MLC Election 2024 Sarkarnama
विश्लेषण

MLC Election 2024 : सत्तेत असलेल्या 'मविआ'ला फडणवीसांनी लावला होता सुरुंग, आतातर भाजप सत्तेत आहे..!

अय्यूब कादरी

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी म्हणजे 12 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे घोडेबाजार आणि क्रॉस व्होटिंगची चर्चा सुरू झाली आहे. साधारण अडीच वर्षांपूर्वी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फुटली होती आणि त्याचवेळी सरकारच्या पतनाची बीजे रोवली गेली होती. त्याच्या काही महिन्यांनंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. आता 12 जुलै रोजी कुणाचा 'राजकीय गेम' होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

विधानसभा आणि त्यानंतर लोकसभा निवडणूक असे सलग दोन पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे यांच्यासह भाजपकडून अमित बोरखे, योगेश टिळेकर, परिणय फुके आणि सदाभाऊ खोत रिंगणात उतरले आहेत.

यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा विजयी झालेल्या भावना गवळी यांना शिवसेनेने (शिंदे गट) नुकत्याच झालेल्या निवडणुकीत उमेदवारी नाकारली होती. त्यामागे भाजपचा आग्रह होता, असे सांगितले जाते. शिंदे गटाने भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजितदादा पवार गट) परभणी लोकसभा मतदारसंघातून राजेश विटेकर इच्छुक होते. तेथे भाजपने रासपचे महादेव जानकर यांना उभे केले. त्यामुळे अजितदादांनी विटेकर यांना विधान परिषदेवर घेण्याचे आश्वासन दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी दिली आहे.

महाविकास आघाडीने तीन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. काँग्रेसने डॉ. प्रज्ञा सातव, शिवसेनेने (ठाकरे गट) मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश आष्टीकर यांनी प्रज्ञा सातव यांच्या निवडणुकीतील भूमिकेबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली होती. काँग्रेस पक्षातूनही सातव यांच्या उमेदवारीला विरोध झाला होता. मात्र पक्षाने हा विरोध डावलून त्यांना उमेदवारी दिली आहे.

काही आमदारांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. त्यामुळे आमदारांची संख्या कमी झाली आहे. त्यातच 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने चुरस निर्माण झाली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या या निवडणुकीत आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. 

शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. जयंत पाटील या्ंच्यासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्यासाठी त्यांनी नुकतीच बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. ठाकूर काय निर्णय घेतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

आमदार फुटू नयेत, याची सर्व पक्षांनी खबरदारी घेतली आहे. दगाफटका होऊ नये, यासाठी आमदारांना पंचतारांकित हॉटेलांमध्ये ठेवण्यात आले आहे. सत्ताधारी घोडेबाजार करण्यात तरबेज आहेत, अशी टीका शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी मंत्री, आमदार अनिल परब यांनी केली आहे. सत्ताधारी घोडेबाजार करतात, त्यामुळेच आमदारांना हॉटेलात ठेवावे लागते, असेही ते म्हणाले आहेत.

अनिल परब यांच्या आरोपात तथ्य आहे. घोडेबाजार सर्वच पक्ष करतात. 2022 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली होती. त्यामुळे चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. भाजपने 11 मते जास्त मिळवल्याचा दावा त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. महाविकास आघाडीचे सरकार असतानाही काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता.

महाविकास आघाडीचे सरकार असतानाच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे (ठाकरे गट) संजय पवार यांचा पराभव झाला होता. भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले होते. सरकार कोसळण्यापूर्वी महाविकास आघाडीला बसलेले ते दोन मोठे धक्के होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी होणाऱ्या मतदानाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT