Nagar Grampanchayat Election  sarkarnama
विश्लेषण

Grampanchayat Election : विखे, पवार, पाचपुते, तनपुरे, लहामटे प्रस्थापित गटांना हादरे

Pradeep Pendhare

Nagar Political News : मिनी मंत्रालयाचे (जिल्हा परिषद) प्रवेशद्वार म्हणजे, ग्रामपंचायत निवडणूक. या वेळी ग्रामपंचायतीच्या निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकां अगोदर झाल्या.

त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीची उत्सुकता वाढली होती. नेमका कौल कोणाच्या बाजूने जाणार याची उत्सुकता होती. यातच ग्रामपंचायतींना वित्त आयोगाचा निधी थेट मिळू लागल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये चुरस निर्माण झाली होती.

नगर (Nagar) जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रस्थापितांनी आपले गड राखले असले, तरी काही ठिकाणी त्यांना धक्के बसले आहेत. प्रस्थापितांचा थेट सहभाग नसला, तरी पडद्यामागचे किंगमेकरची भूमिकेत होते. आगामी निवडणुकांसाठी गावपातळीवरील कारभाऱ्याची (सरपंच) भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने या निवडणुकांकडे दुर्लक्ष करूनदेखील चालणार नव्हते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यपातळीवर बदलत्या राजकीय समीकरणांचा गावपातळीच्या स्थानिक राजकारणावर, या निवडणुकीत परिणाम झाल्याचे पाहायला मिळते. यातून स्थानिक आघाड्यांमध्ये वाढ झाली. याचा फटका प्रस्थापितांना बसल्याचे चित्र आहे.

महसूलमंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, भाजप आमदार बबनराव पाचपुचे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार किरण लहामटे यांच्या गटांना या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धक्के बसले आहेत. शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारत राष्ट्र समितीला बोटावर मोजण्याइतक्या जागा मिळाल्या आहेत.

नगर जिल्ह्यात 195 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यातील 178 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. 175 सरपंच लोकांमधून निवडले गेले. नगर तालुक्यातील आठ पैकी सहा ग्रामपंचायतींवर भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले गटाने भाजपचा झेंडा फडकवला.

अरणगाव, मेहेकरी, हिवरेझरे, हिंगणगाव ग्रामपंचायतीमध्ये सत्तापालट झाला. नगर तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके (अजित पवार गट) यांच्या गटाने एन्ट्री केली.

पारनेरमध्ये आमदार लंके यांच्या सातपैकी सहा ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले. पारनेरमध्ये मनसेनेदेखील खाते उघडले आहे. राहुरी तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे (शरद पवार गट) यांच्या गटाला धक्का बसला आहे.

भाजपने राहुरी तालुक्यात जोर लावल्याचे दिसले. भाजपचा विखे-कर्डिले गट राहुरीत एकत्र आला होता. येथे 21 ग्रामपंचायतींपैकी 10 जागांवर भाजपने विजय मिळवला. आमदार तनपुरे गटाला सहा, स्थानिक आघाड्यांना सहा ग्रामपंचायतींमध्ये यश मिळवले.

आमदार तनपुरे गटाकडून या स्थानिक आघाड्यांना आमचेच बळ असल्याचे आता सांगितले जाऊ लागले आहे. श्रीरामपूरमध्ये 17 ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस आमदार लहू कानडे यांच्या गटाला चार ठिकाणी यश मिळवले.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या गटाने श्रीरामपूरमध्ये बाजी मारली. येथे विखे यांच्या गटाला पाच जागा मिळाल्या. भारत राष्ट्र समितीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या गटाला पाच ठिकाणी यश मिळवले.

श्रीगोंद्यात नऊ ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायतींवर सत्तापरिवर्तन झाले आहे. भाजप आमदार बबनराव पाचपुते गटाला तीन, माजी आमदार राहुल जगताप (शरद पवार गट) आणि काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे गटाला प्रत्येकी दोन, स्थानिक आघाडीला एक जागा मिळाली आहे.

पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात शेवगाव तालुक्यात भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या गटाला काही कमाल करता आलीच नाही. येथे माजी आमदार घुले बंधूंच्या गटांनी वर्चस्व सिद्ध केले. पाथर्डी मात्र आमदार मोनिका राजळे गटाला 15 पैकी दहा, शरद पवार गटाला दोन, शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटाला प्रत्येकी एक ग्रामपंचायतीत यश मिळाले.

कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे रोहित पवार (शरद पवार गट) यांच्यात नेहमीच चुरस असते. या निवडणुकीतदेखील दोन्ही आमदारांच्या गटात चुरस पाहयला मिळाली. या निवडणुकीत आमदार रोहित पवार यांच्या गटाला चांगला फटका बसला.

दोन्ही तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींपैकी महायुतीला सात, तर रोहित पवार गटाला एक आणि स्थानिक आघाडीला एक ठिकाणी विजय मिळवला. ग्रामपंचायत निवडणुकीत पीछेहाटीवर आमदार पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, "ग्रामपंचायती निवडणुका गावपातळीवरच्या असतात. गावच्या कार्यकर्त्यांचा यात सहभाग असतो. यात आम्ही आमदार, खासदार, मंत्री किंवा पक्षप्रमुख कोणीही लक्ष घालत नाही. दोन्हीकडचे कार्यकर्ते आमचेच असतात. त्यामुळे यात लक्ष घालण्याची गरज नाही".

महसूल तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe-Patil) यांना श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि भाजपचे विवेक कोल्हे या युतीने सत्तेपासून रोखले आहे. तेव्हापासून विखे आणि थोरात-कोल्हे युतीचा संघर्ष कायम पाहायला मिळतो. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्येदेखील हा संघर्ष पाहायला मिळाला.

राहता तालुक्यातील दहापैकी तीन ग्रामपंचायतींमध्ये विखे गटाला धक्का बसला आहे. गणेश कारखाना परिसरातील वाकडी, चितळी आणि पुणतांबा या तीन कोपरगाव विधानसभा मतदारसंघात असलेल्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमधील सत्ता विखे गटाला गमवावी लागली आहे.

अकोल्यातील 14 ग्रामपंचायतींवर भाजपचे सरपंच निवडून आल्याचा दावा भाजपचे सीताराम भांगरे यांनी केला आहे. शरद पवार गटाचे जिल्हा बँक संचालक अमित भांगरे यांनी 11 ग्रामपंचायतींवर सरपंचांनी विजय मिळवल्याचे सांगत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार किरण लहामटे गटाने दहा ग्रामपंचायतींवर विजय मिळवल्याचे सांगत आहे. त्यामुळे अकोल्यातील ग्रामपंचायतींची सत्ता नेमकी कोणाकडे हा प्रश्न आहे. कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे (अजित पवार गट) गटाने 17 पैकी 11 ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकल्याचा दावा केला आहे.

नेवाशात शिवसेनेचे आमदार शंकरराव गडाख (ठाकरे गट) यांच्या गटाने 16 पैकी 12 ग्रामपंचायतींवर भगवा झेंडा फडकवला आहे. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या गटाला एक, तर तीन ठिकाणी स्थानिक आघाड्यांना यश मिळाले आहे. भाजपचा नेवाशात धुव्वा उडाला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT