INDIA Alliance Sarkarnama
विश्लेषण

India Alliance : काँग्रेसचा ‘चालढकल’पणा 'इंडिया' आघाडीच्या मुळाशी?

सरकारनामा ब्यूरो

संजय परब

Congress News : पाचपैकी फक्त एका राज्यात तेलंगणात काँग्रेसचे सरकार आले आणि तीन महत्त्वाच्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. या निकालामुळे भाजपची ताकद वाढली असताना काँग्रेसची पुन्हा एकदा पिछेहाट झाल्याने 'इंडिया' आघाडीचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या साऱ्या वास्तवावर एक नजर टाकताना असे दिसते की, या साऱ्याला काँग्रेसचा नेहमीचा ‘चालढकल’पणा कारणीभूत ठरलाय. आता काँग्रेसने उभारी घेतली नाही तर ते आपल्या पक्षाबरोबर 'इंडिया' आघाडीला डुबवू शकतात आणि तिसऱ्यांदा भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत काँग्रेसला 'इंडिया' आघाडीची आठवण झाली नाही. भाजपप्रमाणे प्रादेशिक पक्षांचा वापर करत त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचे, असे धोरण काँग्रेससाठी दिल्ली दूर राहिल, हे त्यांनी आधी लक्षात ठेवायला हवे. आज घडीला ममता, नितीश, केजरीवाल, उद्धव, शरद पवार यांच्यापेक्षा काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवर भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे. सत्तेवरील प्रादेशिक पक्ष त्यांच्या त्यांच्या राज्यात सुखी आहेत. त्यांना आपला सवतासुभा राखला गेला तरी चालण्यासारखे आहे. मात्र काँग्रेसचे तसे नाही. लोकशाही टिकवायची असे नुसते बोलून चालणार नाही, तर त्यासाठी बलाढ्य प्रतिस्पर्धी भाजपशी दोन हात करताना प्रादेशिक पक्षांना विश्वासात घ्यावे लागेल. ममता, केजरीवाल यांना मनात नसले तरी सोबत घेऊन चालावे लागेल, याकडे राजकीय अभ्यासक लक्ष वेधतात.

या सर्वाचा विचार करता नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये १९ डिसेंबरला होणारी 'इंडिया' आघाडीची बैठक खूप महत्त्वाची ठरेल. या बैठकीत जागा वाटपाचे सूत्र ठरवावे लागेल. कोणत्या राज्यात कोणाची ताकद जास्त आहे, हे लक्षात घेऊन काँग्रेसने मोठ्या भावाची सामंजस्य भूमिका घेत 'इंडिया' आघाडीचे कुटुंब सांभाळावे लागेल. तसे झाले नाही तर ‘तुकडे तुकडे गॅंग’ म्हणून भाजपने तयार केलेला स्टॅम्प आणखी जोरात मारायला सुरुवात होईल. यासाठी भाजपचे सोशल मीडिया वॉर रूम वाटच बघत आहे.

पश्चिम बंगाल आणि बिहार या दोन राज्यांत मिळून लोकसभेच्या एकूण 82 जागा आहेत आणि ही राज्ये 'इंडिया' आघाडीसाठी अतिशय महत्त्वाची आहेत. यामुळे ममता बॅनर्जी तसेच नितीशकुमार या दोन मुख्यमंत्र्यांची मते काँग्रेसला फक्त विचारात नाही, तर अंमलात आणावी लागतील. 'इंडिया' आघाडीतील पक्ष वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विचारसरणीचे आहेत. त्यांनी भाजपला विरोध या एका उद्देशाने मोट बांधली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'इंडिया' आघाडीसाठी आणखी एक आशेचा किरण दिसतोय तो म्हणजे तीन राज्यांमध्ये पराभव झाला असला तरी काँग्रेसच्या मतांची टक्केवारी निराशाजनक नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे चित्र वेगळे दिसू शकते. मात्र, काँग्रेसला तडजोड ही करावीच लागेल. जिथे प्रादेशिक पक्ष ताकदवान आहेत तिथे योग्य पद्धतीने आघाडी झाली तर भाजपच्या जागा कमी होऊ शकतात. बिहारमध्ये हे आधीच सिद्ध झाले आहे की, जेव्हा दोन मोठे पक्ष एकत्र येतात तेव्हा त्यांनाच बहुमत मिळते. बिहारमध्ये जेडीयू आणि आरजेडीची महाआघाडी आहे, त्यामुळे येथे संधी आहे. याशिवाय पश्चिम बंगालसह महाराष्ट्र, कर्नाटक तसेच दक्षिणेतील राज्ये आणि पूर्वांचल भाग येथील ताकदीचा वापर करावा लागेल.

'इंडिया' आघाडीच्या पाटणा, बंगळुरू आणि मुंबईत बैठक झाल्या असल्या तरी त्यात प्राथमिक चर्चा झालीय. आता फक्त लोकशाही धोक्यात म्हणून रडगाणे चालणार नाही, तर लोकांना ठोस उपाय द्यावे लागतील. लोकसभा निवडणुका मे महिन्यात होतील, असा अंदाज असला तरी आता फक्त सहा महिने बाकी आहेत. आघाडीची मुंबईतील तिसरी बैठक होऊन तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका असल्याने पुढच्या बैठका ठप्प झाल्या असल्या तरी आता उभारी घेण्याची हीच वेळ आहे. मुख्य म्हणजे काँग्रेसला सर्वांना विश्वासात घ्यावेच लागेल. अन्यथा काँग्रेसचा चालढकलपणा 'इंडिया' आघाडीच्या मुळाशी आल्यावाचून राहणार नाही.

लोकसभेचा विचार करता भाजपच्या हिंदुत्वरुपी राष्ट्रवादाला 'इंडिया' आघाडीने मवाळ हिंदुत्ववादाने उत्तर देऊन चालणार नाही. हिंदुत्वासाठी मत देणाऱ्यांना भाजपखेरीज दुसरा पक्ष दिसत नाही, हे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भाजपच्या विजयाने दाखवून दिले आहे. अन्यथा राजस्थान वगळता मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची हवा असूनही विजय मात्र भाजपचा झाला, हे लक्षात घेतले पाहिजे. निवडणुकांच्या मध्यावर मध्य प्रदेश तसेच छत्तीसगडमध्ये आपण आता जिंकलोच, ही ढिलाई पराभवास कारणीभूत ठरली होती. भाजपची तयारी आणि पुढचे नियोजन हे विरोधी पक्षांपेक्षा एक पाऊल पुढे टाकणारे असते. ते मते मिळवण्याची एकही शक्यता सोडत नाही. पण, पूर्वापार चालत आलेली आपल्याशिवाय आहे तरी कोण, ही दिरंगाई पराभवाच्या खाईत लोटणारी आहे. अत्यंत वेगाने संधी साधणाऱ्या भाजपला त्याच वेगाने सामोरे जाण्याची काँग्रेससह 'इंडिया' आघाडीला गरज आहे.

(लेखक हे मुंबईस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत)

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT