Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या चार वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहेत. 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांचा कारभार प्रशासक चालवत आहेत. सुरुवातीला कोरोना, प्रभाग रचना आणि नंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका लांबलेल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडली. त्यामध्ये पुन्हा एकदा नवीन तारीख मिळाल्याने गेल्या सुमारे चार वर्षांपासून खोळंबल्या या निवडणुकांना इतक्यात मुहूर्त मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. या निवडणुका आता पावसाळ्यानंतर होणार आहेत. विधानसभेला ऐतिहासिक यश मिळवल्याने महायुती आणि भाजपचे कार्यकर्ते या निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागले होते. मात्र, आता निवडणूक लांबणीवर गेल्याने इच्छुकांच्या तयारीवर पाणी पडले आहे .
राज्यातील 29 महानगरपालिका 257 नगरपालीका 26 जिल्हा परिषद, 289 पंचायत समितीमध्ये अद्याप काही महिने तर प्रशासकाचा कारभार कायम राहणार आहे. छत्रपती संभाजी नगर, नवी मुंबई, कोल्हापूर महापालिकेमध्ये गेली पाच वर्षे लोकप्रतिनिधी नाहीत तर काही नव्याने निर्मिती झालेल्या महापालिकेची अद्याप पहिली निवडणूक झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी ६ मे पर्यंत लांबणीवर पडली आहे. त्यामुळे या वर लवकर निकाल येण्याची शक्यता कमीच आहे.
पाच वर्षापूर्वी सुरुवातीला कोरोना रोगाचे संकट, त्यानंतर इतर मागासवर्गाचे आरक्षण (OBC Reservation), त्यानंतर महापालिकेतील प्रभाग रचना अशा विविध कारणाने कोर्टात सुनावणी सुरु आहे. सुरुवातीला कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे निवडणूका घेणे शक्य नव्हते. त्यानंतर विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या रचनामुळे निवडणूका झाल्या नाहीत. आरक्षणाबाबत घटनेने निश्चित केलेल्या 50 टक्के पेक्षा अधिकचे आरक्षण असल्याने सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण उठविण्याचा निर्णय दिला होता. मात्र हे आरक्षण लागू करण्यासाठी शास्त्रशुद्ध माहिती उपलब्ध नसल्याने हा पेच कायम राहिला आहे.
त्यासोबतच मुंबई पालिकेतील प्रभागांची संख्या आणि प्रभाग रचना यामुळे गुंता अधिकच वाढत गेला आहे. गेल्या वर्षभरात लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे आता येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर होतील, असे वाटत होते.
त्यानंतर महायुतीच्या अनेक नेत्यांनी येत्या काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील, त्यामुळे सर्वानी तयारीला लागा अशा सूचनाही केल्या होत्या. मात्र, निवडणुका लवकरच होणार असल्याने नेतेमंडळी व कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत झालेल्या त्या वातावरणाचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्यासाठी होईल, असे वाटत असल्याने राज्य सरकारने त्या दिशेने काही पावले टाकली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या सुनावणीत या प्रकरणावरील सुनावणी ६ मे पर्यंत पुढे ढकलली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना कोर्टाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उन्हाळ्यात होण्याची शक्यता देखील मावळली आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीची मोठी तयारी केलेल्या उमेदवारांसाठी निराशा पदरी आली आहे. त्यामुळे आता उन्हाळ्यात जर निवडणूक झाल्या नाही तर ही निवडणूक थेट दिवाळीनंतर होणार असल्याचे देखील बोलले जात आहे.
येत्या काळात होत असलेल्या सुनावणीत जरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबाबत निर्णय झाला तरी प्रभाग रचना व इतर कामांसाठी दोन ते तीन महिन्याचा वेळ लागणार आहे. त्याशिवाय जूनपासून पावसाळा सुरु होणार असल्याने पावसाळ्यात निवडणुका होत नाहीत. त्यामुळे आता निवडणुका ऑक्टोबरनंतर म्हणजे दिवाळीनंतरच होण्याची शक्यता अधिक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होतील, या आशेने सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांने गेल्या अनेक दिवसापासून तयारी सुरु केली होती. मात्र, आता निवडणूका लांबणीवर गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे.
प्रशासकीय राजवटीत राज्यातील बहुतांश शहराच्या विकास कामाला ब्रेक लागला आहे. नागरिकांना स्थानिक प्रश्नासंबंधी कार्यालयात धाव घ्यावी लागत आहे. किरकोळ समस्या सोडवण्यासाठी नेमकी कोणाकडे दाद मागावी हे नागरिकांना समजत नसल्याने अडचणीत भरच पडली आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता कधी होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.