Nana Patole Sarkarnama
विश्लेषण

Nana Patole News : नानाभाऊंचा पक्षसंघटनेवर 'कंट्रोल' की उथळ पाण्याला खळखळाट...

अय्यूब कादरी

Congress News : काँग्रेसच्या मतांना 2022 च्या विधान परिषद निवडणुकीत त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सुरुंग लावाला होता. कालच्या विधान परिषद निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती झाली. काँग्रेस पक्षसंघटनेवरील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नियंत्रण हा केवळ दिखावा असल्याचे यामुळे उघड झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत 13 जागा जिंकत राज्यातील सर्वात मठा पक्ष बनलेल्या काँग्रेसला विधान परिषद निवडणुकीत झटका बसला आहे. शरीराने काँग्रेसमध्ये (Congress) आणि मनाने दुसऱ्याच पक्षात असलेल्या काँग्रेसच्याच काही आमदारांनी हा झटका दिला आहे. 2022 मध्येही घडलेल्या अशाच प्रकारातून चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्यातून कोणत्याही प्रकारचा धडा न घेता संबंधितांवर कारवाई न केल्याने त्याची पुनरावृत्ती झाली आहे. (Nana Patole News)

आम्ही ट्रॅप लावला होता, आता गद्दारांवर कारवाई करणार, असा आक्रमक बाणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दाखवत असले तरी त्यावर विश्वास किती ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रदेशाध्यक्षाने आक्रमक असले पाहिजे, मात्र ती आक्रमकता फक्त बोलण्यात, विविध प्रकारची विधाने करण्यात असून चालत नाही. त्या पद्धतीने कृती करण्याची, पक्षातील नेत्यांमध्ये आपल्याप्रति विश्वास निर्माण करण्याची गरज असते. अशी उदाहरणे पाहायची असतील तर नाना पटोले (Nana Patole) यांना फार लांब जाण्याची गरज नाही.

शेजारच्या कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्याकडे त्यांना पाहता येईल. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी आपल्या विरोधकांवर आक्रमक प्रहार करत पक्षातही स्वतःबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. ते लोकांच्या प्रश्नांसाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे लोकांचाही विश्वास प्राप्त करत त्यांनी सत्ता मिळवली.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये काय चित्र आहे? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता सरकारच्या विरोधात आक्रमक वक्तव्ये करत असले तरी जनतेच्या प्रश्नांसाठी ते कितीवेळा रस्त्यावर उतरले आहेत, हा शोध घेण्यासारखा विषय आहे. लोकसभेत काँग्रेसला यश मिळाले, त्याची कारणे वेगळी आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आल्यामुळे उद्धव ठाकरे, शरद पवार यांना राज्यभरात मोठी सहानुभूती आहे.

या तिन्ही पक्षांची मिळून महाविकास आघाडी बनली आणि ती किरकोळ अपवाद वगळता एकसंघ राहिली. शिवाय काँग्रेस हा राज्यातील प्रत्येक गावात पोहोचलेला पक्ष आहे. फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोक भाजप आणि महायुतीवर नाराज होते. त्याचा फायदा उद्धव ठाकरे, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह काँग्रेसलाही झाला.

काँग्रेसकडे सध्या राज्यव्यापी नेतृत्व नाही. महायुतीचे सरकार आल्यानंतर खरेतर नाना पटोले यांना मोठी संधी होती. त्यांना राज्यभरात दौरे करता आले असते. ज्या ठिकाणचे काँग्रेसनेते पक्ष सोडून गेले आहेत, तेथील कार्यकर्त्यांना भेटून त्यांना बळ देता आला असते. मात्र नानांनी असे काही केल्याचे दिसून आले नाही. जनतेच्या विविध प्रश्नांवर ते रस्त्यावर उतरले असते तर जिल्हा, तालुका पातळीवरील कार्यकर्तेही जनतेसाठी रस्त्यावर उतरले असते. यापैकी काहीही झाले नाही. तरीही लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राज्यात एक नंबरचा पक्ष बनला.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. 2022 च्या विधान परिषद निवडणुकीतही काँग्रेसची मते फुटली होती.

बेइमानी करणाऱ्या आमदारांची नावे माहीत असतानाही पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली नाही. ''आम्ही ट्रॅप लावला होता, आता गद्दार कोण हे आम्हाला कळले आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे,'' असे नाना पटोले आता म्हणत आहेत. क्रॉस व्होटिंग कोण करणार, काँग्रेस नेत्यांना आधीच माहीत होते. प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांनी वेळीच त्यांची समजूत तरी घालायला हवी होती. नानांनी तसे केले असेल का, याबाबतही शंकाच आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात मोठे यश मिळूनही, येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजू वरचढ राहणार, अशी निरीक्षणे नोंदवली जात असतानाही विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटतात कशी, याचा विचार नाना पटोले यांनी करायला हवा.

नानांच्या नेतृत्वाबाबत यापूर्वी काँग्रेस हायकमांडकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे पटोले यांची बाजू पुन्हा वरचढ झाली असे वाटत असतानाच विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना पुन्हा झटका बसला आहे.

त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाविषयी पक्षातूनच पुन्हा शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. पक्षसंघटनेवर आपले नियंत्रण असल्याचा दिखावा करत उथळ पाण्याला खळखळाट जास्त, अशी परिस्थिती नानांची झाल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि नाना पटोले यातून मार्ग कसा काढतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(Edited By : Sachin Waghmare )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT