Maharashtra Vidhansabha Election  sarkarnama
विश्लेषण

No Opposition Leader in Maharashtra: महाराष्ट्रात पहिल्यांदाच नसेल विरोधी पक्षनेता; 'CM'पदासाठी भांडणाऱ्या 'MVA'वर नामुष्की!

Maharashtra assembly lacks opposition leader after election results: लोकशाहीत विरोधी पक्षनेत्याची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे सरकारच्या मनमानी कारभारावर नियंत्रण येते. या निवडणुकीत कोणत्याही विरोधी पक्षाला एकूण जागांच्या 10 टक्के जागा मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अय्यूब कादरी

Maharashtra Vidhansabha Election Result: राज्याच्या विधानसभेत यावेळी विरोधी पक्षनेता नसेल. विरोधी पक्षनेत्यासाठी आवश्यक तितक्या जागा एकाही पक्षाला मिळणार, नाहीत, अशी चीिन्हे दिसू लागली आहेत, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा आकडा 50 च्या पुढे सरकणार की नाही, याबाबत शंका आहे.

एखाद्या पक्षाला एकूण जागांच्या दहा टक्के जागा मिळाल्या तर विरोधी पक्षनेतेपद मिळू शकते. महाराष्ट्रात यासाठी 29 जागा हव्या आहेत, मात्र त्या कोणत्याही विरोधी पक्षाला मिळत नसल्याचे दिसत आहे.

विधानसभेच्या 288 जागा आहेत. विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी कोणत्याही एका पक्षाला याच्या दहा टक्के म्हणजे 29 जागा हव्या असताता. महाविकास आघाडीतील (MVA) कोणत्याही पक्षाला इतका जागा मिळणार नाहीत, असे दिसत आहे. दुपारी दोनपर्यंत काँग्रेसचे उमेदवार 22, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 18 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार 12 जागांवर आघाडीवर होते. यात काही जागा खालीवर होऊ शकतात. फार मोठा उलटफेर होईल, याची शक्यता दिसत नाही.

(Vidhan Sabha Election 2024 result live news)

विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसमध्ये (Congress) मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाला होता. या पदाचा चेहरा कोण असावा, यावरून या दोन्ही पक्षांनी टोकाची भूमिका घेतली होती. शरद पवार यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा मुद्दा गुंडाळून ठेवण्यात आला. मात्र तोपर्यंत या वादाने महाविकास आघाडीचे पुरते नुकसान केले होते, हे आता निकालावरून लक्षात येत आहे. आता परिस्थिती अशी आहे की या तिन्हीपैकी कोणत्याही पक्षाला एकूण जागांच्या दहा टक्के जागा मिळतील, अशी शक्यता राहिलेली नाही. मुखमंत्रिपदासाठी भांडणाऱ्या महाविकास आघाडीच्या वाट्याला आता विरोधी पक्षनेतेपदही येणार नाही, अशी परिस्थिती आहे.

लोकसभेत 2014 ते 2019 दरम्यान विरोधी पक्षनेते नव्हता, कारण विरोधी बाकांवरील एकाही पक्षाला दहा टक्के जागा मिळालेल्या नव्हत्या, सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला 2014 मध्ये 44 तर 2019 मध्ये 52 जागा मिळाल्या होत्या. विरोधा पक्षनेतेपदासाठी 55 जागांची आवश्यकता असते. त्यामुळे दहा वर्षे लोकसभा विरोधी पक्षनेत्याविनाच होतीत. 2024 च्या निवडणुकीत मात्र चित्र बदलले. काँग्रेसला 99 जागा मिळाल्या आणि राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.

विरोध पक्षनेतेपदाचा दर्जा मिळाल्यापासून महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. लोकशाहीत विरोधी पक्षनेतेपदाला मोठे महत्व असते. विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असतो. त्यानुसार त्याला पगार, भत्ते, अन्य सुविधा उपलब्ध केल्या जातात. सरकारवर वचक ठेवण्याची, चुकीचे काम करू न देण्याची जबाबदारी विरोधी पक्षनेत्याची असते. एका अर्थाने तो जनतेचा आवाज असतो. विरोधी पक्षनेते झाल्यानंतर राहुल गांधी यांनी लोकसभेत सत्ताधाऱ्यांना घाम फोडला आहे. त्यामुळे हे पद किती महत्वाचे आहे, हे लक्षात येते.

(Vidhan Sabha Election 2024 result live news )

विरोधी पक्षनेता हा विधीमंडळात जनतेचा आवाज असतो. त्याच्यामुळे सरकारच्या मनमानी कामकाजावर अंकुश येतो. महत्वाचे प्रस्ताव आणि विषयांवर विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेचा सत्ताधाऱ्यांना विचार करावा लागतो. अलीकडच्या काळात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधी पक्षनेते म्हणून केलेली कामगिरी लक्षवेधी ठरली होती. विरोधी पक्षनेता नसेल तर सरकारवर कोणाचाही धाक राहात नाही, विरोधकांना आवाज मिळत नाही. विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रात बहुधा पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारच्या कारभारावर नियंत्रण कोण ठेवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT