Hasan Mushrif, Kolhapur Sarkarnama
विश्लेषण

Hasan Mushrif News : कोल्हापूर लोकसभेची बंदूक हसन मुश्रीफांच्या खांद्यावर; नेम धरून युती कुणाचा 'गेम' करणार?

Sunil Balasaheb Dhumal

राहुल गडकर

Kolhapur Political News : उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना बाजूला सारून सत्तेत मागून आलेल्या राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांची महायुती सरकारने पालकमंत्रिपदाची स्वप्नपूर्ती केली. कोल्हापूर जिल्ह्यातील त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तसेच त्यांचे महाविकास आघाडीतील नेत्यांशीही सलोख्याचे संबंध आहेत. यातून लोकसभेत महाविकास आघाडीचा गेम करण्याच्या हेतूनेच महायुती सरकारने हसन मुश्रीफ यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. आता या बंदुकीतून महायुती कुणाचा गेम करणार, याचीच चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. (Latest Political News)

जिल्ह्यातील काँग्रेसचे लोकसभेसाठी आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि आमदार पी. एन. पाटील हे दोन भक्कम उमेदवार आहेत. कोल्हापूर लोकसभा विधानसभा मतदारसंघांमध्ये या दोन मातब्बर आमदारांची ताकद निर्णायक आहे. मात्र, लोकसभेसाठी ते दोघेही इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. ठाकरे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते महाविकास आघाडीसोबतच राहण्याची शक्यता आहे, तर गावगाड्यात जपलेला राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता पेटून उठला आहे.

महाविकास आघाडीकडे आजच्या घडीला सक्षम चेहरा नसला तरी युतीला आघाडीची धास्ती कायम आहे. या सर्व परिस्थितीवर मात देण्यासाठी जिल्ह्यात हसन मुश्रीफ यांच्याशिवाय युतीकडे पर्याय नाही. लोकसभा निवडणुकीपर्यंत युती कायम राहिली तर कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत युतीचा वरचष्मा कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे.

विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Madlik) शिंदे गटाचे असल्याने गाव पातळीवर शिंदे गटाबाबत नाराजी आहे. मात्र, मुश्रीफ यांच्या पालकमंत्रिपदाने शिंदे आणि भाजप यांच्यावरील रोष कमी होऊ शकतो, तर विरोधी महाविकास आघाडीलाही मुश्रीफांचा सामना करण्यासाठी कठीण परिस्थितीतून जावे लागेल. एकट्या कागल विधानसभा मतदारसंघात भाजप सोडल्यास महाविकास आघाडीचा एकही गट नावालाही नाही. ठाकरे गटाचे संजय घाटगे असले तरी मुश्रीफ यांच्या पडद्यामागच्या हालचाली त्यांना रोखू शकतात. कोल्हापूर भाजप हा काँग्रेस नेत्याच्या वळचणीला जात असल्याची तक्रार गेल्या काही वर्षांपासून आहे. आता मुश्रीफांच्या माध्यमातून लोकसभेला भाजपची कोणतीही रसद काँग्रेसला मिळणार नाही, याची काळजीही घेतल्याचे दिसून येते.

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे काँग्रेस नेत्यांबरोबर कितीही मैत्रीपूर्ण संबंध असले तर लोकसभा निवडणुकीत त्यांना युतीधर्म पाळून युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. शिवाय मुश्रीफ स्वतः कार्यकर्त्यापासून ते पालकमंत्री पदापर्यंत पोहाेचले असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहाेचण्याची त्यांची कुवत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच हसन मुश्रीफ यांना पालकमंत्रिपद दिल्याचे दिसून येते.

सतेज पाटलांचे डावपेच ओळखून

लोकसभा 2019 च्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील आणि मुश्रीफ यांनी बांधलेली वज्रमूठ संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. यानंतर त्यांनी जिल्ह्यातील एकापाठोपाठ एक अशा सर्व राजकीय संस्था ताब्यात घेतल्या. कोल्हापूर लोकसभा, कोल्हापूर जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ, यांवर त्यांचे वर्चस्व आहे. या निवडणुकीत बंटी आणि मुश्रीफांच्या जोडगाेळीने जिल्ह्याच्या राजकारणाला महाविकास आघाडीची एक वेगळी ताकद निर्माण करून दिली होती. तसेच सतेज पाटलांचे खंदे कार्यकर्ते कोण? पाटील कोणत्या वेळी कोणता डाव टाकू शकतात? याचे संपूर्ण राजकीय ज्ञान मंत्री हसन मुश्रीफांना आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटील यांना रोखायचे झाल्यास हसन मुश्रीफ हे महायुतीकडे पर्याय असू शकतात.

कागलची रसद मंडलिकांना मिळेल

मंत्री मुश्रीफ आणि खासदार संजय मंडलिक यांची दोस्ती सर्वश्रृत आहे. तसेच मुश्रीफ आणि ठाकरे गटाचे संजय घाटगे यांचीही मैत्री राजकारणाच्या पलीकडे आहे. मुश्रीफ म्हणतील तीच पूर्व दिशा, असे संजय घाटगे मानत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत युती राहिली तर विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्यामागे ठाकरे गटाची रसद पुरवण्यास मुश्रीफांचा हातभार असणार आहे.

2019 मध्ये मुश्रीफांचे वर्चस्व

मागील लोकसभा निवडणुकीत राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात होते. पक्षादेश मानून मंत्री मुश्रीफ यांनी महाडिक यांचा प्रचार केला होता. मात्र, परिस्थिती पाहिली तर मागील लोकसभा निवडणुकीत बंटी आणि मुश्रीफ यांची अंतर्गत खेळी कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण पालटून गेली. महाडिक यांच्या विरोधात विद्यमान खासदार संजय मंडलिक युतीचे उमेदवार होते. मंत्री मुश्रीफ हे संजय मंडलिक यांचे वडील लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचे शिष्य होते. गुरूच्या पुत्राला विजय करण्यासाठी मंत्री मुश्रीफ यांचा हात मोलाचा होता, असे बोलले जाते. त्यामुळे यावेळेसही मुश्रीफ मंडलिक यांच्या विजयासाठी प्रयत्न करतील, असा अंदाज आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT