Congress News Sarkarnama
विश्लेषण

Osmanabad Congress : धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस नेते गढीवर निवांत, कार्यकर्ते मात्र सैरभैर...

Dharashiv Political News : ना लोकसभा मतदारसंघावर दावा, ना कार्यक्रम, ना आंदोलने...

अय्यूब कादरी

Loksabha Election 2024 : धाराशिव जिल्ह्यात सर्व पक्षांमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. काही इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. महायुतीतील तिन्ही पक्षांतील नेत्यांचा इच्छुकांमध्ये समावेश आहे. महाविकास आघाडीत मात्र त्या तुलनेत उत्साह दिसत नाही, विशेषतः काँग्रेस पक्षात शांतता दिसत आहे.

सर्व सत्तापदे उपभोगलेली काँग्रेसची नेतमंडळी गढीवर निवांत असून, कार्यकर्ते मात्र सैरभैर झाल्याचे चित्र आहे. शेजारच्या तेलंगणा राज्यात रेवंथ रेड्डी यांनी खेचून आणलेली सत्ताही धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये उत्साह संचारू शकली नसल्याचे दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेचे (ठाकरे गट) ओमप्रकाश राजेनिंबाळकर(Omprakash Rajenimbalkar) हे धाराशिवचे खासदार आहेत. महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांत धाराशिव मतदारसंघातून इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे.

भाजपकडून बसवराज मंगरुळे यांनी तयारी सुरू केली आहे. मूळचे मुरुम (ता. उमरगा) येथील असलेले मंगरुळे छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक आहेत. आता ते जिल्ह्यात ठाण मांडून बसले आहेत. विविध गावांत त्यांनी संपर्क दौरे केले आहेत. मंगरुळे यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य-पाटील हेही इच्छुक आहेत. जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून मतदारसंघात त्यांचे दौरे वाढले आहेत.

याचबरोबर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसने मराठवाड्यातील परभणी आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघांवर दावा केला आहे. अजित पवार यांनी प्रा. सुरेश बिराजदार यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रा. बिराजदार कामाला लागले आहेत, तर महायुतीतील शिवसेनेच्या शिंदे गटाकडून माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्यांनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिल्याचे सांगितले जात आहे.

विद्यमान खासदार शिवसेनेचे असल्याने महाविकास आघाडीतून शिवसेनेलाच ही जागा सुटण्याची शक्यता आहे. शरद पवारांची(Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा मतदारसंघावर दावा करण्याची शक्यता कमीच आहे. काँग्रेसकडून मध्यंतरी हालचाली झाल्या, मात्र नंतर शांतता पसरली आहे. जिल्ह्यात काँग्रेसला मोठा आधार आहे. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नसला तरी पक्षाची विचारधारा मानणाऱ्या मतदारांची संख्या मोठी आहे.

धाराशिव जिल्ह्याने काँग्रेसच्या झोळीत भरभरून टाकले आहे. काँग्रेसनेही परतफेड केली आहे. ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांच्यासह मुरुम येथील बसवराज पाटील यांनी मंत्रिपदे भूषविली. गेल्या निवडणुकीत चव्हाण यांचा तुळजापूर मतदारसंघातून पराभव झाला. वयोमानानुसार त्यांनी आता स्वतःला मर्यादित केले आहे. असे असले तरी ते कार्यक्रमांना हजेरी लावतात.

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील चाणाक्ष राजकीय नेते म्हणून ओळखले जातात. ते १९९९ मध्ये पहिल्यांदा उमरगा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. पहिल्याच टर्ममध्ये काँग्रेसने त्यांना राज्यमंत्रिपद दिले होते. राज्यमंत्री असूनही २००४ मध्ये त्यांचा पराभव झाला. २००९ मध्ये उमरगा मतदारसंघ राखीव झाला. त्यानंतर त्यांनी लगतच्या औसा (जि. लातूर) मतदारसंघाकडे मोर्चा वळवला.

स्थानिक नेत्यांना डावलून काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास टाकला. तो विश्वास पाटील यांनी सार्थ करून दाखवला. उमरग्यातून जाऊन काही दिवसांतच तयारी करून त्यांनी औसा मतदारसंघात लक्षणीय विजय मिळवला. औशातून ते सलग दोन वेळा निवडून आले. २०१९ मध्ये भाजपचे अभिमन्यू पवार यांनी त्यांचा पराभव केला.

बसवराज पाटील यांचे बंधू बापूराव पाटील हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. जिल्हा बँक अध्यक्षपदाची ही त्यांची दुसरी टर्म आहे. बसवराज पाटील यांचे पुत्र शरण पाटील हे जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. शरण पाटील हे युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. निवडणुकीद्वारे त्यांनी हे पद मिळवले आहे. राजकारणातील आश्वासक तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

बसवराज पाटील यांचे संघटन कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. मुरुम येथील विठ्ठलसाई साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांची मतदारसंघावर पकड आहे. हे असे सर्व असतानाही काँग्रेसच्या पडत्या काळात त्यांनी शांत राहणे पसंत केले आहे. त्यामुळे ठरावीक अंतराने त्यांच्याबाबत कुजबूज सुरू होते, अफवा पसरतात.

धाराशिव जिल्ह्यात बसवराज पाटील(Basavaraj Patil) हेच काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसकडून अथवा पाटील यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. काय करावे हे त्यांना कळत नाही. तुळजापूरचे धीरज पाटील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. तेही फारसे सक्रिय दिसत नाहीत.

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तीन राज्यांत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. मात्र लगतच्या तेलंगणा राज्यात काँग्रेसला यश मिळाले. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी आक्रमक आंदोलने करून सत्ता गाठली. यामुळेही धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना हुरूप आलेला नाही.

याचबरोबर शेजारच्या सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी पायाला भिंगरी लागल्यागत फिरत आहेत. सलग दोन वेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ८२ वर्षे वयाचे शिंदे सक्रिय झाले आहेत. हे पाहून तरी धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते कामाला लागतील काय़? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT