BJP Vs NCP Politics : जिल्ह्यातील दोन्ही खासदार, १५ पैकी तेरा आमदार विकासाची ढाल पुढे करीत भाजपच्या राज्य व केंद्र सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यातील सर्वच निरुपयोगी ठरल्याचे दिसत आहे. केंद्र शासनाच्या निर्यात बंदीमुळे प्रचंड संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पुन्हा एकदा शरद पवार मैदानात उतरणार आहेत. (Two ministers and 13 MLAs are in Power, But no one is usefull For Farmers in Nashik)
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आज कांदा निर्यात बंदीच्या प्रश्नावर शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी संपर्क साधला. शेतकऱ्यांवर (Farmers) पोलिसांनी (Police) लाठीमार केला आहे. त्यामुळे शरद पवार येत्या सोमवारी चांदवडला येऊन या प्रश्नावर आंदोलन करीत थेट सरकारला आव्हान देणार आहेत.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गोकुळ पिंगळे, गजानन शेलार, कोंडाजी मामा आव्हाड यांनी आज पत्रकारांना माहिती दिली. पवार कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने संतप्त आहेत. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत असताना भाजप व त्याचे नेते दुःखी का होतात, असा प्रश्न त्यांनी पदाधिकाऱ्यांना केला. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच महाविकास आघाडीने खंबीरपणे शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या विरोधात सबंध जिल्ह्यात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. सटाणा, निफाड, लासलगाव, येवला, चांदवड, मालेगाव, सिन्नर, विंचूर, कळवण यांसह विविध ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले. बाजार समित्यांना टाळे ठोकले. असहाय व संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरल्यावर त्यांच्यावर चांदवड, मनमाड, येवला येथे पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे जिल्ह्यात अतिशय तीव्र वातावरण आहे. त्याविरोधात भाजपच्या या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सोमवारी (ता. ११) सकाळी मुंबई, आग्रा महामार्गावर चांदवड चौफुली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ३ मंत्री आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदार तसेच खासदार हेमंत गोडसे यांनी बंडखोरी करून मतदारसंघातील विकासाच्या नावाखाली भाजपच्या सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार सत्तेसाठी अजित पवार यांच्या सोबत राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. सध्या जिल्ह्यात दोन मंत्री, तेरा आमदार भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आहेत. याच सरकारने कांदा निर्यात बंदी केली आहे. मात्र, यातील कोणीही शेतकऱ्यांच्या मदतीला आलेले नाही. कोणीही ठोस विरोध केलेला नाही. अशा स्थितीत विरोधी पक्षांकडून व शेतकरी संघटनांकडून निर्यात बंदी विरोधात आंदोलन केले जात आहे. त्याला शरद पवार यांच्या सहभागाने बळ मिळणार आहे.
यापूर्वी केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू करून कांदा दर पाडले होते. शेतकऱ्यांना संकटात लोटले होते. दुष्काळी स्थितीने हैरान शेतकऱ्यांना सध्या अवकाळी पावसाचा प्रचंड फटका बसला. कांदा पीक हातचे गेले. त्यातच पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालाने हुरळून गेलेल्या भाजपच्या सरकारने पुन्हा एकदा निर्यात बंदीचा सुलनाती आसूड मारला आहे. त्याने शेतकरी प्रचंड संतप्त आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.