uddhav thackeray raju shetty sarkarnama
विश्लेषण

Raju Shetty News : ठाकरे गटाच्या 'स्वाभिमाना'ची शेट्टींना धास्ती, मतं हवीत पण...

Rahul Gadkar

स्वाभिमानी शेतकरी संघटना ( SwaBhimani Shetkari Sanghatana ) ही स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार हीच भूमिका घेऊन माजी खासदार राजू शेट्टी ( Raju Shetty ) यांनी लोकसभेच्या ( Lok Sabha Election 2024 ) प्रचाराचा नारळ फोडला आहे. एकीकडे विद्यमान खासदारांबाबतीत असलेली नाराजी आणि शेतकरी चेहरा म्हणून शेट्टी यांना पुन्हा पसंती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास किंवा महायुतीसोबत जाणार नाही, अशी भूमिका ठरली असताना राजू शेट्टी यांनी मागील दोन महिन्यांत दोन वेळा 'मातोश्री'वर फेरफटका मारला आहे. सातत्याने स्वतंत्र राहणार, अशी भूमिका ठेवली असल्याचे शेट्टी यांनी सांगत रान उठवले असताना 'मातोश्री'वरील दुसऱ्या भेटीने मात्र त्यांच्या राजकीय सोयीचा दुर्गंध मतदारांपर्यंत दरवळत आहे. त्यामुळे शेट्टी यांना नेमकी जातीय समीकरणाची भीती आहे की ठाकरे गटाची भीती आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं युतीसोबत जाऊन खासदार पद मिळवले होते. शेतकरी चेहरा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजू शेट्टी ( Raju Shetty ) यांची ओळख देशभर आहे. मात्र, पाच वर्षांत युतीबरोबर बिनसल्याने त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीला जवळ केले. त्याचा फटका शेट्टी यांना बसला. शिवाय वंचितने उमेदवार दिल्यानं झालेलं मत विभाजन आणि मराठा समाजाने खासदार धैर्यशील माने यांच्या पदरात टाकलेली मते यामुळेच शेट्टी यांना पराभव स्वीकारावा लागला.

मात्र, मागील दोन लोकसभा निवडणुकीचा ( Lok Sabha Election 2024 ) अंदाज घेत कानाला खडा लावत आगामी लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांनी 'एकला चलो'ची भूमिका घेतली आहे. सातत्याने त्यांनी स्वतंत्र लढणार, अशी भूमिका जाहीर केली असली तरी सध्या त्यांचे दोन्ही दगडावर पाय असल्याची परिस्थिती आहे. एकीकडे महाविकास आघाडीबरोबर पाठिंब्यासाठी चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात राहून पाठिंबा मिळवण्याच्या तयारीतही ते असल्याचे बोलले जाते. याची कुणकुण राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनादेखील आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनीदेखील महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मागील दोन महिन्यांच्या काळात राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची दोन वेळा भेट घेतली आहे. या दोन्ही भेटीत शिवसेना ठाकरे गटाने मला पाठिंबा द्यावा, हीच भूमिका शेट्टींची कायम आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जर भूमिका ठरलेली असेल तर 'मातोश्री'वर जाण्याची गरज काय? असा सवाल उपस्थित होत आहे. शेट्टींची भूमिका ठाम असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ठाकरे गटाने उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या हालचालीनंतर मात्र शेट्टी यांनी सावध पवित्रा घेत, ही भेट घेतल्याचे बोलले जाते. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी चेहरा म्हणून शेट्टी निवडून आले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची ताकद त्यांच्या मागे उभी राहिली. मात्र, अशा परिस्थितीत शेट्टी यांच्याकडून विधानसभेला बळ मिळत नाही, असा आरोप शिवसैनिकांचा आहे. त्यामुळे शेट्टी यांच्यापेक्षा निष्ठावंत शिवसैनिक हातकणंगलेतून उतरावा या मागणीने 'मातोश्री'वर जोर धरला आहे. त्यामुळे त्याचाही फटका शेट्टी यांना बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शिवाय ओबीसी आणि मराठा समाजाची मत विभागणी महायुतीच्या उमेदवाराला मिळेल, असा कल आहे. मागील लोकसभा निवडणुकीप्रमाणे ही निवडणूक जातीच्या कार्डवर घेऊन जाण्याचे संकेत ही दिले जात आहेत. त्यामुळे त्याचीच भीती शेट्टी यांना आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. जर ठाकरे गटाने या ठिकाणी उमेदवार दिल्यास तिथेही मत विभाजनाचा फटका शेट्टी यांना बसण्याची शक्यता आहे.

राजू शेट्टी यांची भूमिका दुटप्पी

लोकसभेच्या निवडणुकीत आपणाला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी राजू शेट्टी यांनी दिल्लीत नितीन गडकरी यांची भेट घेतली होती, तर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली असल्याची माहिती आहे. हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी विरोधात लोकांमध्ये विरोध वाढत आहे.

हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टींना शिवसेनेनं बाहेरून पाठिंबा देण्याच्या विनंतीला काँग्रेस, राष्ट्रवादीचा आहे. त्यांची भूमिका दुटप्पी आहे, असाही आरोप महाविकास आघाडीमधील व्ही. बी पाटील यांच्याकडून होत आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT