Manikrao Kokate Sarkarnama
विश्लेषण

Manikrao Kokate : कृषिमंत्रीसाहेब, पोशिंद्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे धाडस कुठून आले?

Agriculture Minister controversy news : एकतर कर्जमाफी केली नाही आणि त्याबाबत विचारणा करणाऱ्या शेतकऱ्यांना हिनवणारे प्रश्न कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहेत.

अय्यूब कादरी

Political News : शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिले होते. सत्ता आल्यानंतर मात्र महायुतीने या आश्नासनाला पाठ दाखवली आहे. एकतर कर्जमाफी केली नाही आणि त्याबाबत विचारणा करणाऱ्या शेतकऱ्यांना हिनवणारे प्रश्न कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहेत.

तुम्ही एखाद्या शेतातून जात असाल आणि तेथील एखादे फळ, पीक तुम्हाला आवडले आणि ते तुम्ही घेतले, तर शेतकरी काही म्हणेल का? याचे उत्तर नाही असेच आहे. शेतकरी काहीही म्हणणार नाही. शेतकऱ्यांकडे दानत असते. स्वतःची परिस्थिती हलाखीची असली तरी ही दानत शेतकरी जोपासत असतात. पिकांना योग्य भाव द्या, कर्जमाफी नको, अशी शेतकऱ्यांची प्रामाणिक भावना असते. जगाचा पोशिंदा असलेल्या अशा या शेतकऱ्याच्या जखमेवर राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा मीठ चोळले आहे.

सर्व शेतकरी पहाटे लवकर उठत नाहीत, भिकारीही एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पिकविमा दिला अशी वादग्रस्त विधाने कृषिमंत्री कोकाटे (Manikrao Kokate) यांनी यापूर्वी केली आहेत. कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय कारता? असा प्रश्न उपस्थित करत कोकाटे यांनी त्याचे उत्तरही दिले आहे. मुलांचे साखरपुडे करता, विवाह करता, असे ते म्हणाले आहेत. शेतकरी म्हणजे आपले गुलाम आहेत, अशा आविर्भावात त्यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या नेत्यांनी समाजातील विविध घटकांना विविध आश्वासने दिली होती. लाडकी बहिण योजनेचे अनुदान 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणार आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, म्हणजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार, ही प्रमुख आश्वासने होती. महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. ही दोन्ही आश्वासने पूर्ण होतील, अशी अपेक्षा संबंधित घटकांना होती, मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. लाडकी बहिण योजनेच्या रकमेत वाढ झाली नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफीही झाली नाही.

पैशांचे सोंग घेता येत नाही, आणखी तीन वर्षे तरी शेतकरी कर्जमाफी करता येणार नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहे. मार्चअखेरीस शेतकऱ्यांनी कर्ज भरावे, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजितदादांच्या स्पष्टीकरणाला सहमती दर्शवली आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, याची माहिती आश्वासन देताना अजितदादा आणि फडणवीस यांना माहित नव्हती, असे अजिबात म्हणता येणार नाही. याचा अर्थ असा की केवळ मते मिळवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते.

राजकारणात असे होत असते, अशी आश्वासने दिला जातात आणि काही आश्वासनांची पूर्तता करणे शक्य होत नाही, हे एखादेवेळेस समजून घेता येईल. मात्र शेतकऱ्यांचा अवमान करण्याची, त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याची आवश्यकता कृषिमंत्री कोकाटे यांना का वाटली असेल, असा प्रश्न आहे. कर्जमाफी न झाल्यामुळे आधीच त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या रकमेतून साखरपुडे करता, लग्न करता असे म्हणण्याची गरज नव्हती. कर्जमाफीबाबत काही शेतकऱ्यांनी कोकाटे यांना विचारले आणि रागाच्या भरात त्यांनी शेतकऱ्यांना सुनावले.

निसर्गाचा लहरीपणा, पिकांना योग्य भाव न मिळणे, खते, बियाणांचे वाढलेले भाव या दुष्टचक्रात बहुतांश शेतकरी अडकलेले आहेत. घरात एखादे कार्य करायचे म्हटले तर शेतकऱ्यांना खासगी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागतात. पेरणीच्या वेळीही शेतकऱ्यांनी अवस्था अशीच होते. कर्जमाफीच्या पैशांतून शेतकरी करत असतील मुलांचे साखरपुडे, लग्न. त्यात चुकीचे काय आहे? शेतकऱ्यांनी आपल्या मुलांचे साखरपुडे, विवाह करू नयेत का? मंत्री, आमदारांच्या, राजकीय नेत्यांच्या मुलांचे साखरपुडे, लग्नसोहळे डोळ्यांचे पारणे फेडणारे असतात. एखाद्या शेतकऱ्याने त्यावर कधी आक्षेप घेतला आहे का? याचा विचार कोकाटे यांनी केला पाहिजे.

आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे सरकार बॅकफूटवर गेले आहे. त्यातच कोकाटे यांच्या विधानाने सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये संताप वाढू शकतो. प्रचंड बहुमत असल्यामुळे सरकारला कोणताही धोका नाही, यातूनच मंत्री अशी विधाने करत आहेत, असाही संदेश समाजात जात आहे. सरकारने मतदारांना गृहीत धरल्याचे चित्र दिसत आहे. आपण काहीही केले तरी लोक आपल्यालाच मतदान करतील, असे सरकारमधील काही मंत्र्यांना वाटत आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांनाही हिनवण्याचे धाडस कृषिमंत्री कोकाटे यांनी दाखवले असणार.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT