Sanjog Waghere Patil, Shrirang Barne Sarkarnama
विश्लेषण

Maval Lok Sabha: वाघेरेंना मिळालेल्या 'ठाकरे पॉवर'मुळे एकतर्फी वाटणारी 'मावळ' निवडणूक बारणेंसाठी बनली चॅलेंजिंंग?

Chaitanya Machale

Maval News : बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाल्यानंतर आता चौथ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघात प्रचार जोरदार सुरू झाला आहे. मावळ मतदारसंघातील सुरूवातीच्या काळात महायुतीला सोपी वाटणारी लढत आता अंतिम टप्प्यात आव्हानात्मक झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मतदारसंघात जोर लावण्यास सुरूवात केली असल्याने आता महायुतीच्या नेत्यांनी देखील या मतदारसंघात ताकद लावत नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे महायुतीकडून निवडणूक लढवित असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले संजोग वाघेरे रिंगणात उतरले आहे. बारणे यांची ही तिसरी टर्म असून या लोकसभेच्या निवडणुकीत हॅट्रीक करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मावळचे खासदार असलेल्या बारणे यांनी बदलती समीकरणे लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा जाहीर करत त्यांच्याबरोबर जाणे पसंत केले. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे-फडणवीस-पवार यांच्या महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिंदे यांच्या पदरात पडली. त्यामुळे विद्यमान खासदार बारणे यांनाच तिकीट देण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मावळमधील सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या घटक पक्षांचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे ही निवडणूक महायुतीच्या उमेदवाराला सोपी जाईल, असे वाटत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकेकाळचे निकटवर्तीय आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अशी जबाबदारी संभाळलेल्या संजोग वाघेरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मावळ मधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे या निवडणुकीत रंगत आली. महाविकास आघाडीचे उमेदवार वाघेरें यांचे पिंपरी-चिंचवड, मावळामध्ये मोठे नातेगोते आहे. तसेच जुन्या पक्षातील सहकाऱ्यांमध्ये त्यांचे काम चांगले असल्याने या जोरावर त्यांनी या मतदारसंघात प्रचार करण्यास सुरूवात केली.

मावळ (Maval) लोकसभेची जागा जिंकण्याचा संकल्प उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा त्यांनी या मतदारसंघात होण्यासाठी प्रयत्न केले. दुसरीकडे या मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व असतानाही बारणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटेच आले, पण काहीही न बोलता शिंदे निघून गेले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकेकाळचा बालेकिल्ला असतानाही पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये केवळ एकाच मेळाव्याला हजेरी लावली.

याच मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत बारणे यांनी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता. मात्र आता महायुतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी सहभागी झाल्याने पराभवाचा राग विसरून अजित पवार यांना बारणे यांच्यासाठी एक सभा घ्यावी लागली. महाविकास आघाडीचे नेते आमदार रोहित पवार यांच्यासह उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनीही या मतदारसंघात सभा घेतल्या. यामुळे या मतदारसंघातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

मावळ मधून निवडणूक लढविणारे दोन्ही उमेदवार पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक आहेत. घाटाखाली विद्यमान खासदार बारणे यांचे काम चांगले आहे. सलग दोन टर्म त्यांनी येथून प्रतिनिधित्व केल्याने विकास कामांच्या निमित्ताने त्यांचा मतदारांशी काही प्रमाणात संपर्क आलेला आहे. मावळच्या जागेसाठी भाजप (BJP) देखील जोरदार इच्छूक होते. अनेक ठिकाणी भाजपचे वर्चस्व मोठे असल्याने ही जागा भाजपलाच मिळावी, यासाठी भाजपचे पदाधिकारी आग्रही होते.

मात्र, शिंदे यांनी ही जागा मिळविल्याने भाजपमध्ये फारसा उत्साह दिसून येत नाही. याचा फायदा उठवित महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार कामाला सुरूवात केली आहे. घाटाच्या वर असलेल्या चिंचवड, पिंपरी, मावळ या तिन्ही मतदारसंघात दोन्ही उमेदवारांचे नातेवाईक आहेत. या तीन मतदारसंघात घाटाखालच्या मतदारसंघापेक्षा दीड लाख मतदार अधिक आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात या दोन्ही उमेदवारांनी या मतदारसंघातील प्रचारावर भर दिला असल्याचे पाहायला मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT