थोडक्यात बातमी:
हसन मुश्रीफ यांचं वाढलेलं राजकीय वजन: महायुतीच्या अंतरविरोधातून आणि सतेज पाटील यांच्याशी असलेल्या मैत्रीच्या जोरावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावर आपली छाप सोडली.
महाडिक गटाचा संचालक वाढीला तीव्र विरोध: संचालक संख्या वाढवण्याचा निर्णय गोकुळमध्ये एकतर्फी सत्ता स्थापन करण्यासाठी असून, त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्याचा डाव असल्याचा संशय महाडिक गटाने व्यक्त केला आहे.
राजकीय संघर्ष आणि वर्चस्व लढा: धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील जुने राजकीय वैर पुन्हा उफाळून आले असून, गोकुळचा वाद राज्य आणि केंद्रस्तरावर नेण्याची तयारी महाडिक गट करत आहे.
Gokul News : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या राजकारणात वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी बाजी मारली. वास्तविक महायुतीचा अध्यक्ष व्हावा आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या गटाचा अध्यक्ष न करण्यासाठी माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी बंड केले. पुढील वर्षी होणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही अध्यक्ष निवड चांगलीच वादाची आणि चर्चेची राहिली. अशातच आता गोकुळ दूध संघातील (Gokul Dudh Sangh) सत्ताधारी संचालकांनी संचालक वाढीचा निर्णय घेतला आहे. त्याला महाडिक कडाडून टोकाचा विरोध केला आहे. (BJP MP Dhananjay Mahadik is reportedly preparing a masterplan to counter minister Hasan Mushrif’s growing influence in Gokul Dudh Sangh politics)
पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघावर महायुतीचाच अध्यक्ष व्हावा यासाठी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा देखील मनसुबा होता. माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केलेल्या बंडामुळे तो सफल झाला. मात्र, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांची दोस्ती याठिकाणी देखील कामी आली. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीचा पेच निर्माण झाल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी नविद मुश्रीफ यांना अध्यक्ष करून स्वतःचाही स्वार्थ साधला.
मात्र, ज्या पद्धतीने एका संस्थेवरील अध्यक्षपदाचा वाद अरुण डोंगळे यांनी राज्यस्तरावर नेला. त्याची चर्चा राज्यात झाली. इतिहासात पहिल्यांदाच गोकुळच्या अध्यक्षपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हस्तक्षेप करावा लागला. कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी. साहजिकच हा विषय राज्यस्तरावर गेल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांच्यावर देखील दबाव आला. त्याच पद्धतीने आता संचालक वाढीचा मुद्दा हा केंद्रीय स्तरावर घेऊन जाण्याच्या हालचाली महाडिक गटाकडून केला जात आहे.
राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातून एक ही आमदार महाविकास आघाडीचा झालेला नाही. त्यामुळे कमकुवत झालेले काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना गोकुळच्या माध्यमातून ताकद मिळू नये यासाठी महाडिक गटांनी सुरुवातीपासूनच संचालक वाढीला विरोध केल्याचे चित्र आहे. मंत्री मुश्रीफ आणि आमदार पाटील यांची मैत्री पाहता संचालकवाढीमागे गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्याचा डाव असल्याचा संशय महाडिक गटाला आहे.
संचालक वाढीच्या निर्णयाला विरोध करण्यामागची महाडिक गटाची अनेक कारणे कारणीभूत आहेत. या पंचवीस वर्षांपासून गोकुळ दूध संघ हा शेतकऱ्यांच्या हिताचा चालला असा दावा महाडिक गटाकडून करण्यात येत होता. मागील निवडणुकीत मंत्री मुश्रीफ आणि पाटील गटाने महाडिक गटाला हादरा दिला. गोकुळचे लेखापरीक्षण, वाढलेले सभासद, नव्याने काढलेल्या दूध संस्था सत्ताधाऱ्यांनी दाखवल्या असल्या तरी त्या पद्धतीने दूध संकलन क्षमता वाढली आहे की नाही? असा सवाल सुरुवातीपासूनच महाडिक गटाचा आहे.
सत्ताधाऱ्यांकडून पारदर्शक कारभार, वार्षिक ठेवी आणि दूध संकलन वाढल्याचा दावा केला जात आहे. पण या दाव्याला महाडिक गटाकडून आव्हान दिले जात आहे. जर सत्ताधाऱ्यांचा कारभार इतका स्वच्छ असेल तर ठराव धारकांना टोकन देण्याची गरज काय? असा सवाल करत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी थेट मुश्रीफ यांनाच आव्हान दिले आहे. महादेवराव महाडिक यांच्या या विधानानंतर गोकुळमधील कारभार दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर उघड झाला आहे. शिवाय मंत्री मुश्रीफ हेच गोकुळचे कारभारी नाहीत, हे देखील त्यांनी त्यातून स्पष्ट केलंं आहे.
राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महाडिक गटाचा एकेक गड खालसा करत सतेज पाटील यांनी जिल्ह्यात आणि राज्यातही आपल्या राजकारणात दबदबा केला. पण 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला यश मिळाल्यानंतर सतेज पाटील यांची राजकीय ताकद कमी झाली. अशातच मंत्री हसन मुश्रीफ हीच ताकद आता सतेज पाटील यांच्याकडे दोस्तीच्या रूपाने आहे. उघड नाही पण पडद्याआड सर्व गोष्टी सतेज पाटील यांनाही ज्ञात आहेत.
अशा परिस्थितीत गोकुळ दूध संघामध्ये महायुतीचे सर्वच नेते एकवटल्याने सतेज पाटील एकटे पडतील, अशी भीती देखील काही नेत्यांना आहे. त्यामुळे संचालक वाढवून गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याचा डाव जिल्ह्यातील काही प्रमुख नेत्यांनी आखल्याचा संशय महाडिक गटाला आहे. त्यामुळे याला सुरुवातीपासूनच विरोध करत गोकुळ संचालिका महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी हा वादकेंद्रीय आणि राज्यस्तरावर नेण्यासाठी पार्श्वभूमी तयार करण्याचे काम सुरू आहे.
या सर्व घडामोडीला वैद्यकीय शिक्षण मंत्री आता कसे हातातील याकडे देखील आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मंत्री मुश्रीफ यांचा राजकारणातील अंदाज पाहता माजी आमदार महादेवराव महाडिक, लोकनेते कै. सदाशिवराव मंडलिक यांच्याकडूनच राजकीय धडे त्यांनी अनुभवातून घेतले आहेत. त्यामुळे या सर्व घडामोडीला त्यांच्याकडून राजकीय गेम कसा खेळला जाणार? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
प्रश्न 1: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावर कोण विजयी झाले?
उत्तर: वैद्यकीय शिक्षणमंत्री नविद हसन मुश्रीफ गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष बनले.
प्रश्न 2: संचालक वाढीला कोण आणि का विरोध करत आहे?
उत्तर: महाडिक गट संचालक वाढीला विरोध करत असून, यामागे बिनविरोध निवडणुकीचा डाव असल्याचा त्यांचा आरोप आहे.
प्रश्न 3: हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची भूमिका काय आहे?
उत्तर: दोघांची मैत्री अध्यक्ष निवडीमध्ये निर्णायक ठरली असून, सतेज पाटील यांनाही अप्रत्यक्ष फायदा झाला आहे.
प्रश्न 4: गोकुळचा वाद पुढे नेण्याचे महाडिक गटाचे पुढील पाऊल काय आहे?
उत्तर: हा वाद राज्य व केंद्र स्तरावर नेण्याच्या हालचाली महाडिक गटाने सुरू केल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.