Mumbai News : राज्यात आगामी काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी महायुती एकत्रित लढणार आहे. नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या महापलिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दोन दिवसापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकत्रित बैठक पार पडली.
त्यामध्ये राज्यातील महापालिका निवडणुका भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढण्यावर एकमत झाले आहे. मात्र, राज्यातील 13 महापालिकेत जागावाटप, महापौर, इतर पदावरून या तीन पक्षामध्ये तिढा कायम आहे. त्यामुळे येत्या काळात एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यात 'पॉवर' गेम सुरू होणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचं नागपुरामधील निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर त्यांची आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका निवडणुकीत महायुती एकत्रित निवडणुका लढणार यावर एकमत झाले. त्याशिवाय येत्या काळात युतीचे जागावाटपासाठी तीन पक्षाची स्थानी समिती नेमण्यात येणार असल्याचे ठरले आहे. त्यामुळे येत्या काळात तीन पक्षांची युती करीत असताना जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्यासाठी फॉर्म्युला महत्त्वाचा ठरणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीमधील या तीन पक्षात जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणे गरजेचे आहे. महायुती करीत असताना महापालिकाच्या प्रभागामध्ये युती करताना अनेक अडचणी येणार आहेत. यापूर्वी महापालिका निवडणूक झाली तेव्हा शिवसेना एकसंध होती. आजही त्यातील जे नगरसेवक उद्धवसेनेतच आहेत. त्या जागा कोणाला देणार यावरून वाद आहे. या जागा शिंदे सेनेला सोडण्यास भाजपचा (BJP) विरोध आहे. गेल्या चार वर्षांत अनेक पक्षांतरे झाले आणि त्या आधारे 'सिटिंग- गेटिंग'चा फॉर्म्युला अंतिम करण्यात दोघांचाही एकमेकांना विरोध आहे.
या महापालिकांमध्ये असणार पेच
राज्यातील 13 महापालिकामध्ये पेच असणार आहे. भाजप-शिंदेसेनेची युती झाली तरी त्या ठिकाणी भाजप- शिंदे यांच्या शिवसेनेत दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होणार आहे. भाजपच्या वाट्याला गेलेल्या जागेवर शिंदेसेनेचे बंडखोर आव्हान देणार आहेत. शिंदे सेनेला सुटलेल्या जागांवर भाजपमधून बंडखोरी होईल. त्याशिवाय तिसरा भिडू अजित पवार गटही युतीतच लढला, तर जागावाटपात प्रत्येकाचे समाधान करणे मुश्किल होणार आहे. त्यामुळे माहुती करताना पेच निर्माण झाला आहे.
पद वाटपाचा तिढा
निवडणुकीनंतर महापौर, स्थायी समिती आणि इतर समित्यांचे अध्यक्ष या पदाचे वाटप निश्चित करणे गरजेचे आहे. मात्र, हा कळीचा मुद्दा बनला आहे. त्याबाबत भाजप व शिंदेंच्या शिवसेनेत दोन पक्षांत सामंजस्य निर्माण करणे सर्वात आव्हानात्मक आहे. एकनाथ शिंदे यांचा गड मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरात शिंदेच्या नेतृत्वातच गेल्यावेळी शिवसेनेची सत्ता आली होती, यावेळी तेथील शिंदेसेनेला वाटेकरी नको आहे. त्यामुळे पद वाटप करताना अडचणी येणार आहेत.
या महापालिकेत जागावाटपावरून रस्सीखेच
ठाणे, कल्याण-डोंबवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर या महापालिकेत भाजपला किमान 55 ते 60 जागा हव्या असल्याची माहिती असून, शिंदेसेनेची त्यासाठी तयारी नाही. गेल्यावेळच्या निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीत त्यावेळी राज्यात तयारी नाही, गेल्या निवडणुकात कल्याण-डोंबवलीत त्यावेळी राज्यात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेनेत प्रचंड संघर्ष झाला होता. त्यामुळे त्याठिकाणी वादावर तोडगा काढण्याकडे लक्ष लागले आहे. गणेश नाईक यांचा गड असलेल्या नवी मुंबईवरही शिंदेसेनेची नजर आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट विरुद्ध भाजप, असा कमालीचा संघर्ष दिसता. नाशिकमध्ये एकहाती सत्ता मिळविलेल्या भाजपला आता युतीमध्ये शिंदे सेना कशा प्रकारे सामावून घेणार, हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे महायुतीचे ठरले असले तरी येत्या काळात 13 महापालिकेतील जागावाटप, महापौर, इतर पदावरून तिढा कसा सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.