Madhuri Dixit Nene Sarkarnama
विश्लेषण

Lok Sabha Election 2024 : धक धक गर्लला रिंगणात उतरवून भाजप कुणाची धाकधूक वाढवणार?

अय्यूब कादरी

lok Sabha Election 2024 : अनेक चित्रपट कलाकारांना राज्यसभा, लोकसभेत जाण्याची संधी मिळाली. मात्र, अपवाद वगळता एकानेही लक्षणीय कामगिरी केली नाही. आता धक धक गर्ल माधुरी दीक्षित भाजपकडून मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना काही कलाकारांना मतदारांनी भरघोस मतांनी विजयी केले. माधुरी यांच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी आहे. त्यांची चंदेरी दुनियेतील कारकीर्द जवळपास थांबली आहे. उत्तर मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे दिग्गज नेते कै. प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम राव या करत आहेत. पूनम महाजन राव यांना डावलून माधुरी यांना उमेदवारी दिल्यास भाजपमध्ये नव्या वादाला तोंड फुटणार आहे. या पार्श्वभूमीवर माधुरी दीक्षित यांच्यामुळे धक धक विरोधकांची वाढेल की भाजपची, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

80 ते 90 चे दशक गाजवणाऱ्या माधुरी दीक्षित

भारतीय चित्रपटसृष्टीत 80 आणि 90 चे दशक गाजवलेल्या माधुरी दीक्षित यांना मुंबईतील कोणत्या मतदारसंघातून भाजप उमेदवारी देणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही, तरीही उत्तर मध्य मतदारसंघाची चर्चा सुरू आहे. संपर्क फॉर समर्थन अभियानाअंतर्गत २०१८ मध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी माधुरी दीक्षित यांची त्यांच्या निवसास्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळापासून माधुरी राजकारणात येणार अशी चर्चा सुरू झाली. मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे राहुल शेवाळे करतात. सध्या ते शिंदे गटात आहेत. मुंबई उत्तरमधून भाजपचे गोपाळ शेट्टी, मुंबई उत्तर पूर्वमधून भाजपचे मनोज कोटक आणि मुंबई उत्तर मध्यमधून भाजपच्या पूनम राव विजयी झालेल्या आहेत.

मुंबई उत्तर पश्चिममधून शिवसेनेचे (शिंदे गट) गजनान कीर्तिकर विजयी झालेले आहेत. मुंबई दक्षिणमधून शिवसेनेचे (ठाकरे गट) अरविंद सावंत विजयी झाले आहेत. भाजपला राज्यात मिशन ४५ यशस्वी करायचे आहे, म्हणजे लोकसभेच्या ४५ जागा जिंकायच्या आहेत. आता माधुरी दीक्षित यांना उमेदवारी द्यायची म्हटली तर सध्याच्या चर्चेनुसार भाजपला आपल्याच एका खासदाराला डच्चू द्यावा लागणार आहे. हे नाही झाले आणि माधुरी दीक्षित यांनी उमेदवारी द्यायचीच ठरली, तर मुंबई दक्षिण मतदारसंघाचा विचार होऊ शकतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याआधी कोणत्या कलाकारांना मिळाली होती संधी...

राज्यसभेत चित्रपटसृष्टीतून पहिल्यांदा संधी मिळाली पृथ्वीराज कपूर यांना. १९५२ ते १९६० दरम्यान ते राज्यसभेचे सदस्य होते. त्यांच्यानंतर नर्गिस दत्त यांना नामांकन मिळाले. १९८० ते १९८१ अशी दोन वर्षे त्या राज्यसभेवर होत्या. त्यानंतर चंदेरी दुनियेतील अनेकांना अशी संधी मिळाली. जावेद अख्तर, रेखा, जया बच्चन आदींना राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली आहे. जयाप्रदा यांनी तर लोकसभा आणि राज्यसभेतही प्रतिनिधित्व केले आहे. दाक्षिणात्य मेगास्टार चिरंजीवी केंद्रीय मंत्री होते. जया बच्चन वगळता उर्वरित कलाकारांना फारशी छाप पाडता आली नाही. रेखा या तर सभागृहात उपस्थित राहतच नव्हत्या असे समोर आले होते. सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय मंत्री असताना त्यांनी जया बच्चन यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे वाद निर्माण झाला होता.

अमिताभ बच्चन यांनीही केली होती राजकारणात एन्ट्री

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी १९८४ मध्ये तत्कालीन अलाहाबाद मतदारसंघातून (आता प्रयागराज) दिग्गज नेते हेमवतीनंदन बहुगुणा यांचा दोन लाख मतांनी पराभव केला होता. मात्र, त्यांनाही उल्लेखनीय कामगिरी करता आली नव्हती. त्यावेळी ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे निकटवर्तीय होते. लोकसभेत दणक्यात एन्ट्री मिळवल्यानंतरही वादात नाव आल्यामुळे त्यांनी राजकारण सोडून दिले होते. प्रसिद्ध अभिनेता गोविंदा यांनीही भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांचा २००४ मध्ये मुंबई उत्तर मतदारसंघातून धक्कादायक पराभव केला होता. मात्र, गोविंदा यांनाही आपल्या कामाद्वारे कोणत्याही प्रकारची छाप पाडता आली नव्हती. अमिताभ बच्चन यांनी निवडणूक लढवली, त्यावेळी ते सुपरस्टार बनले होते. लोकप्रियतेच्या शिखरावर होते. त्यामुळे राजकारणात नवखे असूनही त्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणा यांचा दणदणीत पराभव केला होता. आपल्या मित्राचा विजय सुकर करण्यासाठी राजीव गांधी यांनी त्यावेळी सर्व प्रकारची रसद पुरवली होती. गोविंदा यांनी राम नाईक यांचा पराभव केला, त्यावेळी तेही लोकप्रियतेच्या शिखरावर होते.

काय आहे भाजपचा प्लान ?

माधुरी दीक्षित यांच्याबाबतीत मात्र परिस्थिती थोडी वेगळी आहे. त्यांची सिनेसृष्टीतील कारकीर्द आता थांबलेली आहे. शिवाय अभिनेते, कलाकारांना निवडून देऊन लोकांच्या पदरी फारसा चांगला अनुभव पडलेला नाही. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या पूनम महाजन राव यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केला होता. पूनम महाजन या कै. प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. त्यांना डावलून माधुरी दीक्षित यांना उमेदवारी दिली तर ते भाजपच्या अंगलट येऊ शकते. शिवाय माधुरी दीक्षित या आता काही लोकप्रियतेच्या शिखरावर वगैरे नाहीत. विशेष म्हणजे, लोकसभा, राज्यसभेत गेलेल्या कलाकारांचा अनुभव पाहता माधुरी दीक्षित यांच्याबाबतीतही मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. केवळ जागा जिंकण्यासाठी म्हणून राजकीय पक्ष सेलिब्रिटीजना उमेदवारी देतात, हे लोकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे माधुरी दीक्षित यांच्यामुळे विरोधकांची धक धक वाढेल की भाजपचीच, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

SCROLL FOR NEXT