Sharad Pawar: शरद पवारांच्या मुत्सद्देगिरीचं 'परफेक्ट टायमिंग; ऐन निवडणुकीत भाजपवर टाकला मोठा बॉम्ब

Sharad Pawar Statement: आगामी दोन वर्षांत काही पक्ष काँग्रेससोबत येतील असं वक्तव्य शरद पवार यांनी केले आणि त्याचा प्रतिवाद करण्यासाठी भाजप नेते तातडीने समोर आले. अचूक टायमिंग साधत लोकसभा निवडणुकीच्या मध्यात पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशात पुन्हा भाजपची सत्ता येणार नाही, असाही संदेश त्याद्वारे गेला आहे.
Sharad Pawar, Narendra Modi And Amit Shah
Sharad Pawar, Narendra Modi And Amit ShahSarkarnama

Sharad Pawar News: विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत अनेक मातब्बर शिलेदारांनी साथ सोडलेली, राजकीय करिष्मा संपला, अशा चर्चा सुरू होत्या.पण आपला पाच दशकांचा राजकीय अनुभव पणाला लावत शरद पवार (Sharad Pawar) नावाच्या झंझावाताने या चर्चा करणार्‍यांना तोंडघशी पाडण्याची किमया नेत्याने करून दाखवली. जिथे 10-15 जागा जिंकता येतात की नाही असे चित्र निर्माण करण्यात आले होते, तिथे 50 पेक्षा अधिक आमदार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही निवडून आणले. खरी कमाल तर त्यानंतर झाली. विरोधकांना कस्पटासमान लेखणाऱ्या स्पष्ट बहुमत मिळालेल्या पक्षाला बाजूला सारून राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे (MVA) सरकार आणले.

शरद पवार (sharad Pawar) यांचा राजकीय प्रवास असाच धाडसाचा, मुत्सद्देगिरीचा आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) मागे एकदा म्हणाल्या होत्या, My Father Is Unpredictable... हे अगदी तंतोतंत खरे आहे, राज्याने, देशाने हे अनेकदा अनुभवले आहे. आता हे सारे आठवायचे कारण म्हणजे काही प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत येतील, काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार, अशी चर्चा दोन महिन्यांपूर्वी सुरू झाली होती. त्यांच्या ताज्या वक्तव्याचाही अर्थ तसाच लावला जात आहे. अजितदादा पवार (Ajit Pawar) यांचा गट शरद पवार यांच्यापासून वेगळा झाला आहे, काँग्रेसने (Congress) ज्यांना दोन वेळा मुख्यमंत्रिपदावर संधी दिली, त्या अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत शरद पवार (Sharad Pawar) यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला तर काँग्रेसला नक्कीच उभारी मिळू शकते, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.

आता लोकसभेच्या निवडणुकीतही शरद पवार यांनी विरोधकांना पुन्हा एकदा आपली ताकद, मुत्सद्देगिरी दाखवून दिली आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांनी भाजपला धक्का दिला आहे. महाविकास आघाडीला सर्व 48 मतदारसंघांत उमेदवार मिळतील की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. मात्र महाविकास आघाडीने महायुतीच्या तोंडाला फेस आणणारे उमेदवार दिले आहे. यात शरद पवार यांचा वाटा मोठा आहे.

Sharad Pawar, Narendra Modi And Amit Shah
Lok Sabha Election 2024 : बारामतीत मतदानाचा टक्का घसरला, राष्ट्रवादीनं चंद्रकांतदादांवर फोडलं खापर? अजितदादांचीही खदखद बाहेर

आता प्रादेशिक पक्ष काँग्रेसमधील विलीन होतील, या त्यांच्या वक्तव्याने ऐन निवडणुकीत मोठा संदेश दिला आहे आणि तो भाजपच्या जिव्हारी लागणारा आहे. या निवडणुकीत भाजपची सत्ता येणे कठीण असून, काँग्रेस आणि मित्रपक्षांची कामगिरी चांगली राहील, असे अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगून टाकले आहे. त्यामुळे तर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी समोर येऊन शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शरद पवारांनी बारामती मतदारसंघातून शरद पवार यांनी 1967 मध्ये विधानसभेची पहिली निवडणूक लढवली. ते विजयी झाले आणि वयाच्या 29 व्या वर्षी त्यांनी वसंतराव नाईक यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. पुढे 1972 आणि 1978 च्या निवडणुकांतही ते विजयी झाले. 1978 च्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. त्यानंतर काँग्रेसमधील आमदार फोडून शरद पवार यांनी विरोधी पक्षांना सोबत घेत सरकार स्थापन केले आणि वयाच्या 38 व्या वर्षी ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. 1980 मध्ये इंदिरा गांधी केंद्रात पुन्हा सत्तेत आल्या. त्यानंतर त्यांनी विरोधकांचे सरकारे बरखास्त करण्याचा सपाटा लावला. त्यात शरद पवार यांचेही सरकार बरखास्त झाले. बॅ. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री बनले आणि शरद पवार विधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले.

Sharad Pawar, Narendra Modi And Amit Shah
Mahadev Jankar: लोकसभेचं मतदान पार पडताच जानकरांचं खळबळजनक विधान; म्हणाले, 'मेलो तरी चालेल पण कमळ चिन्हावर...'

इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांना विरोध म्हणून यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी रेड्डी काँग्रेसची स्थापना केली होती. यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे शरद पवार रेड्डी काँग्रेसमध्ये सहभागी झाले.त्यावेळी (1978) सरकार दोन्ही काँग्रेसचे होते, मात्र इंदिरा काँग्रेसचे तत्कालीन उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडे यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरू केले होते. ते यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यावर टीका करू लागले. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून पवारांनी काँग्रेसमधील आमदारांसह विरोधकांना सोबत घेऊन सत्तापालट केला होता.

वसंतदादा यांच्या सरकारमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्यानंतर नऊ वर्षांनी 1987 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगर येथे इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1988 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करून राजीव गांधी यांनी शरद पवार यांना मुख्यमंत्री केले.पवार यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 1990 मध्ये ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. 1991 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला 48 पैकी 38 जागा मिळाल्या होत्या. निवडणूक प्रचारादरम्यान राजीव गांधी यांची हत्या झाली होती. त्यानंतर पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांचेही नाव चर्चेत आले, मात्र प्रत्यक्षात संधी मिळाली ती पी. व्ही. नरसिंहराव यांना. त्यानंतर 1993 मध्ये ते चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले.

Sharad Pawar, Narendra Modi And Amit Shah
Prithviraj Chavan News : शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन होणार? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितले !

पी. ए, संगमा आणि तारिक अन्वर यांना सोबत घेऊन शरद पवार यांनी 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) स्थापना केली. सोनिया गांधी यांना विरोध म्हणून ते काँग्रेसमधून बाहेर पडले होते. इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे नेतृत्व करू नये, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. या भूमिकेमुळे काँग्रेसने पवार, संगमा, तारिक अन्वर यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले. विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) मुख्यमंत्री झाले. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रातील सत्तेतही सहभागी झाला. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारमध्ये शरद पवार कृषिमंत्री झाले.

2019 च्या निवडणुकीत विरोधक कुठेच नाहीत, ते निवणुकीआधीच भुईसपाट झाले आहेत, असा भाजपचा आविर्भाव होता. सातारा (Satara) येथील सभेत शरद पवारांनी पावसातही आपले भाषण पूर्ण केले आणि भाजपचा हा आविर्भाव गळून पडला. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कुणीतरी लढतोय, असा विश्वास शरद पवारांच्या त्या सभेमुळे लोकांमध्ये निर्माण झाला. या निवडणुकीच्या निकालानंतर तर शरद पवार यांनी मोठा राजकीय धमाका केला. त्याचे पडसाद आजही उमटत आहे, पुढे बराच काळ उमटत राहणार आहेत.

Sharad Pawar, Narendra Modi And Amit Shah
Lok Sabha Election 2024 : 'या आत्म्याला आता '56 वर्षे' झाली'; पवारांचा मोदींना सणसणीत टोला!

मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपची (Shivsena-BJP) युती तुटली होती. त्यामुळे 105 आमदार असूनही भाजप आणि देवेंद्र फडणवीस हतबल झाले होते. पवार यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि शिवसेना अशी महाविकास आघाडी (MVA) स्थापन झाली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला, तो सर्वानी मान्य केला. दरम्यान, अजितदादा पवार यांनी बंड करून देवेंद्र फडणवीसांसह पहाटेचा शपथविधी उरकून घेतला होता. ते बंड पवारांनी 48 तासांत मोडित काढले होते. अडीच वर्षांनंतर शिवसेना फुटली आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.

गेल्यावर्षी राष्ट्रवादीत बंड झाले. अजितदादा पवार 40 आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. हे बंड मात्र शरद पवार यांना मोडित काढणे शक्य झाले नाही. मात्र, शरद पवारांच्या महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadnavis) नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनीही धसका घेतला होता. त्यातूनच त्यांनी जंगजंग पछाडत महाविकास आघाडीचे सरकार पाडले, शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडला.

Sharad Pawar, Narendra Modi And Amit Shah
Sharad Pawar: पवारांच्या प्रादेशिक पक्ष विलीनीकरणाच्या विधानाला चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्याचा संदर्भ, मुनगंटीवारांचा दावा

राजकीय विश्लेषक प्रा. जयदेव डोळे काय म्हणतात पाहा...

याबाबत राजकीय विश्लेषक प्रा. जयदेव डोळे 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले, की शरद पवार यांच्या राजकारणाला तात्विक आधार आहे, तसा तो अजित पवार यांच्या राजकारणाला नाही. त्यामुळे शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, याची दाट शक्यता आहे. शरद पवार यांचे आता सोनिया गांधी यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावरही त्यांचा काही आक्षेप नाही. उद्धव ठाकरे यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. विरोधकांनी चार तुकड्यांत विभागून सत्ताधाऱ्यांना सामोरे जाण्याऐवजी ते आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू शकतात, पण ते नेमके कधी होईल हे सांगता येणार नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते आपल्याला सहकार्य करतात की नाही, याची चाचपणी ते करत आहेत. त्यानुसार ते निर्णय घेतील, अशी शक्यता आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com