांच्या सोबत असताना एकनाथ शिंदेंनी आपल्या अनुभवाचा वापर करुन घेतला नसल्याची टीकेची तोफ कीर्तिकर यांनी डागली.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पुढे जाणारी शिवसेना आहे, असे वाटत होते, मात्र, सध्या तसे होताना दिसत नसल्याची टीका कीर्तिकर यांनी केली. त्यांनी टाकलेल्या बॉम्बने शिंदे सेनेची चिंता मात्र वाढली आहे. त्याचमुळे इतर पक्षातून मोठ्या संख्येने जात असलेल्या नेतेमंडळीच्या इनकमिंगला चाप बसण्याची शक्यता असून या बॉम्बमुळे पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) सोबत गेलेल्या सुजाता शिंगाडे या महिला नेत्याने चार दिवसापूर्वीच ठाकरे यांच्या सेनेत घरवापसी केली. याचवेळी शिंगाडे यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर सडकून टीका केली. त्यांनी शिंदे गटात जाणे ही माझी मोठी चूक होती, अशी मोठी कबुलीही दिली होती. शिंदेंच्या शिवसेनेत केवळ दिखावा सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्याठिकाणी चार-पाच महिने होते. पण शिंदेंच्या पक्षात ही मंडळी कोणत्या अमिषाला बळी पडून जाताहेत हे सांगता येत नाही, अशी टीका त्यांनी केली होती.
त्यातच दुसरीकडे माजी खासदार कीर्तिकर यांनी शिंदे शिवसेनेच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याला शिंगाडे यांनी केलेल्या विधानामुळे दुजोरा मिळत असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात खद्खद असल्याचे स्पष्ट होत आहे.
तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले आहे. ही फूट पडण्याच्या आधी शिवसेना व मनसे असे मतांचे विभाजन झाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडली त्यांच्यासोबत 50 आमदार व सहा खासदार आहेत. मात्र, त्यामुळे आता शिवसेनेचे त्रिभाजन झाले आहे. त्यामुळे येत्या काळात राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्यास ठाकरे ब्रँड म्हणून त्यांना जनाधार मिळेल.
बाळासाहेब ठाकरेंनाही त्याकाळी राज-उद्धव ठाकरेंनी एकत्रित यावे, असे वाटत होते. त्यामुळे हे दोन भाऊ एकत्र आले त्यांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण होणार आहे. पक्षात झालेल्या फोडाफोडीमुळे शिवसेनेतील गढूळ झालेले वातावरण पुन्हा पूर्ववत होईल, असा आशावाद बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेच्या झालेल्या विभाजनामुळे शिवसेनेचे मोठे नुकसान झाले आहे. एकनाथ शिंदे यांना भाजपसोबत लढायचे आहे, कारण शिंदेंची शिवसेना भाजप प्रणित आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस प्रणित आहे. आम्हाला भाजप प्रणित किंवा काँग्रेस प्रणित शिवसेनाच्याऐवजी आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना प्रमाण आहे. हे करण्याचा प्रयत्न करावा. मतदारही त्याच पद्धतीने विचार करतील. दोन बंधू एकत्र आल्यावर शिवसेनेचं गढूळ झालेलं वातावरण शुद्ध होईल, असे मत कीर्तिकर यांनी व्यक्त केले.
निवडणुका जिंकण्यासाठी आवश्यक असलेले तंत्र राज ठाकरे यांच्याकडे आहे. मतांचा गठ्ठा वाढवण्यासाठीही काही नेतृत्व लागते. मतांचा गठ्ठा वाढवण्याची ताकद राज ठाकरे यांच्याकडे आहे. त्यांच्या भाषणामुळे उमेदवार निवडून येत नसतील. पण मत परिवर्तन करण्याची ताकद राज ठाकरेंकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन भाऊ एकत्र येऊन शिवसेना एकसंघ होईलच. पण जनतेला जे हवंय ती शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेंनीही त्यांच्यासोबत येऊन एक शिवसेना तयार करायला हवी, असे वक्तव्य कीर्तिकर यांनी केले.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर कीर्तिकर यांनी काही दिवस ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत होते. मात्र, सहा महिन्यानंतर त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करीत शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. त्यामुळे शिंदे सेनेत मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी शक्यता होती. मात्र, त्यांची खासदारकीची उमेदवारी कापून दुसऱ्याला उमेदवारी देण्यात आली तर त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर लोकसभेला ठाकरे सेनेकडून लढले. अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात तगडा उमेदवार रिंगणात उतरवला होता. त्यामुळे त्यांचा अल्पशा मताने पराभव झाला होता, याबाबतही कीर्तिकर यांच्या बोलण्यातून रोष जाणवत होता.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविषयी नाराजी व्यक्त करताना त्यांनी घराचा आहेर दिला. एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करून त्यांना अडीच वर्ष झाली आहेत. त्यांनी पक्षवाढीसाठी भक्कम संघटनात्मक काम केले आहे. लोकाधिकार समितीच्या चळवळीत राहून काम केले आहे. 20 वर्ष आमदार, 10 वर्ष खासदार, मंत्री पाच वर्ष एवढा अनुभव असूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांचा कोणताही उपयोग करून घेतला नाही. त्यातुन त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली.
या निमित्ताने कीर्तिकर यांनी सोडलेला हा बॉम्ब किरकोळ वाटत असला तरी येत्या काळात शिंदेंच्या शिवसेनेतील नाराजीनाट्य बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण की, शिंदे यांच्याकडे मोठया प्रमाणात नेतेमंडळी प्रवेश करीत आहेत. त्यामुळे सर्वानाच पदे देणे शक्य नाही.
त्यासोबतच प्रत्येकजण पदाच्या अपेक्षाने शिवसेनेत प्रवेश करीत असताना दिसत आहे. दुसरीकडे मात्र, गेल्या काही दिवसापासून भाजपकडून त्यांची कोंडी केली जात असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे शिंदे सेना सरकारमध्ये बॅकफूटवर दिसत आहे. भाजपकडून शिंदे सेनेचे पंख छाटण्याचे काम सुरु आहे. शिंदे सेनेच्या आमदाराना व मंत्र्यांना कमी परंमनात निधी दिला जात असल्याने नाराजी आहे.
त्यातच आता आगामी काळात होत असलेलया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक महायुतीतील मित्रपक्ष एकत्रित लढणार की स्वबळावर याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच शिवसेनेत पदाच्या अपेक्षेने गेलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड होत चालला आहे. त्यामुळेच कीर्तिकर यांनी टाकलेल्या बॉम्बने शिंदे यांच्या शिवसेनेची चिंता वाढवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.