Beed Politics : आष्टी-पाटोदा-शिरुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष आता चांगलाच वाढत चालला आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात धस यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना चांगलंच घेरलं होतं. आता त्यांनी आपला मोर्चा पंकजा मुंडे यांच्याकडे वळवला आहे. त्यांनी पंकजांवर गंभीर आरोप केले असून पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार करणार असल्याचेही जाहीर केले आहे.
धसांनी पंकजा मुंडे यांची तक्रार करण्याचे जाहीर करत धस विरुध्द मुंडे या संघर्षाला तेवत ठेवणार असल्याचे संकेत दिले. त्याला कारण ठरले आहेत आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे. मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पंकजा यांनी शिट्टीचा प्रचार केल्याचा आरोप धस सातत्याने करत आहे. निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दिवशीच त्यांनी पंकजांवर निशाणा साधला होता. पण नंतर तो मुद्दा काहीसा मागे पडला होता.
आता धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धस पुन्हा आक्रमक झाले आहेत. मंगळवारी विधानभवनच्या आवारात मीडियाशी बोलताना त्यांनी शिट्टीच्या प्रचाराचा मुद्दा उकरून काढला. शिट्टी हे चिन्ह भीमराव धोंडे यांचे होते. त्यांनी आष्टीतून धस यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत धस हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यांनी तब्बल 1 लाख 40 हजार मते घेतली. तर धोंडेंना जेमतेम 65 हजार मते मिळाली.
भाजपमध्ये असूनही धोंडे यांनी निवडणूक लढल्याने धस यांचा राग आहे. मुंडे यांनीच त्यांना फूस लावल्याचा त्यांचा आरोप आहे. धोंडे हे चारटर्म आमदार होते. त्यांचे वय सत्तर आहे. तरीही मतदारसंघात त्यांची ताकद अजूनही आहे. धस यांच्या म्हणण्याप्रमाणे मुंडे यांचे बळही त्यांच्या मागे असावे. पण असे असले तरी धोंडे हे कट्टर भाजपचे नेते नाहीत. त्यांनी 80 च्या दशकात पहिली निवडणूक अपक्ष लढवली होती. नंतर काँग्रेसच्या तिकीटावर आमदार झाले.
1980, 85 आणि 90 असे तीन टर्म ते सलग आमदार होते. 1995 चा अपवाद वगळता धस हे 1999 ते 2004 असे तीन टर्म आमदार झाले. त्यानंतर 2014 मध्ये धोंडे यांनी भाजपकडून तिकीट मिळवत धसांचा पराभव केला चौथ्यांदा निवडून आले. पण 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला. 2024 मध्ये पुन्हा ते धस यांच्याविरोधात अपक्ष म्हणून उतरले. या निवडणुकीतही ते पराभूत झाले. असे असले तरी मतदारसंघातील त्यांची पकड कुणीही नाकारत नाही.
सुरेश धस यांचाही मतदारसंघात दबदबा आहे. त्यामुळे त्यांनी चौथ्यांदा बाजी मारली. त्यांना मिळालेले मताधिक्य हेच दाखवून देतो. पण आता त्यांनी मुंडे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने त्यांना नेमके काय दाखवून द्यायचे आहे, ते एवढे आक्रमक का झाले आहेत, याची चर्चा आष्टीसह संपूर्ण बीड जिल्ह्यात आहे. पंकजा मुंडेंनी शिट्टी प्रचार केला, असा दावा धस करत आहेत. पण शिट्टीला मिळालेल्या मतांमध्ये ते का दिसत नाही, हाही प्रश्न उरतोच.
आष्टीमध्ये मुंडेंची ढवळाढवळ धस यांना नको असावी. धोंडे यांच्यासह इतर काहींच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुंडे आपल्याविरोधात राजकारण करत असल्याची भीती धस यांना वाटत असावी, अशीही शक्यता आहे. कदाचित त्यांना जिल्ह्याचे नेतृत्व करायचे असेल? त्यामुळेच तर त्यांनी आधी धनंजय मुंडे आणि आता पंकजा मुंडे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला नाही ना, अशीही चर्चा आहे. या चर्चेत धस विरुध्द मुंडे यांच्या संघर्षाचा निकाल काय लागणार, हे येणारा काळच सांगेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.