Mumbai News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. त्यांच्या देहबोलीत कमालीचा आत्मविश्वास दिसत होता, जो की दिल्लीहून आलेल्या पक्षश्रेष्ठींमध्येही दिसत नव्हता. शपथविधी सोहळा आणि त्यानंतरची त्यांची विधाने, त्यांनी सही केलेली पहिली फाईल, हे सर्व पाहता भाजपमध्ये आणि राज्याच्या राजकारणातही देवेंद्र फडणवीस यांचा नव्याने उदय झाल्याचे दिसत होते.
मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये दिल्लीश्वरांनी धक्कातंत्राचा वापर केला होता. तसेच धक्कातंत्र महाराष्ट्रातही वापरले जाणार, अशी शक्यता होती. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. त्यामुळे दिल्ली हतबल झाली. दिल्लीतील राजकीय समीकरणेही बदलली आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.
त्यामुळे दिल्लीश्वरांना महाराष्ट्रात धक्कातंत्राचा वापर करता आला नाही. फडणवीस यांची पक्षसंघटनेवर असलेली मजबूत पकडही त्यासाठी कारणीभूत ठरली. एक तर मी राहीन नाहीतर तू राहशील, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना उद्देशून केली होती. त्या टीकेला उत्तर देण्यासाठी फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अत्यंत योग्य अशी वेळ निवडली.
राजकारणात मीही राहीन आणि उद्धव ठाकरेही राहतील, असे उत्तर त्यांनी दिले. तत्पूर्वी, सुडाचे राजकारण करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट करून टाकले होते. फडणवीस यांचे हे वर्तन मातब्बर, धोरणी राजकीय नेत्याला शोभेल असेच आहे. फडणवीस यांनी ठाकरे यांना दिलेले हे उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ऐकलेच असावे.
सुडाचे राजकारण करणार नाही, अशी ग्वाही देणारे फडणवीस धार्मिक सलोख्याबाबत काय भूमिका घेतात, हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. ते आपली वेगळी वाट निवडतात की रुळलेल्या वाटेवरच प्रवास कायम ठेवतात, हे येत्या काही दिवसांत समोर येणार आहे. भाजपचे बडे नेतेही ध्रुवीकरणाची भाषा करतात. निवडणुकीच्या प्रचारात धार्मिक ध्रुवीकरण होईल, अशी विधाने करतात.
फडणवीस यांचे काही निकटवर्तीय नेते तर एका विशिष्ट समुदायाविषयी अत्यंत जहाल भाषेत टीका करत असतात. राज्याला प्रगतिपथावर नेणार, असे फडणवीस म्हणाले आहेत. समाजात अस्थिरता ठेवून कोणत्याही राज्याला प्रगतीच्या वाटेवर जाता येत नाही. भाजपला ज्यांनी मते दिली नाहीत, त्यांचेही फडणवीस मुख्यमंत्री आहेत. धार्मिक सलोखा कायम राखण्यासाठी ते काही पावले उचलतात की आपल्या सहकाऱ्यांना जहाल विधाने करण्याची मुभा देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सर्वांना सोबत घेऊन राज्याची प्रगती केली तर फडणवीस यांची राष्ट्रीय राजकारणातही उंची नक्कीच वाढणार आहे. शपथविधी सोहळ्यात काही चेहरे पडलेले दिसत होते, ते या धास्तीमुळेच. देवेंद्र फडणवीस हे स्वतः निर्णय घेणारे नेते आहेत. त्यांच्याकडून अन्य कुणी त्यांना हवे तसे काम करून घेऊ शकत नाही. आता तर संघही फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे.
दिल्लीला आता ही भीतीही नक्कीच सतावत असणार. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अनेक महत्वाच्या फायली फडणवीस यांच्या नजरेखालून जायच्या. अलीकडच्या काळात मात्र फायलींवर थेट सह्या व्हायल्या लागल्या होत्या, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. शिंदे यांच्याकडून अनेक महत्वाच्या फायलींवर दिल्लीश्वरांनी सह्या करून घेतल्या होत्या. आता फडणवीस असल्यामुळे हे शक्य होणार नाही, असे सांगितले जात आहे.
शिंदे यांचा रुसवा काढून त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला लावण्यात फडणवीस यांनी महत्वाची भूमिका बजावली. शिंदे हे शिवसेनेचे (Shivsena) प्रमुख आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत, ही शिंदेंसाठी आज ना उद्या अडचणीची ठरणारी बाब आहे. शिंदे हे सत्तेत सहभागी झाले नसते, उपमुख्यमंत्री झाले नसते तर त्यांचे काही शिलेदार थेट भाजपमध्ये जातील, असा धोका होता.
हे टाळण्यासाठीच शिंदे यांना 'उप' होण्याचा धोका पत्करावा लागला आहे. सत्तेच्या बाहेर राहिले असते तर शिंदे सरकारसमोर अडचणी निर्माण करून शकले असते, एका दगडात दोन पक्षी मारणे म्हणजे काय असते, हे फडणवीस यांनी दाखवून दिले आहे. तुम्हाला फडणवीस यांची, त्यांच्या पक्षाची विचारसरणी आवडते की नाही, हा भाग वेगळा आहे. पण राजकारणात त्यांची उंची वाढली आहे, हे नाकारता येत नाही.
पक्षांतर्गत राजकारणातही त्यांचे महत्व वाढले आहे. दिल्लीतील पक्षश्रेष्ठी महाराष्ट्रात धक्कातंत्र वापरू शकले नाहीत, यातच फडणवीस यांचे महत्व अधोरेखित झाले आहे. आपले नेतृत्व सर्वसमावेशक करण्याची संधी फडणवीस यांच्याकडे चालून आलेली आहे. ती संधी ते घेतात की रूळलेल्या, मळलेल्या पायवाटेची निवड करतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
(Edited By Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.