Sharad Pawar, Prakash Ambedkar Sarkarnama
विश्लेषण

Pawar and Ambedkar : शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या मैत्रीचे नवे पर्व !

NCP and VBA : वंचितने बारामतीत सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला. आज शिरूर येथे मंगलदास बांदल यांची उमेदवारी वंचितने रद्द केली. अद्याप इथे दुसरा उमेदवार वंचितने घोषित केला नाही. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या मैत्रीचे हे नवे पर्व महाराष्ट्रात बदल घडविणारे असेल.

Sachin Deshpande

Maharashtra Loksabha Election 2024 : वंचितने कोल्हापूर, नागपूर या मतदारसंघांत काँग्रेस उमेदवाराला थेट पाठिंबा दिला. पण, काँग्रेसचे दिल्लीतील नेते असोत की, महाराष्ट्रातील नेते त्यांनी या पाठिंबाकडे साफ दुर्लक्ष केले. वंचितने स्वतःहून साथ देण्याची तयारी दाखविली. सात जागांवर पाठिंबा देण्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली. मैत्रीसाठी हात पुढे केला तरी, काँग्रेसने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. यात काँग्रेस नेत्यांचा मोठेपणा आड येतो. पण, अशा पोकळ मोठेपणापासुन स्वतःला दूर ठेवत शरद पवार यांनी मात्र वंचितने साथ देताच तितक्याच जलद गतीने हाक दिली.

बारामतीमध्ये वंचितने उमेदवार न देण्याची घोषणा करताच शरद पवार यांनी काँग्रेसने अकोल्यात उमेदवार देण्याची गरज नव्हती, त्याविषयी आपण काँग्रेस सोबत बोलू, असे म्हणत काँग्रेसला वंचितचे महत्व पटवून दिले. पण, तरीदेखील काँग्रेसने थेट कृती करत वंचित विरोधात डाॅ.अभय पाटील यांना उमेदवारी दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी अकोला गाठले. अकोला गाठणे आणि वंचित विरोधात कृतीत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्वतः उडी घेतली. त्यांची ही कृती आणि विरोध पाहता वंचित नेत्यांनीदेखील त्यानंतर काँग्रेसकडे दुर्लक्ष केले. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सात उमेदवारांना पाठिंबाची घोषणा दोन उमेदवारांना पाठिंब्यापर्यंत थांबली. यात कोणाचे नुकसान होणार आहे हे गेल्या निवडणुकीच्या निकालावरून कोणी ही सांगू शकेल. काँग्रेसला महाराष्ट्रात वंचितमुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत फटका बसला तरी काँग्रेस नेत्यांचा यंदा आडमुठा स्वभाव अधोरेखित झाला. पण, हे सर्व होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी मात्र वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मैत्रीचे नवे पर्व सुरू केल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) त्याच बरोबर महायुतीतील तीन पक्ष यांच्यात मात्र या मैत्रीवरून जोरदार चलबिचल आहे. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या मैत्रीचे राज्यात नाही देशात पडसाद पडू शकतात इतकी राजकीय परिपक्वता या दोन्ही नेत्यांमध्ये आहे. महाराष्ट्रात शरद पवार असो की, प्रकाश आंबेडकर यांना 'खासदार' हे बिरुद लावण्याची गरज आहे काय, प्रकाश आंबेडकर यांच्या नावातच सर्व काही आहे. प्रकाश आंबेडकर हे विचारधारेची लढाई लढतात. लोकसभा निवडणुकीत ते अकोल्यात कधी ही टेन्शन मध्ये नसतात. त्यांच्या निवडणुकीचे टेन्शन हे वंचित, भारिप च्या नेत्यांना नक्कीच असते. ते जिंकले काय आणि हरले काय त्याचा त्यांच्यावर कुठलाही राजकीय परिणाम होत नाही. त्यांनी सांगितलेले कुठलेही प्रशासकीय काम थांबत नाही, अडत नाही. असेच काय ते शरद पवार यांचे देखील आहे.

महाराष्ट्रातील या दोन दिग्गज नेत्यांमध्ये मैत्रीचे नवेपर्व सुरु होत आहे. बारामती मध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात वंचितने उमेदवार न देण्याची घोषणा केली. त्याच दिवशी शरद पवार यांनी वर्धा येथे अकोल्यात वंचित विरोधात काँग्रेस उमेदवाराविषयी सुचक विधान केले. आज वंचित ने शिरुर येथे मंगलदास बांगल यांची उमेदवारी रद्द केली. दुसरा कोणताही उमेदवार घोषित केला नाही. याचा दूसरा अर्थ शिरुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे यांच्यासाठी ही निवडणुक वंचित सोईची करु पाहत आहे. बारामतीनंतर वंचित ने शिरुर येथे उमेदवार देणे टाळले तर वंचित च्या मैत्रीपर्व घट्ट होण्याची नांदी आहे. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या मैत्रीचे नवे पर्व हे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांबरोबर केंद्रातील भाजप नेत्यांसाठी डोकेदुखीचे ठरु शकते. इतकेच नाही तर बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही निवडणुक कठीण असेल. सुप्रिया सुळे यांना वंचितचा पाठिंबा यांची अडचण सुनेत्रा पवार यांना होण्याची भिती आहेच.

पण, या सर्व परिस्थितीत शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या मैत्रीचे नवे बंध विणल्या जात आहे. गेल्या अनेक दशकांचा राजकीय विरोध दोन्ही नेत्यांनी मुठमाती देत गाडल्याची स्थिती महाराष्ट्रात आहे. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर हे दोन्ही नेते एकत्र आले तर राज्यात मोठे राजकीय बदल भविष्यात होऊ शकतात. त्याचा कुठलाही गाजावाजा सध्या महाराष्ट्रात नाही. शरद पवार यांना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय स्थिती, जातीय समीकरणे तोंडपाठ आहेत. इतकेच नाही तर राजकीय वाऱ्याची अचुक दिशा पवारांना ज्ञात आहे. तशी परिस्थिती काँग्रेस मध्ये नाही. दिल्लीत अहमद पटेल यांच्यानंतर काँग्रेस मध्ये महाराष्ट्राची राजकीय जाण असलेल्या नेत्यांचा अभाव आहे. निर्णय घेण्यात काँग्रेस नेत्यांमध्ये चपळता नाही. कोल्हापुर, नागपुर येथे वंचित ने पाठिंबा दिल्यावर काँग्रेस नेतृत्वाने चुप्पी साधली.

आम्ही वंचितला तीन जागा देतो, चार जागा देतो अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोल्यात केली. पण, ही घोषणा करताना त्यांनी वंचित विरोधात उमेदवार उभा करत वंचितलाच थेट कृतीतुन नाना पटोले यांनी विरोधाचा इशारा दिला. याकडे प्रकाश आंबेडकर यांनी दुर्लक्ष करत उत्तर देखील देणे टाळले. अकोल्यात काँग्रेसने उमेदवार उभा केल्यानंतर इतर मतदार संघात वंचितचा काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा थांबला. त्यावर आता ना चर्चा होत आहे ना काँग्रेसच्या इतर लोकसभा मतदार संघात पाच उमेदवारांना पाठिंबा दिला जात आहे. काँग्रेसची संथ चाल, तत्काळ रिस्पाॅन्स न देण्याची कृती ही महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीसारखी स्थिती निर्माण करु शकते. असे होत असताना शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सुरु केलेली नवी मैत्री ही महाराष्ट्रातील राजकारणात दिशादर्शक असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT