Latur News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने लातूर भाजपमधील जुन्या-नव्याचा वाद चव्हाट्यावर आला होता. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या सुनबाई डॉ. अर्चना पाटील-चाकूरकर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी जुन्यातल्या कोणालाही उमेदवारी द्या. नव्याने आलेल्या मंडळींना नको असा आग्रह पक्षश्रेष्ठीकडे धरण्यात आला होता.
त्यावेळी निवडून येणाऱ्यास प्राधान्य हा निकष प्रमुख मुद्दा गृहीत धरून अर्चना चाकूरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केलेले नव्हते, अशा तक्रारी निवडणूक निकालानंतर करण्यात आली. पक्षातील नवीन-जुने ही दरी मिटली नाही, त्याचा फटका भाजपला बसला. त्यातच आता विधानपरिषदेच्या रिक्त जागेच्या निवडणुकीत कोणाला संधी मिळेल? यावरुन पुन्हा एकदा हा वाद नव्याने पुढे आला आहे. त्यावर येत्या काळात लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपच्या (BJP) बहुतांश नेत्यांनी नव्याने आलेल्या अर्चना पाटील चाकुरकरांना पूर्णत: स्वीकारले नसल्याचे दिसत आहे. विधान परिषदेतील रिक्त जागांची पार्श्वभूमी या नव्या वादाला असण्याची शक्यता आहे. अन्य पक्षातून आलेले कार्यकर्ते भाजपमध्ये आल्यानंतर आपल्या हक्कावर गदा आणतात, हीच भावना अनेक वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे.
काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या अर्चना पाटील चाकुरकरांना नव्या व्यवस्थेत मिसळून कसे जायचे, हा प्रश्न गेल्या काही दिवसापासून सतावत आहे. नव्याने पालकमंत्री झालेल्या शिवेंद्रराजे भोसले यांना त्यांनी तो प्रश्न विचारला आणि लातूरमध्ये भाजपमध्ये अजूनही नव्या जुन्याचा वाद मिटला नसल्याचे स्पष्ट झाले. या वादाचा फटका काही दिवसापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बसला असतानाही हा वाद अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपमधील हे मतभेद असेच राहिले तर या निवडणुका जड जाण्याची शक्यता आहे.
लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे नुकतेच लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी ‘देवघर’ मध्ये भेट दिली. देवघर हे शिवराज पाटील चाकुरकर (Shivaraj Patil Chakurkar) यांचे घर आहे. पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे भाजपमध्ये मिसळून जाण्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. 2019 च्या निवडणुकीत शिवेंद्रराजे भाजपमध्ये आले व मी 2024 च्या निवडणुकीत भाजपमध्ये आले. पालकमंत्री यांच्यासॊबत जुन्या नव्यांच्या वादावर बोलणे झाले. त्यावेळी येत असलेल्या अडचणी त्यांच्या समोर मांडल्याचे अर्चना चाकूरकर यांनी सांगितले.
त्यामुळे आता येत्या काळात या जुन्या-नव्याच्या वादावर पालकमंत्र्यांपुढे तोडगा काढण्याचे आव्हान असणार आहे. त्यामुळे येत्या काळात सातारा जिल्ह्यात कसा मार्ग शोधला? त्याप्रमाणे या वादातून मार्ग काढत समतोल राखणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.