Eknath Shinde Devendra fadnavis Ajit pawar sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Budget 2024: घाम फोडणारे मुद्दे विरोधकांच्या हाती; शिंदे, फडणवीस, पवारांना अधिवेशन जड जाणार?

अय्यूब कादरी

Mumbai News: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. मराठा समाजाला आरक्षणाचा विषय विरोधकांनी उचलून धरला, मराठा समाजाला आरक्षण द्या, फसवणूक करू नका, असे म्हणत विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह राज्यातील वाढती गुन्हेगारी, गोळीबाराच्या घटनांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत. विरोधक कमकुवत दिसत असले तरी मुद्दे कळीचे असल्यामुळे सत्ताधाऱ्यांना हे अधिवेशन जड जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 फेब्रुवारीला सुरू झाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक पहिल्याच दिवशी आक्रमक झाले. मराठा समाज, ओबीसी समाजाची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षणाचे आंदोलन पुन्हा पेटले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राहिलेले त्यांचे सहकारी आता त्यांच्यावर आरोप करू लागले आहेत.

जरांगे पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढावा, यासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. अशातच जरांगे पाटील यांनी 25 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला. फडणवीस यांनी सलाइनमध्ये विष टाकून मला मारण्याचा प्रयत्न केला, असा तो आरोप होता. त्यानंतर खळबळ माजली.

हा आरोप केल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषणस्थळावरून उठून फडणवीस यांच्या सागर बंगल्यात जाण्याची घोषणा केली होती. दुसऱ्या दिवशी ते परत फिरले. त्यावरून मोठे आरोप-प्रत्यारोप झाले. जरांगे पाटलांचा बोलविता धनी कोण, अशी टीका भाजपकडून सुरू झाली. बोलविता धनी कोण हे कळत नसेल, तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असा पलटवार विरोधकांकडून करण्यात आला. त्यातच आंदोलन पेटले आणि जालना जिल्ह्यात बस पेटवून देण्यात आली. जालन्यासह लगतच्या काही जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. बाहेर सुरू असलेल्या या घटना, घडामोडींचे पडसाद अधिवेशनात नक्कीच उमटणार आहेत.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील शिवसेनेचे माजी नगरसवेक यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यापूर्वी पुण्यात शरद मोहोळ या गुंडाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पुण्यात नुकताच अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. यासह आणखी काही ठिकाणी गोळीबाराचे प्रकार घडले आहेत.

राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या खुनाचेही प्रकार घडले आहेत. पुण्यात गोळीबाराच्या प्रकारानंतर काही दिवसांतच जळगावात गोळीबार झाला होता. त्याच्यानंतर मालेगावात गोळीबार करून तरुणाचा खून करण्यात आला होता. त्यापूर्वी नाशिकमध्ये एकाच दिवशी दोघांचा खून झाला होता. हे प्रकार गृहमंत्री फडणवीस यांच्यासाठी अडचणीचे ठरू शकतात. फडणवीसांची आणि सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधकांच्या हाती महत्त्वाचे मुद्दे लागले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले असून, अंतरवाली सराटी येथे साखळी उपोषण सुरूच राहणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बेमुदत उपोषण स्थगित केल्याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. दोन दिवसांनंतर ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत. जरांगे पाटील यांनी फडणवीस (Devendra fadanvis) यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांचा बोलविता धनी शरद पवार, उद्धव ठाकरे असल्याचे प्रत्युत्तर भाजप नेत्यांनी दिले आहे. या मुद्द्यावरूनही विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा मुख्यमंत्री शिंदे यांना फायदेशीर ठरतील, अशी वक्तव्ये केली आहेत, असे विरोधी आमदारांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले. मागे आरक्षणाचे आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) सक्रिय होते आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शांत होते. यातून तर असे प्रकार होत नाहीत ना, बोलविता धनी कोण हे शोधण्यापेक्षा जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी विरोधकांनी केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरूनही सरकारची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. सरकारने घोषणा केल्या, मात्र शेतकऱ्यांना मदत केली नाही, असा आरोप विरोधकांनी केला आहे. शेतमालाला भाव मिळत नाही.

कांदा निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या मुद्द्यांवरूनही आक्रमक होण्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या कायम असतात, त्या सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला जात नाही. याच्या जोडीला आता मराठा आरक्षण आंदोलन, गोळीबाराच्या घटना हे मुद्दे विरोधकांच्या हाती लागले आहेत. यावरून नुसताच गोंधळ न होता सकारात्मक चर्चा आणि त्यावर उपाययोजना झाल्या तर विरोधकांची आक्रमकता उपयुक्त ठरेल.

R

SCROLL FOR NEXT