Prakash Ambedkar Sarkarnama
विश्लेषण

Assembly Election 2024 : ‘वंचित’ स्वतंत्र लढणार, मतांचा टक्का वाढला तर मविआ, महायुतीलाही फटका

Mahayuti, Mahavikas Aaghadi Vanchit Bahujan Aaghadi : लोकसभा निवडणुकीत अपयश पदरी पडल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकही वंचित स्वबळावर लढणार, असे दिसत आहे.

अय्यूब कादरी

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीही आंबेडकर यांनी मोदी, शाह यांच्यावर सातत्याने टीका केली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी, शाह यांचे महाराष्ट्रात दौरे वाढले आहेत. मोदी, शाह यांनी कितीही दौरे केले तरी मतदारांवर त्याचा प्रभाव पडणार नाही, असे आंबेडकर म्हणाले आहेत.

प्रकाश आंबेडकर हे सडेतोड, परखड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. ते हातचे राखून बोलत नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी आणि शाह यांच्यावर महाविकास आघाडीकडून प्रचंड टीका करण्यात आली होती. एक काळ असा होता की मोदी यांच्यावर टीका केली की त्यांना फायदा होत असे. मोदींवरील टीका लोकांना सहन होत नसे. जितकी टीका होईल तितकी अधिक सहानुभूती मोदी यांना मिळत असे. मात्र आता चित्र बदलू लागले आहे.

मोदींवर टीका केली की विरोधक जिवंत आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्या मोदी, शाह यांच्यावरील टीकेमुळे महायुतीसह महाविकास आघाडीचाही खेळ बिघडणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत जाणार, अशी चर्चा होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांच्या चर्चेच्या फेऱ्या झाल्या, मात्र त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही. आंबेडकर यांनी त्यावेळी केलेली जागांची मागणी अवास्तव आहे, अशी टीका महाविकास आघाडीकडून झाली होती. अखेर आंबेडकर महाविकास आघाडीसोबत आले नाहीत. त्यांच्यावर टीका-टिपण्णी झाली, असे असले तरी प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत आम्हाला आदर आहे, असे विधान महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी केले होते.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या पदरात अपयश पडले. त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. खुद्द प्रकाश आंबेडकर यांचाही पराभव झाला. आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबच गेले असते तर त्यांच्याही काही जागा निवडून आल्या असत्या. महाविकास आघाडीच्याही काही जागा वाढल्या असत्या, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले होते.

विधानसभा निवडणुकीत आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत जाण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. ते भाजपसोबत जातील, अशी शक्यता दिसत नाही. 2019 च्या निवडणुकीत वंचित आणि एमआयएमची आघाडी होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या वाटा वेगळ्या झाल्या. विधानसभा निवडणुकीतही ते एकत्र येणार नाहीत, असे चित्र सध्यातरी दिसत आहे.

राज्यात तिसरी आघाडीही उदयाला आली आहे. परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी, असे तिचे नामकरण झाले आहे. या आघाडीत आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य पक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष, वामनराव चटप यांचा स्वतंत्र भारत पक्ष, शंकरअण्णा धोंडगे (महाराष्ट्र राष्ट्र समिती) आदींचा समावेश आहे. वंचित या तिसऱ्या आघाडीत जाणार, अशी चर्चा होती, मात्र ती आतापर्यंत तरी खरी ठरलेली नाही. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात, याकडेही लक्ष लागलेले आहे.

आंबेडकर हे स्वतंत्र लढण्याचीच शक्यता अधिक आहे. तिसऱ्या आघाडीमुळे आधीच मतविभागणीचा धोका आहे. तिकडे, राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही स्बळावर लढणार आहे. तिसरी आघाडी, मनसे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे होणाऱ्या मतविभागणीचा फायदा कोणाला होईल, की हे तिन्ही पक्ष, आघाडी किंगमेकर बनणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला मिळणाऱ्या मतांचा टक्का घसरला होता. विधानसभा निवडणुकीला तो वाढला तर महाविकास आघाडी आणि महायुतीचीही धडधड वाढू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT