Political News : दुभंगलेली शिवसेना, दुभंगलेली राष्ट्रवादी काँग्रेस, हातपाय गाळून घेतलेली काँग्रेस आणि एकसंघ भाजप... असे चित्र मराठवाड्याच्या आठही लोकसभा मतदारसंघांत दिसत आहे. थेट पक्ष फोडल्यामुळे भाजपवर मतदारांचा राग आहे का, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सहानुभूती आहे का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
मराठा आरक्षण हा मराठवाड्यात सध्या सर्वात मोठा मुद्दा आहे, त्याचा काय परिणाम होतो, हे पाहणेही रंजक ठरणार आहे. राम मंदिर, सीएए असे मुद्दे चालणार की महागाई, बेरोजगारी, पाणी-चाराटंचाई हे मुद्दे चालणार, यावरच महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. (Maratha Reservation)
गेल्या निवडणुकीत शिवसेनेने मराठवाड्यातील तीन जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता दुभंगलेली आणि दोन्ही आघाड्यांत विभागलेली शिवसेना या निवडणुकीला सामोरी जात आहे. उस्मानाबाद (धाराशिव), हिंगोली आणि परभणी या तीन मतदारसंघांत शिवसेनेचे अनुक्रमे ओमप्रकाश राजेनिंबाळकर, हेमंत पाटील आणि संजय जाधव विजयी झाले होते. राजेनिंबाळकर, जाधव हे आता ठाकरे गटात असून, पाटील हे शिंदे गटात आहेत.
परभणी आणि वंचित बहुजन आघाडीचा फायदा शिवसेनेला झाला होता तर छत्रपती संभाजीनगर येथे अपक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पराभूत झाले होते. हिंगोली, धाराशिव येथे शिवसेनेच्या उमेदवारांनी निर्भेळ असा विजय मिळवला होता. नांदेड, लातूर, बीड आणि जालना या चार जागा भाजपने जिंकल्या होत्या. छत्रपती संभाजीनगरची जागा एमएमआयएमला मिळाली होती.
हिंगोली मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी झालेले हेमंत पाटील (Hemant Patil) 2024 च्या निवडणुकीत उमेदवार नाहीत. शिंदे गटाकडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली होती, मात्र भाजपच्या दबावामुळे ती कापण्यात आली. पाटील यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला होता. सर्वेक्षण हेमंत पाटील यांच्या विरोधात आहे, हे कारण पुढे करून भाजपने त्यांची उमेदवारी कापण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचंड दबाव टाकला होता.
त्यामुळे हेमंत पाटील यांची हॅटट्रिकची संधी हुकली आहे. या बदल्यात पाटील यांच्या सौभाग्यवतींना यवतमाळ - वाशिम मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल, असे सांगितले जात आहे. पाटील यांच्या जागी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेने (शिंदे गट) बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांचे आव्हान आहे. वंचित बहुजन आघाडीने डॉय डी. बी. चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे.
परभणीचे शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव यांनाही हॅट्रिकची संधी असून, त्यांच्यासमोर महायुतीकडून लढत असलेले रासपचे महादेव जानकर यांचे तगडे आव्हान आहे. 'वंचित'ने येथून पंजाबराव डख यांना मैदानात उतरवले आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांनी जाधव यांना काट्याची टक्कर दिली होती. जाधव यांना 5,38,941 मते मिळाली होती. राष्ट्रवादीचे विटेकर यांना 4,96,742 तर वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर मोहम्मद खान यांना 1,49,946 मते मिळाली होती.
वंचितमुळे विटेकर यांचा खेळ बिघडला होता. महायुतीत हा मतदारसंघ भाजपला सुटल्यामुळे विटेकर यांचा पत्ता कट झाला आहे. भाजपने येथे रासपचे महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आहे. 'वंचित'ने यावेळी उमेदवार बदलला असून हवामानतज्ञ अशी ओळख असलेले पंजाबराव डख यांना उमेदवारी दिली आहे. 'वंचित'चा फटका यावेळी कोणाला बसणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने बाबासाहेब भुजंगराव उगले यांना रिंगणात उतरवले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
धाराशिव मतदारसंघातून शिवसेनेने (ठाकरे गट) ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना पुन्हा संधी दिली आहे. 2019 मध्ये त्यांनी त्यांचे चुलतबंधू, कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी राणाजगजितसिंह पाटील यांना पराभूत केले होते. राजेनिंबाळकर यांना 5,91,505 तर पाटील यांनी 4,46,747 मते मिळाली होती. त्या निवडणुकीत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढले होते. या पराभवानंतर राणाजगजितसिंह पाटील(Ranajagjit Sinh Patil) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या तिकीटावर ते तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले.
आता त्यांच्या सौभाग्यवती अर्चनाताई पाटील (Archana Patil) या महायुतीच्या उमेदवार आहेत. अर्चनाताई यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे. त्या घड्याळ्याच्या चिन्हावर लढणार आहेत. धाराशिवची लढत पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धींमध्येच होत आहे. त्यामुळे अर्थातच ही लढत रंगतदार होणार आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांची समजूत काढण्याचे आव्हान राणाजगजितसिंह पाटील आणि अर्चनाताई पाटील यांच्यासमोर आहे.
लातूरमध्ये भाजपने खासदार सुधाकर शृंगारे यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवले आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे मच्छिद्र कामत यांचा दारूण पराभव केला होता. शृंगारे यांना 6,61,495 तर कामंत यांना 3,70,835 मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे राम गारकर यांना 1,12,255 मते मिळाली होती. या मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार बदलला आहे. काँग्रेसने यावेळी डॉ. शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी दिली आहे. काळगे यांना उमेदवारी देऊन लिंगायत समाजाची मते आपल्याला मिळतील, याची काळजी काँग्रेसने घेतली आहे.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख यांनी काळगे यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली आहे. औशाचे माजी आमदार, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर यांच्यापाठोपाठ माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपला याचा फायदा होतो का, हे निकालानंतर स्पष्ट होईल. नरसिंहराव उदगीरकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत.
बीड मतदारसंघातून दोनवेळा निवडून आलेल्या प्रीतम मुंडे यांची उमेदवारी भाजपने यंदा कापली आहे. त्यांच्या जागी त्यांच्या भगिनी, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांची वर्णी लागली आहे. प्रीतम मुंडे यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांचा पराभव केला होता. प्रीतम मुंडे यांना 6,78,175 तर, बजरंग सोनवणे यांना 5,09,807 मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे प्रा. विष्णू जाधव यांना 92,139 मते मिळाली होती.
महायुतीत हा मतदारसंघ भाजपला तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर बजरंग सोनवणे हे अजितदादा पवार यांच्या गटात गेले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते शरद पवार गटात आले आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली.
दिवंगत माजी आमदार विनायकराव मेटे (शिवसंग्राम) यांच्या पत्नी ज्योती मेटे याही बीड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती, मात्र ती खरी ठरली नाही. त्या कोणत्या पक्षाकडून लढतात की अपक्ष लढतात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जालना मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांच्यावर विश्वास टाकला आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही.पण काळे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तेही तितक्याच तोलामोलाचे नेते आहेत.
गेल्या निवडणुकीत दानवे यांनी काँग्रेसचे विलासा औताडे यांचा पराभव केला होता. दानवे यांना 6,98,019 मते, तर काँग्रेसचे विलास औताडे यांना 3,65,294 मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे शरदचंद्र वानखेडे यांना 77,158 मते मिळाली होती. रावसाहेब दानवे हे या मतदारसंघातून सलग पाचवेळा विजयी झाले आहेत.
2009 मध्ये रावसाहेब दानवे विरुद्ध डॉ. कल्याण काळे अशी लढत झाली होती. त्या निवडणुकीत दानवे यांना 3,50,710 तर डॉ. काळे यांना 3,42,228 मते मिळाली होती. अवघ्या ८४८२ मतांनी दानवे विजयी झाले होते. सहकार क्षेत्राटा डॉ. काळे यांना दांडगा अनुभव आहे. या क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे. त्यामुळे यावेळची लढतही अटीतटीची होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रभाकर बकले यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.