Solapur, 18 March : माढ्याचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला महायुतीमधील मोहिते पाटील यांच्यासह रामराजे यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर रविवारी त्यांनी एकत्र येऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्याला महाविकास आघाडीतील नेत्यांनी उपस्थिती लावून हातभार लावला. दुपारच्या राजकीय ड्रामानंतर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन ‘शिवरत्न’वर दाखल झाले. मात्र, तेही मोहिते पाटलांची समजूत घालू शकले नाहीत. उमेदवारी मागे घ्यावी, तर नामुष्की होणार आणि मोहिते पाटील यांना दुखावणे भाजपला परवडणारे नाही. आता मोहिते पाटील हे बंडखोरी करणार, की खडसे पॅटर्न राबविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माढ्यातून लोकसभेसाठी (Madha Lok Sabha Constituency) निंबाळकर यांच्यासोबतच भाजपचे धैर्यशील मोहिते पाटीलही (Mohite Patil) इच्छुक होते. निंबाळकर यांच्याइतकीच मोहिते पाटील यांच्याही भाजपच्या तिकिटावर दावेदारी होती. मात्र, भाजपश्रेष्ठींचा वरदहस्त डोक्यावर असल्यामुळे निंबाळकर यांनी बाजी मारली आणि मोहिते पाटील कमालीचे दुखावले. तिकीट जाहीर झाल्यानंतर दोन दिवस तर ते अज्ञातवासातच होते. त्यानंतर रविवारी शिवरत्न बंगल्यावर घडलेल्या घडामोडी उभ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिल्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन मोहिते पाटील यांना भेटायला आले होते. मात्र, गाडीतून उतरताच निंबाळकर यांच्या विरोधातील घोषणांनी त्यांचे स्वागत झाले. प्रचंड गर्दीत वाढ काढत महाजन यांना बंगल्यात जावे लागले. त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह कुटुंबातील सर्वांशी चर्चा केली. मात्र, तेही मोहिते पाटील यांची समजूत घालण्यात यशस्वी ठरले नाहीत. कारण त्याचे स्पष्ट प्रतिबिंब महाजन परत जाताना दिसत होते. कारण मोहिते पाटील समर्थकांनी महाजन यांची गाडी अडवून धरली होती. दुसरीकडे ते माढा आणि निंबाळकर यांना पाडा, अशा घोषणा देत होते. त्यामुळे मोहिते पाटील यांची समजूत घालण्यात भाजपला सध्यातरी यश आलेले नाही.
दरम्यान, निंबाळकर (RanjitShinh Naik Nimbalkar) यांचे तिकीट माघारी घेणे अशक्य गोष्ट आहे. पार्लमेंटरी बोर्डाने जाहीर केलेले तिकीट मागे घेणे नामुष्की ठरेल. तसं झालं तर इतर ठिकाणाहूनही तशी मागणी होऊ शकते. त्यामुळे भाजप मोहिते पाटील यांची समजूत कशा प्रकारे घालणार हाच कळीचा मुद्दा आहे. प्रचंड विरोधानंतरही निंबाळकरांची उमेदवारी कायम राहिली तर मोहिते पाटील काय करणार हेही महत्त्वाचे आहे. मोहिते पाटील बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढविणार की खडसे पॅटर्न राबवणार, याची उत्सुकता आहे. खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे या भाजपच्या उमेदवार आहेत, तर खडसे राष्ट्रवादीत आहेत. त्यांची कन्या रोहिणी खडसे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे मोहिते पाटीलही धैर्यशील यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पाठविण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुसरीकडे, निंबाळकरांचा फलटणमधील संघर्ष आता माढ्यात पोचला आहे. रामराजे आणि रणजितसिंह यांच्यातील राजकीय शत्रुत्व हे पिढीजात आहे. त्यामुळे रामराजेंची भूमिका निंबाळकर यांच्या विरोधात राहील किंवा ते तटस्थ राहून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पोषक भूमिका निभावू शकतात.
करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांना खुद्द शरद पवार यांच्याकडून विचारणा झालेली आहे. शिवाय ते मोहिते पाटील समर्थक म्हणून ओळखले जातात. ते स्वतः रविवारी शिवरत्न बंगल्यावरील बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या चिन्हावर पाटील यांना उभे करून मोहिते पाटील हे निंबाळकर यांना धडा शिकवू शकतात.
दरम्यान, सांगोल्याचे माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांचे नावही माढ्यातून पुढे येत आहे. शेकापचे जयंत पाटील हे मोहिते पाटील यांना शिवरत्न बंगल्यावर येऊन भेटून गेले आहेत. योगायोगाने आज लगेच त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघ शेकापला सोडण्याची मागणी केली आहे. मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात न उतरता गणपतआबांचे नातू डॉ. अनिकेत यांच्या पाठीशी ताकद लावू शकतात. गणपतआबांचे आणि विजयदादांचे संबंध लक्षात घेता हे समीकरण जुळू शकते. त्यामुळे आता मोहिते पाटील यांच्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.