BJP, congress, NCP, Shiv Sena Sarkarnama
विश्लेषण

Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या विरोधात वर्षभरापूर्वी नाराजी, आताही महाआघाडी पुढे असल्याने भाजप चिंतेत!

BJP : एका सर्वेक्षणात भाजप पिछाडीवर, नेत्यांची चिंता वाढली...

सरकारनामा ब्यूरो

संजय परब

Mumbai News : वर्षभरापासून भाजप संपूर्ण देशात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जनमताचा अंदाज घेत आहे. यासाठी कॉल सेंटरमधून तसेच प्रसंगी जनतेच्या दारात जात भाजपविषयी लोकांच्या भावना जाणून घेतल्या जात आहेत. या अंदाजात महाराष्ट्रात तरी जनतेचा कौल भाजप महायुतीच्या बाजूने जाताना दिसत नाही.

शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन भाजपने ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो यशस्वी झालेला नसल्याने अजित पवार यांना साथीला घेतले आहे. तीन इंजिनचे सरकार असूनही गाडी पुढे जात नसल्याने भाजपमध्ये चिंतेचे सूर आळवले जात आहेत. याला आणखी एक निमित्त ठरले आहे, एका खासगी संस्थेच्या अहवालाचे!

2024 च्या लोकसभा निवडणुकीला आता चार-एक महिने उरले असून भाजपने त्यासाठी वर्षभरापासून कंबर कसली आहे. त्यांचे जिल्हानिहाय कॉल सेंटर कामाला लागले असून या वर्षाच्या सुरुवातीपासूनच या सेंटरमधून लोकांना फोन जात होते. भाजप महायुतीविषयी काय मत आहे, असे विचारले जात असताना बहुतांशी लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. दुसऱ्याचे पक्ष फोडून भाजप स्वतःला मोठे करत आहे, हे लोकांना पटलेले नाही आणि तसे त्यांनी बोलून सुद्धा दाखवले आहे.

राज्याच्या राजधानीत मुंबईत तर ही नाराजी मोठ्या संख्येने दिसून आली होती. शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा गट) उद्धव ठाकरे यांच्या प्रती सहानभूती असल्याचे समोर आले होते. सहानुभूतीची ही लाट ओसरून मतदार भाजप-एकनाथ शिंदे शिवसेना यांच्या सोबत जाईल, असा सत्ताधाऱ्यांचा अंदाज होता. पण तसे होताना दिसत नसल्याने मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकलली जात आहे. तीच गोष्ट राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आहे. कुठेच महायुतीला बहुमताचा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत यात्रा काढत लोकभावना समजून घेतल्या. मात्र बऱ्याच ठिकाणी लोकांनी त्यांना चार गोष्टी सुनावल्या होत्या. काही ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी लोकांनी चांगली मते व्यक्त केली असली तरी राज्यातील महायुतीच्या कारभाराविषयी साफ नाराजी बोलून दाखवली. यामुळे आता महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात आता मोदींचा चेहरा दाखवून भाजप मतांचा जोगवा मागणार आहे. दिल्लीत नुकत्याच झालेल्या भाजपच्या बैठकीत सुद्धा याच मुद्यावर एकमत झाले असून आता केंद्र सरकारच्या पाच वर्षांत राबवलेल्या योजना घेऊन लोकांसमोर जाण्याचे आदेश खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे यांचा बालेकिल्ला असलेला ठाणे जिल्हा वगळता राज्यात मुख्यमंत्र्यांची ताकद कुठे दिसत नाही. तीच गोष्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची असून पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात विखुरलेली त्यांची ताकद आहे. संपूर्ण महाराष्ट्राला ना शिंदे, ना अजितदादा एकहाती आपल्या बाजूने वळवून घेतील, असे चित्र दिसत नसल्याने भाजप पक्षश्रेष्ठी राज्यातील पक्षाच्या नेत्यांवर नाराज आहेत. यातच भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते सुद्धा पक्षाच्या भूमिकेने निराशेच्या गर्तेत लोटले गेले आहेत. आपणच भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांना भाजपमध्ये पायघड्या घालण्याचा निर्णय त्यांना रुचलेला नाही. भाजपच्या या शेवटचा निष्ठावंत कार्यकर्त्याने सत्ता नसताना आणि असताना सुद्धा कधीच घेतला वसा टाकलेला नाही. विशेष म्हणजे तो उतला, मातला सुद्धा नाही. तो आपल्या मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी बांधील आहे. पण, सत्ताकारणासाठी दिल्लीवरून आदेश निघत असल्याने एकूणच शेवटच्या कार्यकर्त्याची तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करण्यासारखी परिस्थिती झाली आहे.

भाजपच्या कॉल सेंटरच्या सर्व्हेत बहुमताचा कौल पक्षाच्या बाजूने जाताना दिसत नसताना सी व्होटरच्या पोलमध्ये महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यांना फक्त 19 ते 21 जागा मिळण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये एकट्या भाजपला 23 जागा मिळाल्या होत्या. आता मिशन लोकसभा हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवत वर्षभरापूर्वी तयारीला लागलेल्या भाजपने राज्यात 48 पैकी 45 जागा जिंकण्याची घोषणा केली होती. पण, निम्म्यापेक्षा त्यांच्या पदरात कमी जागा पडताना दिसत आहेत. याचवेळी महाविकास आघाडीच्या पारड्यात 26 ते 28 जागा पडण्याचा अंदाज आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला चांगले यश मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

सी-व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार, महायुतीला 37 टक्के तर महाविकास आघाडीला 41 टक्के मते मिळू शकतात. सी-व्होटरच्या सर्व्हेत लोकसभेच्या निवडणुका आज झाल्या तर कोणाचा विजय किंवा पराभव झाला असता, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या सर्व्हेत देशातील पाच मोठ्या राज्यांतील जनमत चाचण्यांचे आकडे धक्कादायक आहेत. पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांचा समावेश करून लोकसभेच्या एकूण 223 जागा आहेत. यापैकी उत्तर प्रदेशचा अपवाद वगळता कुठेच भाजपचे एकहाती वर्चस्व दिसत नाही. पंजाबमध्ये आप, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचा तृणमूल काँग्रेस आणि बिहारमध्ये नितीश कुमार-तेजस्वी यादव यांची जनता दल युनायटेड-राजद भाजपच्या पुढे आहेत. या पाच राज्यांतील जागांवरच्या विजयामुळे देशात कोणाची सत्ता येणार हे ठरते. त्यात महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने भाजपची झोप उडाली आहे.

(लेखक मुंबईस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत)

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT