Jalgaon News : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याचे पुढे आले आहे. या वृत्ताला त्यांनी दुजोरा देत लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मी भाजपमध्ये प्रवेश करतोय. मी हे घर बांधले आहे, मी माझ्या घरात लवकरच परत जातोय, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Ncp) आमदार एकनाथ खडसे (Ekanath Khadse) यांनी भाजपमधील (Bjp) घरवापसीबाबत ‘सरकारनामा’शी बोलताना शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपची ताकद वाढणार आहे. (Eknath Khadse News)
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जाणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. त्याबाबत संकेतही मिळत होते. मात्र, शनिवारी एकनाथ खडसे यांनी आपल्या घरवापसीवर शिक्कामोर्तब केला आहे. याबाबत शनिवारी मुंबई येथे त्यांनी ही घोषणा केली. मात्र, ते घरवापसी केंव्हा करणार याबाबत मात्र त्यांनी तारीख जाहीर केलेली नाही.
एकनाथ खडसे यांच्याशी ‘सरकारनामा’ने संपर्क साधला असता, ते म्हणाले, होय, मी भाजपमध्ये घरवापसी करणार आहे. मात्र, आज नव्हे तर लवकरच आपण तो करणार आहोत. भाजपमध्ये मी प्रवेश करतोय म्हणण्यापेक्षा मी माझ्या घरी जातोय. भारतीय जनता पक्ष हे माझे घर आहे, मी ते बांधले आहे. त्यासाठी आपण प्रयत्न केले त्यातून ते उभे राहिले आहे.
मुलांच्या नाराजीमुळे वडिलांना घराबाहेर काढल जात आणि वडिलांनाही नाईलाजास्तव जाव लागत त्या प्रमाणे आपल्यावरही नाराजी होती. त्यामुळे आपल्याला घराबाहेर काढले गेले. त्यामुळे आपणही घराबाहेर पडलो. परंतु आपण आता पुन्हा आपण आपल्या घरी जाणार आहोत, हे निश्चित आहे. लवकरच आपण आपल्या घरी जाणार असून त्याबाबतची घोषणा आपण जाहीरपणे करणार आहोत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा भाजपने उमेदवारी दिली आहे. ज्यावेळी उमेदवारी जाहीर झाली. त्यावेळेस खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या.
खडसे गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे गेले होते. त्यावेळी ते पक्षाच्या वरिष्ठांना भेटल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्याबाबतचे वृत्त त्यांनी फेटाळले होते. या वेळी खडसे यांनी आपण केवळ न्यायालयीन कामासाठी गेलो असल्याचे सांगत आपण कोणत्याही भाजपच्या नेत्यांना भेटलो नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
(Edited by : Sachin Waghmare). R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.