rahul gandhi soniya gandhi maneka gandhi varun gandhi sarkarnama
विश्लेषण

Lok Sabha Election 2024 : पिलीभीतची 35, तर अमेठीची 25 वर्षांची परंपरा खंडित!

Pilibhit And Amethi Lok Sabha Constituency : पिलीभीतमध्ये 35 तर अमेठीत 25 वर्षांनी गांधी घराण्याबाहेरचे उमेदवार निवडणुकीत उभे राहिल्याचे पाहायला मिळाले.

Sandeep Chavan

Uttar Pradesh News, 27 May : उत्तरप्रदेशातील अमेठी ( Amethi ) आणि पिलीभीत ( Pilibhit ) हे दोन्ही गांधी घराण्याचे पारंपरिक लोकसभा मतदारसंघ. अमेठीत 1999 पासून सोनिया गांधी ( Soniya Gandhi ) आणि राहुल गांधी तर पिलीभीतमध्ये 1989 पासून मनेका गांधी आणि वरुण गांधी या दोन्ही माय-लेकांनी लोकसभा निवडणूक लढवली आहे. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ही परंपरा खंडित झाली. त्यामुळं पिलीभीतमध्ये 35 तर अमेठीत 25 वर्षांनी गांधी घराण्याबाहेरचे उमेदवार निवडणुकीत उभे राहिल्याचे पाहायला मिळाले.

अमेठी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहाता 1999 पासून 2019 पर्यंतच्या सर्व लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधी ( Sonia Gandhi ) आणि राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी निवडणूक लढवली आहे. 1999 मध्ये सोनिया गांधी अमेठीतून निवडून आल्या तर 2004, 2009 आणि 2014 या तिन्ही निवडणुकीत राहुल गांधी विजयी झाले. मात्र 2019 मध्ये भाजपच्या स्मृती इराणी ( Smriti Irani ) यांनी त्यांचा पराभव केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोनिया गांधी यांनी यावेळी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राहुल गांधी अमेठीतून न लढता पहिल्यांदाच रायबरेलीतून लढताना दिसले. सध्या राज्यसभा खासदार असलेल्या सोनिया गांधी रायबरेलीतून 2004, 2009, 2014 आणि 2019 अशा चार वेळा खासदार राहिल्या आहेत.

त्यामुळं अमेठी मतदारसंघात 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच गांधी घराण्याबाहेरील उमेदवार निवडणूक लढताना दिसला. यावेळी अमेठीत राहुल गांधी यांच्याऐवजी काँग्रेसकडून किशोरीलाल शर्मा यांनी भाजपच्या स्मृती इराणी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली.

पिलीभीत लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहाता 1989 पासून 2019 पर्यंतच्या सर्व लोकसभा निवडणुकीत मनेका गांधी ( Maneka Gandhi ) आणि वरुण गांधी ( Varun Gandhi ) यांनी निवडणूक लढवली आहे. 2009 चा अपवाद वगळता मनेका गांधी यांनी पिलीभीतमधून लढलेल्या 1989, 1996, 1998, 1999, 2004 आणि 2014 या सर्व निवडणुका जिंकल्या.

2009 ला पिलीभीतमध्ये त्यांच्या जागी वरुण गांधी यांनी, तर मनेका गांधी यांनी अवोनला या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेव्हा दोन्ही ठिकाणी या माय-लेकांनी विजय मिळवला होता. 2014 मध्ये मनेका गांधी पिलीभीतमधून, तर वरुण गांधी सुलतानपूरमधून निवडणूक लढले आणि दोघेही जिंकून आले.

2019 मध्ये दोघांच्या मतदारसंघांची पुन्हा अदलाबदल झाली. वरुण गांधी पिलीभीतमधून, तर मनेका गांधी सुलतानपूरमधून निवडणूक लढल्या आणि पुन्हा एकदा दोघेही विजयी झाले. सलग तीन वेळा खासदार राहिलेल्या वरुण गांधी यांना 2024 च्या निवडणुकीत मात्र भाजपनं तिकीट काही दिलं नाही.

परंतु, सुलतानपूरच्या विद्यमान खासदार मनेका गांधी यांना मात्र भाजपनं पुन्हा एकदा तिथूनच निवडणूक रिंगणात उतरवलं. म्हणजे वरुण गांधी यांना तिकीट न मिळाल्यानं पिलीभीतमधून निवडणूक लढता आली नाही, तर मनेका गांधी या सुलतानपूरमधून लढल्या म्हणून त्याही पिलीभीतमधून लढू शकल्या नाहीत.

त्यामुळं पिलीभीत मतदारसंघात 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच गांधी घराण्याबाहेरील उमेदवार निवडणूक लढताना दिसला. यावेळी पिलीभीतमध्ये भाजपकडून वरुण गांधी यांच्याऐवजी जितीन प्रसाद यांनी समाजवादी पक्षाच्या भगवत शरण गंगवार यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली.

एकूणच काय तर काँग्रेसमधील गांधी घराण्याकडं पाहिलं असता राहुल गांधी यांच्या आई सोनिया गांधी या 2024 ची लोकसभा निवडणूक लढल्या नाहीत. पण, राहुल गांधी यांनी निवडणूक लढवली तर तिकडं भाजपकडील गांधी घराण्याकडं पाहिलं असता वरुण गांधी यांची आई मनेका गांधी या 2024 ची लोकसभा निवडणूक लढल्या. पण, वरुण गांधी निवडणूक लढले नाहीत.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT