BJP Maharashtra : विधानसभेत भाजपच्या यशाचं गमक काय? संघटन अन् व्यवस्थापन कौशल्य...

BJP gets massive success with 133 seats : व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर भाजपने जोरदार विधानसभा निवडणुकीत १३२ जागांवर जोरदार मुसंडी मारली.लोकसभा निवडणुकीत महायुतीला मविआपेक्षा केवळ १.१८ टक्के मते कमी मिळाली होती. ही तूट भरून काढण्यासाठी भाजपची यंत्रणा कामाला लागली.
Amit Shah | Devendra Fadnavis
Amit Shah | Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

BJP News: भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून २०१४ पासून उदयास आला आहे. २०१४ ला भाजपचे १२३, २०१९ ला १०५ आमदार निवडून आले. त्यानंतर आता २०२४ मध्ये तब्बल १३२ आमदार निवडून आले आहेत. तर दुसरीकडे गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी सुमार दर्जाची राहिली आहे.

सहा महिन्यांपूर्वी लोकसभेत १४ जागा मिळाल्याने महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री बनेल, अशी स्वप्ने येथील काँग्रेस नेत्यांना पडत होती. पण प्रत्यक्षात निकाल आल्यानंतर अवघे १५ आमदार निवडून आले. हा पक्ष पाचव्या क्रमांकावर फेकला गेला. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष असल्याने त्यांची तुलना करणेही आवश्‍यक आहे. कारण एकीकडे नियोजन अन् दुसरीकडे केवळ सनसनाटी आरोप करणे यावरच भर दिला गेला.

आघाडीच्या गडाला सुरूंग

विदर्भात भाजपच्या १० जागा वाढल्या असून, आमदारांची संख्या २९ वरून ३९ वर गेली आहे. मराठवाड्यात प्रतिकूल परिस्थिती असतानाही भाजपच्या आमदारांची संख्या १६ वरून १९ वर गेली. लातूर हा देशमुखांचा बालेकिल्ला आहे असे सांगितले जात असताना धीरज देशमुख यांचा लातूर ग्रामीणमध्ये पराभव केला. तर अमित देशमुख यांना लातूर शहरातून निसटता विजय मिळाला. भाजपची ही कामगिरी अनपेक्षित असल्याने काँग्रेसला चांगलाच हादरा बसला आहे. तर साखरपट्टा असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपने २८ तर महायुतीने ५२ जागा पटकावून आघाडीच्या या गडाला सुरूंग लावला आहे.

Amit Shah | Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यासाठी देवाभाऊंनी दिलं चहावाल्याला निमंत्रण!

शरद पवारांनी काय केले?

अमित शाह यांनी पश्‍चिम महाराष्ट्रावर लक्ष केले. साखर कारखानदारीचा भाग असलेल्या या मतदारसंघात सभा आणि मेळावे घेतले. शेतकऱ्यांसाठी, सहकार क्षेत्रासाठी केंद्र सरकारने काय केले हे मुद्दे शहा यांनी प्रभावीपणे मांडत शरद पवारांनी काय केले, असा प्रश्‍न उपस्थित केला. मोदी आणि शहा यांनी प्रत्येकी १० सभा घेतल्या आणि त्यास चांगले यश मिळाले. तर दुसरीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्याला धार आणण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही सभा घेतल्या.

फडणवीसांनी तेथे जाणं टाळलं

कोणत्या नेत्याने कुठे सभा घ्याव्यात याचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले. मराठवाड्यात फडणवीसांनी सभा घेतल्या असत्या तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पुन्हा भाजपला लक्ष्य केले असते. हे टाळण्यासाठी केवळ चार-पाच सभा फडणवीसांनी मराठवाड्यात घेतल्या. तर उर्वरित महाराष्ट्रात फडणवीसांनी सुमारे ६० सभा घेऊन हा भाग पिंजून काढला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती संभाजीनगर येथे सभा होत असताना फडणवीस यांनी तेथे जाणे टाळले, त्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीतील चुका भाजपने टाळल्याने मराठवाड्यात चांगले यश मिळाले आहे.

Amit Shah | Devendra Fadnavis
Rohit Pawar : बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल! मारकडवाडी मतदान प्रक्रियेवर रोहित पवार भडकले

मराठा आंदोलनाची धग कमी

विदर्भात कापसाला भाव नाही. मराठवाड्यात सोयाबीनला भाव नाही. दहा वर्षांपासून हा भाव चार हजारातच गटांगळ्या खात आहे. तर दुसरीकडे पश्‍चिम महाराष्ट्रात साखर पट्ट्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने या तिन्ही विभागात भाजपची वाईट अवस्था होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. तसेच मराठवाड्यात मराठा आंदोलनाची धग कमी झाली नसल्याने त्याचाही फटका बसण्याची चिन्हे होती.

हिंदुत्वाच्या मुद्द्याला धार

लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी आघाडीला एकगठ्ठा मतदान केले होते. विधानसभा निवडणुकीतही तेच होणार होते. त्यामुळे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सतर्क होऊन हिंदू मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी काम सुरु केले. यासाठी भाजपने ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली. ज्या ठिकाणी हिंदू विभागला गेला तेथे पराभव झाला आहे हे मतदारांना दाखवून देण्याचे काम संघाच्या प्रबोधन मंचाने शहरांत-गावोगावी सर्वत्र केले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काही मुस्लिम धर्मगुरूंनी मविआला मतदान करण्याचे आदेश काढले. त्याच्या ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या. त्यामुळे हिंदू मतदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली असताना फडणवीस यांनी ‘आपल्याला मतांचे धर्मयुद्ध करावेच लागेल,’ असे आवाहन केले. त्यामुळे मतदानाच्या तीन-चार दिवस आधी हिंदुत्वाच्या मुद्द्याला धार आली.

संघटनात्मक रणनीती

कोणत्या मतदारसंघात कोण चुकीचे काम करतो, विरोधात काम करतो, कोणत्या भागात उमेदवार अडचणीत आहे याची वस्तुस्थिती पक्षाकडे पाठवली जात असल्याने वेळीच सुधारणा करण्यावर भर देण्यात आला होता. हीच गोष्ट नेमकी विरोधकांकडून कमी पडली आहे. त्यांनी केवळ टीका आणि सनसनाटी आरोपांवर भर देऊन राजकीय वातावरण महायुतीच्या विरोधात करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही.

विधानसभेच्या प्रचार सभा, प्रचार फेरी या माध्यमातून संवाद साधला जातोच. पण भाजपने संघटनात्मक बळावर ही निवडणूक लढवली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी प्रभारी आणि प्रवासी कार्यकर्ता नियुक्त केला. या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघात ठाण मांडून प्रचारावर नियंत्रण ठेवले. त्याचा अहवाल प्रदेश व केंद्रीय पातळीवर पाठवला.

Amit Shah | Devendra Fadnavis
Ravindra Chavan: CM पदासाठी चर्चेत राहिलेले रवींद्र चव्हाण कोण? केडीएमसीचे नगरसेवक ते मंत्री

महिला शक्तीची सुप्त लाट

लोकसभेतील पराभवानंतर भाजप व महायुतीने लाडक्या बहीण योजनेची घोषणा केली. महिलांच्या बँक खात्यात नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे जमा केल्याने या योजनेच्या अंमलबजावणीबाबत महिलांमध्ये विश्‍वास निर्माण झाला. मतविभागणीचा फायदा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४३.९१ टक्के मते मिळाली. तर महायुतीला ४२.७३ टक्के मते मिळाली. पण मविआला ३० तर महायुतीला १७ जागा मिळाल्या.

तिसऱ्या पक्षाच्या मतदान करण्याचे टाळले ...

या निवडणुकीत मतदारांनी तिसऱ्या पक्षाच्या मतदान करण्याचे टाळले होते. पण आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, स्वराज्य पक्ष, बसप यांसह अन्य लहान-मोठे पक्ष रिंगणात उतरले होते. त्यात काँग्रेसच्या मताचे विभाजन झाले. लोकसभेच्या तुलनेत महायुतीला आघाडीपेक्षा केवळ १.१८ टक्के मते कमी होती. त्यांची भरपाई करण्यासाठी भाजपने यंत्रणा कामाला लागली, मतदारसंघनिहाय रणनीती आखून ती अस्तित्वात आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. त्यात चांगले यश आले आहे

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com