
Kolhapur Dairy Sector Leadership Dispute Overview : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. त्याला अजून अवधी असला तरी आतापासूनच राजकीय रंग चढायला सुरुवात झाली आहे. गोकुळ दूध संघातील चार संचालक वाढीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर गोकुळ संचालिका श्रमिका महाडिक यांनी विरोध केला आहे. तर गोकुळचे नेते आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी देखील आता या निर्णयाच्या विरोधात शड्डू ठोकला आहे.
‘गोकुळ’मध्ये महायुती म्हणून आम्ही सर्वजण एकत्र असताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हेच ‘टोकन’ देत असतील, तर ते चुकीचे असल्याचा आसूड महादेवराव महाडिक यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर ओढला आहे. संघाच्या राजकारणात टोकन देण्याचा हा नवा पायंडा धोकादायक आहे. उत्पादकांनाही हे मान्य नाही. विश्वासाने आणि चांगला कारभार केला असेल, तर ‘टोकन’ देण्याची वेळच का आली?’ असा सवाल महाडिक यांनी करत थेट मंत्री मुश्रीफ यांचे कान टोचले आहेत.
संघात संचालकांची संख्या वाढवण्याच्या पार्श्वभूमीवर महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘आम्ही संघात 32 वर्षे होतो; पण 18 पेक्षा जास्त संचालक कधी केले नाहीत. संचालक वाढवून ‘गोकुळ’चा विकास होत नाही. याउलट संघावर खर्चाचा बोजा पडणार आहे. त्यापेक्षा उत्पादकाला चार पैसे कसे जादा देता येतील, याचा विचार व्हायला पाहिजे होता. संस्था वाढवून दूध वाढले नाही. मग संचालक वाढवून दूध वाढणार आहे का? अशी खिरापत वाटू नये. त्यामुळेच या निर्णयाला आमचा विरोध आहे. संचालिका शौमिका महाडिक यांनी दर्शवलेला विरोध योग्य आहे.’
संघाच्या गेल्यावर्षीच्या अहवालात ठेवी 142 कोटी होत्या, यावर्षी त्या 542 कोटी झाल्याचे दाखवले आहे. एका वर्षात एवढ्या ठेवी कशा वाढल्या, कोठून या ठेवी आल्या याचा हिशेबही सत्ताधाऱ्यांनी द्यावा. असा सवाल करत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी संघाची निवडणूक बिनविरोध करा; पण त्यात तुम्ही स्वतः असता कामा नये, असे स्पष्ट केले.
जिल्हा बँकेचे राजकारण वेगळे आणि ‘गोकुळ’चे वेगळे. एक गुंठाही जमीन नसलेल्या उत्पादकांच्या मालकीचा हा संघ आहे. त्यांच्या हिताचा निर्णय होणे अपेक्षित असताना संघ आपल्याच ताब्यात असावा, यासाठीची खेळी संघाला कधीतरी अडचणीत आणेल, असेही महाडिक म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.