Devendra-Fadnavis Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra politics : भाऊबंदकीच्या राजकारणाचा दुसरा अंकही सुरू, शेवट फडणवीसच करणार?

Maharashtra’s Political Shake‑up: Two Key Events in 15 Days : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील 15 दिवसांत दोन महत्वाच्या घटना घडल्या. पहिली म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधून तब्बल 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर आले. तर दुसरी म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांच्यात निर्माण झालेले राजकीय वैर. आनंदराज यांनी शिवसेनेसोबत युती केल्याने दो्न्ही बंधूंमध्ये दरी निर्माण झाली आहे.

Rajanand More

थोडक्यात महत्वाचे :

  1. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या 20 वर्षांनंतरच्या गळाभेटीनंतर युतीच्या चर्चांना गती मिळाली असली तरी दोघांमधील स्पष्टता आणि मनसे-भाजप संबंधांमुळे संभ्रम कायम आहे.

  2. आनंदराज आंबेडकर आणि एकनाथ शिंदे युतीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन सेनेशी सर्व संबंध तोडत दलित मतांमध्ये फूट पाडणाऱ्या शक्तींना विरोध करण्याची भूमिका घेतली आहे.

  3. शिंदेंची वाढती ताकद महायुतीसाठी फायदेशीर ठरू शकते, पण त्यांची उभारणी भाजप आणि इतर घटकपक्षांसाठी अंतर्गत आव्हान ठरू शकते; त्यामुळे फडणवीस यांच्या राजकीय कौशल्याकडे लक्ष लागलं आहे.

Devendra Fadnavis’s Political Strategy : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कधी कोणता नेता कोणत्या पक्षात जाईल, कोणता पक्ष, कुणाशी युती करेल, याचा काही ठावठिकाणा राहिलेला नाही. महाविकास आघाडीचा प्रयोग ही त्याची सुरूवात होती. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फूटीने संपूर्ण राजकारण फिरलं. मागील दहा दिवसांतील दोन घटनाही महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणाऱ्या ठरल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना होत असलेल्या या घडामोडींचा शेवट कसा होणार, याबाबत मात्र साशंकता व्यक्त केली जात आहे.

पहिला अंक म्हणजे ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणं आणि युतीचे संकेत देणं. मराठी भाषेच्या मुद्द्यावर 5 जूलैला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे या बंधूंची गळाभेट झाली. दोन्ही बंधू तब्बल 20 वर्षांनंतर एकत्रित आले. मराठी विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी केवळ मराठीच्या मुद्यावर भाष्य केले. मात्र, उद्धव ठाकरेंनी थेट युतीचे संकेत दिले. एकत्र आलोय ते वेगळे होण्यासाठी नाही, असे त्यांनी ठामपणे सांगून टाकले होते.

मेळाव्यानंतर मात्र युतीबाबत टोकाचा संभ्रम वाढला आहे. हा मेळावा केवळ मराठीसाठीच होता, असे राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या कॅम्पमधून राज यांनी युतीबाबत स्पष्ट बोलण्याचा आग्रह केला जात आहे. पण राज यांनी आपल्या परवानगीशिवाय कुणीही मीडियाशी बोलणार नाही, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यातच मेळाव्याच्या काही दिवस आधी राज आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा होती. भेट झाली असेल तर कशासाठी, त्यात काय चर्चा झाली, मुंबई महापालिका निवडणुकीबाबत यतीसंदर्भात काही बोलणे झाले का, असे अनेक तर्कवितर्क लढविण्यात आले.

दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीच्या या नाट्याचा शेवट काही होईल, हे राज ठाकरेच सांगू शकतात. कारण उद्धव ठाकरे तर एका पायावर तयार असल्याचे स्पष्टपणे दिसते. पण राज आणि फडणवीसांच्या भेटीनंतरच्या या घडामोडी असल्याने या नाट्यावर पडदा टाकण्याचे काम फडणवीसच करणार, अशीही चर्चा आता राजकीय वर्तूळात सुरू झाली आहे.

ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरी महत्वाची घटना घडली ती म्हणजे दोन्ही आंबेडकर बंधूंमधील राजकीय वितुष्ट. हा भाऊबंदकीचा दुसरा अंक म्हणता येईल. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती केली. त्यानंतर काही तासांतच त्यांचे थोरले बंधू व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तातडीने राज्य कार्यकारिणी बैठक घेत त्यात आनंदराज आंबेडकर यांच्यासोबतच सर्व राजकीय संबंध तोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

आनंदराज आंबेडकर आणि त्यांच्या रिपब्लिकन सेनेला यापुढे प्रत्येकवेळी विरोध असेल, असेही वंचितकडून जाहीर करण्यात आले आहे. आंबेडकर बंधूंमधील ही दरी वरवरची वाटत असली तरी त्याला दलित मतांची मोठी किनार आहे. अर्थातच धाकट्या भावापेक्षा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितची ताकद राज्यात जास्त आहे. आनंदराज यांनीही राज्यात ठिकठिकाणी संघटनबांधणी केली आहे. एकनाश शिंदे यांच्यासाठी मतांच्या बेगमीबरोबर हा मोठा ‘मॉरल सपोर्ट’ ठरणार आहे. पण प्रकाश आंबेडकरांनी आंबेडकरी जनतेला भावनिक आवाहन करताना आरएसएस-भाजपचे बाहुले बनलेल्या आनंदराज आंबेडकर यांना मदत करणार की संविधान वाचविण्यासाठी लढणाऱ्या व्यक्तीला, असे म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या या आवाहनाचा परिणाम निवडणुकीत किती होईल, हे पुढील काही महिन्यांत समजेल. यापूर्वीही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक गट झाले. विविध आंबेडकरी विचारांच्या संघटना फुटल्या. नेत्यांनी वेगळे पक्ष काढले. त्यामुळे दलित, आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली. विधानसभा-लोकसभा निवडणुकीत अनेकदा एकमेकांना मदत केलेल्या दोन्ही आंबेडकर बंधूंमधील राजकीय वैरही आता टोकाचे बनले आहे. दलित मतांना पुन्हा एका दुभंगणारी ही घटना महत्वाची ठरली आहे.

एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांना सोबत घेत आपली ताकद निश्चित वाढवली आहे. आगामी निवडणुकांमध्ये महायुती कुठे, किती जागा एकत्रित लढवणार, हे अद्याप ठरलेले नाही. पण एकत्रित निवडणूक लढवायची झाल्यास शिंदे हे आंबेडकरांचा नातू आपल्यासोबत असल्याचे सांगताना एक मिनिटही घालविणार नाहीत. दोन-चार अधिकच्या जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी ते हक्काने बोलू शकतील. स्वतंत्र निवडणूक लढवली तरी शिंदेंचे हेच वाक्य प्रचारसभांमध्येही निश्चितच ऐकायला मिळू शकते.

शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेच्या युतीमुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही एकत्रित महायुतीमध्ये फायदाच दिसत असेल. पण एकनाथ शिंदेंची वाढती ताकदही डोकेदुखी वाढवू शकते. त्यामुळे मागील काही वर्षांत भाजप नेत्यांकडून राजकीय चाणक्य पदवी मिळवलेल्या देवाभाऊंची कुटनीती काही चमत्कार घडवणार का, याचीही उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

  1. प्रश्न: ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यामागील कारण काय होतं?
    उत्तर: मराठी भाषेच्या मुद्द्यावर 'मराठी विजयी मेळावा'त ते एकत्र आले होते.

  2. प्रश्न: वंचित बहुजन आघाडीनं कोणत्या पक्षासोबत संबंध तोडले?
    उत्तर: आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबतचे राजकीय संबंध.

  3. प्रश्न: एकनाथ शिंदेंसाठी रिपब्लिकन सेनेच्या युतीचा काय फायदा?
    उत्तर: आंबेडकरांचे नातू सोबत असल्यामुळे दलित मतांचे समर्थन आणि नैतिक ताकद वाढते.

  4. प्रश्न: देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काय अपेक्षा व्यक्त होते आहे?
    उत्तर: वाढती गुंतागुंत आणि शिंदेंची ताकद सांभाळत महायुतीची चतुराईने दिशा ठरवण्याची.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT