narendra modi sarkarnama
विश्लेषण

Lok Sabha Election 2024 : नगर दक्षिणमध्ये मोदी की पवारांचा करिश्मा चालणार?

Ahmednagar Lok Sabha Constituency : नगर दक्षिणमधून महायुतीचा उमेदवार निश्चित झाला आहे, तर महाविकास आघाडीचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दारावर उभा आहे.

Pradeep Pendhare

लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha Election 2024 ) रणधुमाळी सुरू झाली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीचा उमेदवार निश्चित झाला, तर महाविकास आघाडीचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या दारावर उभा आहे. या दोघांच्या समर्थकांनी आणि यंत्रणेने राहुरी विधानसभा मतदारसंघात जोर बैठका सुरू केल्या आहेत. या वेळी राहुरी विधानसभा मतदारसंघ नगर दक्षिण लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) की, शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या करिश्म्यामागे उभा राहणार हे लोकसभा 2024 च्या निकालानंतर स्पष्ट होईल.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचा तीन वेळा खासदार निवडून आला आहे. आता विजयाची माळा कोण घालणार? याची उत्सुकता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या उमेदवाराला राहुरी विधानसभा मतदारसंघातून एक लाखाचे मताधिक्य होते. आता राहुरी मतदारसंघात राजकीय परिस्थिती वेगळी आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा 2019 च्या निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. विधानसभा 2019 च्या निवडणुकीनंतर संशयकल्लोळ नाटकाचा दुसरा अंक सुरू झाला. भाजपच्या विजयी उमेदवाराला राहुरी मतदारसंघातून मिळालेले एक लाखांचे मताधिक्य विधानसभा 2019 च्या निवडणुकीत घटले. भाजपचे शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांचा पराभव झाला. पहिल्यादांच विधानसभा निवडणुकीत उतरलेले नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) 30 हजार मताधिक्यांनी विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनी हा विजय मिळवला. भाजपची हॅटट्रिक हुकली. राष्ट्रवादीला हा विजय स्वप्नवत वाटला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात सत्तानाट्य बरेच गाजले. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून पहिल्यादांच आमदार म्हणून निवडून आलेले प्राजक्त तनपुरे यांना संधी मिळाली. आमदार तनपुरे यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघावर चांगली पकड मिळवली आहे. संघटनदेखील चांगले विणले आहे. यातच राहुरीतील तनपुरे सहकारी कारखान्याचा प्रश्नावर सत्ताधाऱ्यांत विरोधात त्यांनी संयमाची भूमिका घेऊन मुरब्बी राजकीय दर्शन घडवले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर आमदार तनपुरे यांनी शरद पवार यांच्याबरोबर राहणं पसंद केले. विरोधक म्हणून त्यांनी विधानसभेच्या सभागृहातदेखील दमदार कामगिरी आहे. सत्ताधाऱ्यांनी मध्यंतरी आमदार तनपुरे यांना आणि त्यांचे मामा ज्येष्ठ नेते, जयंत पाटील यांना महायुतीत घेण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु, त्या चर्चाच ठरल्या. आमदार तनपुरे यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघावर मिळवलेली पकड महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या संभाव्य उमेदवाराला निश्चितच फायदा देणारी ठरू शकते. साहजिक आमदार तनपुरे यांच्या होमवर्क मध्ये सातत्य असले तर, हे शक्य होईल.

राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बरेच प्राबल्य आहे. पक्षाचे नगर उत्तरप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्याबरोबर राहुरीतून बरेच कडवे शिवसैनिक आहे. लोकसभा 2019 च्या निवडणुकीत शिवसैनिकांनी येथे निर्णायक भूमिका बजावली होती. तसेच विखे यंत्रणेनेदेखील लोकसभा 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची यंत्रणा आणि अनेक कार्यकर्ते आपल्या बाजूने वळविले होते. विखेंच्या वाढत्या मताधिक्यामध्ये आणि निवडणूक जिंकण्यासाठी अनेक क्लृप्त्या आहेत.

राहुरी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार शिवाजी कर्डिले विधानसभा 2019 निवडणुकीतील पराभवानंतर विखे यांच्या विरोधातील मोहिमेचे नेतृत्व करीत होते. परंतु, त्यांनी यु-टर्न घेतला. विखे पिता-पुत्रांशी जुळवून घेतले. विखे पिता-पुत्र आणि कर्डिले यांच्या मैत्रीचे पर्व मोठे आहे की, त्यामागे एकमेकांचा राजकीय छुपा अजेंडा आहे, हे लोकसभा 2024 च्या निकालावरून स्पष्ट होईल. त्यामुळे या लोकसभा 2024 च्या निवडणुकीत शिवाजी कर्डिले यांची भाजप उमेदवारासाठी निर्णायक भूमिका असणार आहे. सुमारे दोन वर्षांपासून खासदार सुजय विखे ( Sujay Vikhe ) आणि शिवाजी कर्डिले संपूर्ण जिल्ह्यात एकमेकांचा हात हातात धरून फिरताना दिसत आहे. आमच्यात कोणतेही हेवे-दावे नाही, असे सांगत आहेत. विरोधकांवर तुटून पडत आहेत. विखे-कर्डिले यांच्यातील संघर्षाची थोडी जरी फट महाविकास विकास आघाडीच्या उमेदवाराला लोकसभा 2024 मध्ये संधी मिळवून देऊ शकतो. आमदार प्राजक्त तनपुरे यांनी येथे राजकीय कस लावल्यास आणि त्याचा फायदा घेतल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लोकसभेबरोबर विधानसभादेखील सोपी होऊ शकते.

आमदार तनपुरे यांच्याकडे जसे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील विरोधक आहेत, तसेच मंत्री विखेंकडेदेखील आमदार तनपुरे विरोधक आहेत. त्यामुळे तनपुरे-विखे यांच्यातील राजकीय लढाई खरोखर आहे की, लुटुपुटीची आहे, यावर मतमतांतरे आहे. अनेकदा दोघांनी राहुरी विधानसभा मतदारसंघात एकमेकांच्या सोयीच्या भूमिका घेतल्याची चर्चा सततच होत असते. विखेंना घेतलेल्या राजकीय पंग्याची किंमत अनेकांना अनेकदा मोजावी लागली. या त्यांच्या राजकीय खेळीचा विखेंना कधी फायदा होतो, तर कधी राजकीय नुकसानदेखील होते. मंत्री विखेंच्या मदतीने शिवाजी कर्डिले नगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. राहुरी विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाची ताकद मर्यादित आहे. आणि ती विखे यांच्यासमवेत आहे. शरद पवार यांचे राहुरी विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष राहिले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला या वेळी नगर दक्षिण लोकसभा कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचे, असा चंग त्यांनी बांधला आहे. यासाठी ते काय करिश्मा करतात आणि राहुरी विधानसभा मतदारसंघ त्यांच्या करिश्म्याला किती साथ देतो, हे लोकसभा 2024 च्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

( Edited By : Akshay Sabale )

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT