Dharashiv News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर बहुमत मिळालेल्या महायुतीने सत्तास्थापन केली. 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर गेल्या महिनाभरापासून पालकमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच पहावयास मिळाली. जवळपास शपथ घेतल्यानंतर महिनाभरानंतर धाराशिव जिल्ह्याला पालकमंत्री मिळाला आहे. धाराशिव जिल्हयाला परत एकदा जिल्ह्याबाहेरीलच पालकमंत्री मिळाला असून शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे हा पदभार सोपविण्यात आला आहे. सरनाईक यांना याठिकाणचे पालकमंत्रिपद सांभाळताना येत्या काळात तारवेरची कसरत करावी लागणार आहे.
धाराशिव जिल्ह्याचा गेल्या दहा वर्षांचा इतिहास पहिला तर महायुती सरकारच्या काळात तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या रूपाने अडीच वर्ष जिल्ह्यातील पालकमंत्री लाभला होता. अन्यथा 2014 च्या सुरुवातीच्या काळात तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत हे पालकमंत्री होते तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात शंकरराव गडाख हे पालकमंत्री होते. त्यामुळे नेहमीच या ठिकाणी बाहेरचा पालकमंत्री राहतो, अशी काहीशी ओळख झाली आहे
धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात माजी मंत्री पदमसिंह पाटील यांची मोठी पकड राहिली आहे. मात्र, 1995 नंतर धाराशिव जिल्ह्यातील राजकारणाने कूस बदलला असून धाराशिव जिल्ह्याची ओळख शिवसेनेचा बाल्लेकिल्ला अशीच राहिली आहे. 1996 पासून केवळ दोन वेळचा अपवाद वगळला तर 29 वर्षांपैकी 24 वर्ष याठिकाणी शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे. सध्या धाराशिव जिल्ह्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे खासदार आहेत. तर उस्मानाबाद-कळंब मतदारसंघातून ठाकरे यांच्या शिवसेनेचे कैलास पाटील तर उमरगा लोहारा मतदारसंघातून ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रवीण स्वामी हे आमदार आहेत.
दुसरीकडे परंडा मतदारसंघातून शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत हे आमदार आहेत तर तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे राणा जगजीतसिंह पाटील हे आमदार आहेत. सत्ताधारी पक्षाचे दोन तर विरोधी पक्षाचे दोन आमदार असे समसमान संख्याबळ आहे. त्यामुळे हे समन्वय साधण्याचे काम येत्या काळात प्रताप सरनाईक यांना करावे लागणार आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर व भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील हे चुलत भाऊ असले तरी दोघांची तोंडे दोनविरुद्ध दिशेला असतात. त्यामुळे या दोन नेत्यांची मर्जी राखत जिल्ह्याचा कारभार सरनाईक यांना येत्या काळात हाकावा लागणार आहे. त्यातच पूर्वी पालकमंत्री असलेले तानाजी सावंत यांनी त्यांच्या काळात घेतलेले निर्णय राबविण्याकडे त्यांचा कल असणार आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांच्याशी येत्या काळात सरनाईक यांना जुळवून घ्यावे लागणार आहे. या सरकारमध्ये सावंत यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज आहेत. ते काहीच बोलत नसल्याने त्यांची नाराजी कशी दूर करणार यावर बरीच समीकरण अवलंबून राहणार आहे.
त्यातच येत्या काळात नवे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या कार्यकाळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील आठ नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणुका पाहता महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेमधील स्थानिक नेत्यांना निधीचे समान वाटप आणि डीपीडीसीमध्ये प्रतिनिधित्व देताना पालकमंत्री सरनाईक यांचा कस लागणार आहे. विशेषता सरनाईक हे जवळपास चार टर्म आमदार असले तरी मंत्री म्हणून त्यांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. त्यामुळे पालकमंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव नसल्याने ते हे दिव्य कशा प्रकारे पार पाडतील, याची उत्सुकता लागली आहे.
धाराशिव जिल्ह्यात ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन तर भाजप व शिंदेच्या शिवसेनेचा प्रत्येकी एका आमदार आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री राहिलेले आमदार तानाजी सावंत यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. तर शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. दुसरीकडे माजी मंत्री राहिलेले राणा जगजीतसिंह पाटील भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे येत्या काळात या सर्व मंडळींना सांभाळताना सरनाईक यांना तारेवरची कसरत करावी, लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.