Mahayuti Government Sarkarnama
विश्लेषण

Mahayuti News : 'स्थानिक'च्या निवडणुकीत महायुतीला तडा? भाजपची स्वबळावर मैदान मारण्याची तयारी, तर राष्ट्रवादी एकत्रित लढण्यावर ठाम !

BJP solo strategy 2025 News : भाजपने स्वबळावर मैदान मारण्याची तयारी सुरु केली असतानाच अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सावध भूमिका घेत महायुतीमध्ये एकत्रित लढण्यावर ठाम दिसत आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत एकत्रित लढणाऱ्या महायुतीमध्ये आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी स्वबळ आजमावण्याची तयारी सुरु केली आहे. विशेषतः भाजपने मित्रपक्षाना वाऱ्यावर सोडत स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असल्याने महायुतीमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे.

आतापर्यंत एकत्रित निवडणूका लढण्याची तयारी दर्शवलेल्या भाजपने अचानक स्वबळावर लढण्याची चाचपणी का सुरु केली? याची चर्चा जोरात सुरु असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्याच्या निवडणुकीत महायुतीला तडा जाण्याची शक्यता आहे. भाजपने स्वबळावर मैदान मारण्याची तयारी सुरु केली असतानाच अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सावध भूमिका घेत महायुतीमध्ये एकत्रित लढण्यावर ठाम दिसत आहे.

सुप्रीम कोर्टच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचे बिगुल लवकारच वाजणार आहे. येत्या चार महिन्यात निवडणुका होणार असल्याने सर्वच पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीसाठी महायुतीमधील तीन पक्ष स्वबळ आजमावणार की एकत्रित निवडणुका लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीवरून महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर येणार असून येत्या काळात हे तीन पक्ष मतभेद विसरून एकत्र येणार की वेगळेच राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गट व शिवसेना एकनाथ शिंदे गटाने तयारी सुरु केली आहे.

राज्यात गेल्या तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. गेल्या वर्षी लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या. त्यामध्ये लोकसभेला महाविकास आघाडीला यश मिळाले तर विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवले. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता लागली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक झालेल्या नाहीत. त्यामध्ये राज्यातील 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांची निवडणूक झालेली नाही. त्यामुळे या सर्व ठिकाणी प्रशासक पाहायला मिळत आहे. त्यातच सुप्रीम कोर्टाने 6 मे रोजी रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या चार महिन्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता निवडणुकांची लगबग सुरु आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah) यांचा नुकताच तीन दिवसाचा दौरा पार पडला. या दौऱ्यावेळी आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चाचपणी केली आहे. त्यानंतर मुंबई, पुणे व नाशिक महापालिकेत भाजपने स्वबळ अजमावण्याची तयारी करावी, अशा सूचना त्यांनी केल्या असल्याचे समजते. भाजपच्या या भूमिकेने मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण झाली आहे.

येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्यास अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नकार दर्शवला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र लढलो आहोत. त्यामुळे स्थानिकच्या निवडणुकीत जर महायुतीमधील तीन पक्ष स्वतंत्र लढले तर मतदारात संभ्रम निर्माण होईल, त्यामुळे महायुतीने एकत्रित निवडणुका लढवाव्यात, असे साकडे राष्ट्र्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घातले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी केलेली मागणी खूप अर्थपूर्ण आहे. महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तीन पक्ष जर स्वतंत्रपणे निवडणुका लढले, तर त्याचा प्रत्यक्ष परिणाम मतविभाजनावर होऊ शकतो. यामुळे मतदार गोंधळून जाऊ शकतात आणि विरोधकांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे महायुती एकत्रित लढल्यास मतांचे एकत्रिकरण होऊन महायुतीची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. त्यासोबतच सत्ता टिकवून ठेवता येणार आहे. तीन पक्ष एकत्र लढल्यास केवळ मतांचे विभाजन टाळता येईल, असे नाही, तर प्रचार, योजना आणि निधी यांचे व्यवस्थापनही अधिक परिणामकारक होऊ शकते. यावर इतर घटक पक्ष काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

विशेषतः जर एखादा पक्ष स्वबळावर लढण्याचा आग्रह धरत असेल, तर महायुतीच्या एकसंधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. त्यामुळे येत्या काळात महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्रित लढणार की स्वबळावर याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT