
बातमीत थोडक्यात काय?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने युती केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं सर्व राजकीय संबंध तोडल्याची घोषणा केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली वंचितच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, संविधान विरोधी विचारसरणीला पाठिंबा न देता युती करणाऱ्यांशी आता संघर्ष राहणार.
वंचितच्या मते, आरएसएस-बीजेपी हे फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेच्या पूर्ण विरुद्ध असून, अशा शक्तींशी युती करणारे संविधानवादी चळवळीचे पाईक होऊ शकत नाहीत.
Impact on Dalit Politics in Maharashtra : राज्याच्या राजकारणात बुधवारी मोठी घडामोड घडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेची युती झाली. मात्र, यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष व आनंदराज यांचे थोरले बंधू प्रकाश आंबेडकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
युतीच्या घोषणेनंतर वंचितच्या राज्य कार्यकारिणीची तातडीची ऑनलाईन बैठक झाली. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नव्याने झालेल्या युतीबाबत गांभीर्याने चर्चा झाली. त्यानंतर बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार आता यापुढे आनंदराज आंबेडकर आणि त्यांच्या रिपब्लिकन सेनेसोबतचे सर्व राजकीय संबंध तोडण्यात आले आहेत.
वंचितने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष आणि महायुतीचे घटकपक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने युतीची घोषणा केली. आम्ही ही अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्य बाब मानतो.
गेल्या 70 वर्षाच्या राजकारणात फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीने कटाक्षाने संविधानाला न मानणारे आणि आता संविधान बदलणारे आरएसएस-बीजेपी यांच्याबरोबर कधीही युती केली नाही. याचे कारण बीजेपी - आरएसएस हे संतांचा हिंदू धर्म मानत नाही, तर सनातन वैदिक धर्म मानतात. फुले शाहू आंबेडकरी चळवळ ही समता, स्वातंत्र्य, बंधुता यावर आधारित संतांच्या विचारांची पाईक आहे. हे दोन्हीही दोन विरुद्ध टोक आहेत, असे ‘वंचित’ने म्हटले आहे.
आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू असले तरी त्यांची विचारसरणी आणि वागणूक ही संविधान बदलणाऱ्या आरएसएस बीजेपी यांची समर्थक झाली आहे. आत्तापर्यंत आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनाला व त्यांच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. मात्र, आता वंचित बहुजन आघाडीने निर्णय घेतला आहे की, यापुढे आनंदराज आंबेडकर यांना व त्यांच्या रिपब्लिकन सेनेला पाठिंबा नाही, असे वंचितने निवेदनाद्वारे जाहीर केले आहे.
ज्या-ज्या संघटना संविधान बदलणाऱ्या बीजेपी-आरएसएस व त्यांच्या मित्रांबरोबर समझोता करतील ते फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे पाईक होऊ शकत नाही. त्यामुळे आनंदराज आंबेडकर व रिपब्लिकन सेनेला यापुढे आमचा विरोध राहणार असल्याचे सांगत वंचितने आता थेट आरापारची लढाई सुरू राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
प्रश्न: वंचितने कोणत्या पक्षासोबतचे संबंध तोडले आहेत?
उत्तर: रिपब्लिकन सेनेसोबतचे, म्हणजेच आनंदराज आंबेडकर यांच्या पक्षासोबतचे संबंध.
प्रश्न: युतीमुळे वंचित आघाडीने विरोध का केला?
उत्तर: कारण रिपब्लिकन सेनेने भाजप-आरएसएसशी युती केली, जे वंचितच्या संविधानवादी भूमिकेला विरोधी आहे.
प्रश्न: वंचित आघाडीचा आरोप काय आहे?
उत्तर: त्यांनी आरोप केला की, आनंदराज आंबेडकर यांची भूमिका आता संविधान बदलणाऱ्या शक्तींना समर्थन देणारी झाली आहे.
प्रश्न: वंचित बहुजन आघाडीची पुढील भूमिका काय असेल?
उत्तर: त्यांनी स्पष्ट केलं की, आता थेट आरपारची लढाई सुरू होईल आणि अशा युतींना सक्रिय विरोध केला जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.