shrikant shinde announce hemant godse nashik candidate sarkarnama
विश्लेषण

Nashik Lok Sabha Election 2024 : श्रीकांत शिंदेंनी एका दगडात केली भाजप, अजित पवार गटाची शिकार!

Hemant Godse Candidate Nashik : नाशिक येथे शिंदे गटाच्या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली.

Sampat Devgire

शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) यांनी मंगळवारी ( 12 मार्च ) हेमंत गोडसे ( Hemant Godse ) यांच्या उमेदवारीच्या घोषणेचा सिक्सर मारला. त्यांच्या या एका सिक्सरने लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी भाजप आणि अजित पवार गटाच्या राजकीय क्लृप्त्यांना एका झटक्यात उत्तर दिले. आता हे दोन्ही पक्ष नाशिकच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून बाहेर फेकले गेले आहेत.

शिवसेनेच्या शिंदे गटाचा मंगळवारी नाशिकमध्ये मेळावा झाला. हा मेळावा लोकसभेच्या निवडणुकीसाठी शक्तिप्रदर्शन म्हणून पाहिला जात होता. या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) यांनी हेमंत गोडसे ( Hemant Godse ) यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठविण्याची घोषणा केली. गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला. भाजप आणि अजित पवार गटाची उमेदवारीसाठी सुरू असलेले राजकीय डावपेच आणि कुरघोडीच्या राजकारणाला एका झटक्यात ब्रेक लागला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक लोकसभा मतदारसंघात ( Nashik Lok Sabha Constituency ) शिवसेनेचे हेमंत गोडसे ( Hemant Godse ) विद्यमान खासदार आहेत. उद्धव ठाकरे गटात फूट पडल्यावर गोडसेंनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून भाजपला पाठिंबा दिला होता. "हा निर्णय आपण उमेदवारीच्या कमिटमेंटमुळे घेतला होता," असा गोडसेंचा दावा होता.

लोकसभेच्या जागावाटपातदेखील शिंदे गटांनी त्यांच्या 13 खासदार असलेल्या जागांवर दावा केला होता. मात्र, अपेक्षा वाढलेल्या भाजपने त्यात कशी कात्री लावता येईल, यासाठी डावपेच आखण्याचे काम सुरू केले होते. त्यातच कोणतीही अनुकूलता नसताना अजित पवार गटातही इच्छुकांची संख्या वाढू लागली होती. यामध्ये निवृत्ती अरिंगगळे तसेच खुद्द राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचेदेखील नाव घेतले जात होते. या सगळ्या राजकारणात भाजपने पडद्यामागून सूत्रे हलवली. त्यानुसार शांतीगिरी महाराज यांनी नाशिकच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीने शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती.

शांतीगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची घेतलेल्या भेटीचा संबंध थेट हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीबाबत होता. त्यामुळे गोडसे समर्थक तसेच अनेक कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते. त्यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे तसेच शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून नाराजी व्यक्त केली होती. मोठ्या प्रमाणात या भेटीचे पडसाद उमटल्याने शिंदे गटही सावध झाला. त्यांनी शांतीगिरी महाराज यांची पुढील भेट रद्द करीत त्यांना निवडणूक न लढवण्याचा थेट सल्लाच देऊन टाकला. त्यानंतर झालेल्या या मेळाव्यात खासदार शिंदे यांनी हेमंत गोडसे हे उमेदवार असतील, अशी स्पष्ट घोषणा केली.

शिवसेनेत फूट पाडताना भाजपने या गटाला अनेक आश्वासने दिली होती. हे लपून राहिलेले नाही. यामध्ये ज्या खासदारांनी पाठिंबा दिला त्यांना उमेदवारी अपेक्षित होती. मात्र, आता ऐनवेळी भाजपला हे खासदार निवडून येणार नाहीत, अशी स्वप्ने पडू लागली होती. त्यामुळेच भाजपने शिंदे आणि अजित पवार गटावर कमी जागांसाठी दबाव वाढवला होता. त्यांच्या या दबावतंत्राच्या राजकारणाला दोन्ही पक्ष काही प्रमाणात बळी पडत असल्याचे चित्र होते. नाशिक येथे झालेल्या मेळाव्यात खासदार शिंदे यांनी एका दगडात हे दोन्ही पक्षी मारले. त्यातून शिंदे गटांचा मार्ग सुकर करून टाकला. त्यांच्या या निर्णयाने भाजपच्या कूटनीतीला मोठा फटका बसला आहे. विशेषतः या पक्षाकडून उमेदवारीच्या अपेक्षेने निवडणुकीची तयारी करीत असलेल्या दिनकर पाटील, केदा आहेर यांसह विविध इच्छुकांना मोठा झटका बसला आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT