Navi Mumbai election 2025 Sarkarnama
विश्लेषण

Navi Mumbai News: वादग्रस्त प्रभागरचना; महायुतीत घमासान, गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे

Navi Mumbai Municipal Election:नवी मुंबई म्हटले की गणेश नाईक यांचे नाव अपरिहार्य आहे. गेली अनेक वर्षे महापालिका नाईकांभोवती फिरत आली आहे. पण आता शिंदे गटातील नेते हे समीकरण मोडण्याच्या प्रयत्नात आहेत.

सुजित गायकवाड

तब्बल दहा वर्षांनंतर नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. या दहा वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून, गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे महापालिकेमध्ये सत्तेवर असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जेमतेम अस्तित्व उरले आहे, तर सात जागांवर असणाऱ्या भाजपच्या गोटात ५७ नगरसेवकांची ताकद आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही ताकद वाढविली आहे. त्यामुळे, महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना असाच सामना होणार असून, त्या दृष्टीनेच या प्रभागरचनेकडे पाहण्यात येत आहे.

नवी मुंबई महापालिका ही राज्यातील महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी एक मानली जाते. दोन दशकांत शहराच्या लोकसंख्येत आणि शहरीकरणात प्रचंड वाढ झाली असून त्यामुळे महापालिका निवडणुकीचे महत्त्व वाढले आहे. कोरोनाच्या महासाथीमुळे तब्बल पाच वर्षे लांबलेली ही निवडणूक आता डिसेंबरनंतर होण्याची शक्यता आहे. निवडणूक विभागाने २२ ऑगस्ट रोजी १११ प्रभागांचा प्रारूप आराखडा जाहीर केला. मात्र या आराखड्यावरून सध्या राजकीय वादळ उठले आहे.

वादग्रस्त प्रभागरचना

राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रभाग निश्चित करताना भौगोलिक एकसंधता, सामाजिक सुविधा आणि लोकसंख्येचा समतोल राखणे बंधनकारक आहे. परंतु जाहीर झालेल्या आराखड्यात हे निकष पूर्ण न झाल्याचा आरोप होत आहे. प्रभाग क्रमांक २४, २५ आणि २६ मध्ये अधिसूचना व नकाशे विसंगत असल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

प्रभागरचनेत अनेक भाग कृत्रिमरीत्या फोडून इतर प्रभागांना जोडण्यात आल्याच्या तक्रारी होत आहेत. सीवूड्स परिसरात मैदान, झाडी, पाण्याच्या पट्ट्यांमधून रेषा आखून प्रभाग विभागले गेले. सेक्टर ४०, ४२ आणि केंद्रीय विहार बेलापूरऐवजी नेरूळमध्ये टाकल्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

तुर्भे-दिघा भागात बदल

तुर्भे परिसरातील १४ गावे नव्याने तयार झालेल्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये समाविष्ट झाली आहेत. परिणामी या प्रभागाची लोकसंख्या ४४ हजारांवर पोहोचली आहे. माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांच्या मते, हा प्रभाग सध्याच्या लोकसंख्या समतोलाच्या तत्त्वांना छेद देणारा आहे. दिघा परिसरात प्रभाग क्रमांक ४मधील तब्बल ८० टक्के भाग फोडून प्रभाग क्रमांक १ला जोडण्यात आला आहे. “तक्रारींमध्ये वेळ न घालवता आम्ही थेट लढण्याचा मार्ग स्वीकारू,” अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक नवीन गवते यांनी दिली. ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे या परिसरातील प्रभागही पॅनेल पद्धतीमुळे फुटले आहेत.

पूर्वीचे दहा हजारांच्या आतील मतदारसंख्या असणारा प्रभाग चार सदस्यीय पॅनेलमुळे आता चाळीस हजारांमध्ये गेला आहे. त्यामुळे निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांना प्रचारासाठी शेजारच्या प्रभागातही धावपळ करावी लागणार आहे. तुर्भे परिसराला कल्याण तालुक्यातून नव्याने आलेल्या १४ गावांचा समावेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि भाजपच्या उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. पण या गावातील राजकीय परिस्थिती शिंदे यांच्या शिवसेनेला पोषक असल्याने या प्रभागातील शिंदे गटाच्या उमेदवारांना फायदा होऊ शकतो. तसेच, नवीन विकासकामे, रस्ते, उड्डाणपूल, डोंगरांवर खोदकाम अशी कोट्यवधी रुपयांची कामे विजयी होणाऱ्या नगरसेवकांना मिळेल, अशी चर्चा सुरू आहे.

महायुतीत वाढता तणाव

प्रभागरचनेत झालेल्या बदलांमुळे स्थानिक पातळीवर फक्त विरोधकच नव्हे तर महायुतीतही तणाव वाढत आहे. भाजप नेत्यांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वारंवार टीका होत असल्याने शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील मतभेद उघड झाले आहेत. वनमंत्री गणेश नाईक यांनी नाव न घेता ठाण्याच्या नेत्यांवर सडकून टीका केली. परिणामी शिंदे गटात नाईकांविरोधात नाराजी पसरली आहे. महायुतीत एकत्र लढायचे की वेगवेगळे, याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महायुतीमध्ये वाद सुरू असताना त्याच फायदा घेण्याऐवजी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या ठाकरे गटात अंतर्गत वादामुळे दुफळी माजली आहे. ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे यांच्या कार्यपद्धतीवर ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल मोरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. आता पक्षात चार माजी नगरसेवक उरले आहेत.

दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे तीन माजी नगरसेवक आहेत. पण त्यांच्यात एकसूत्रता नसल्याने अद्याप पक्षाला सूर गवसलेला नाही. नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ‘सिडको’वर मोर्चा काढून पक्षाला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे खरा. पण त्याचा परिणाम निवडणुकीपर्यंत राहील का, ही साशंकता आहे. काँग्रेस हा एकेकाळी नवी मुंबईचा भक्कम विरोधी पक्ष मानला जात होता. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर काँग्रेसने नवीन जिल्हाध्यक्ष दिल्यानंतर काँग्रेसचे राजकारण वेग घेऊ शकलेले नाही. पक्षातून अनेक ज्येष्ठ नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेसमध्ये एकाच माजी नगरसेवकाची ताकद असून, अखेरची घरघर लागली आहे.

गणेश नाईक विरुद्ध शिंदे

महापालिकेच्या राजकारणात नवी मुंबई म्हटले की गणेश नाईक यांचे नाव अपरिहार्य आहे. गेली अनेक वर्षे महापालिका नाईकांभोवती फिरत आली आहे. पण आता शिंदे गटातील नेते हे समीकरण मोडण्याच्या प्रयत्नात आहेत. राज्यात सत्ता आल्यानंतर शिंदे गटाचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. बेलापूर आणि ऐरोली विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करून ताकद दाखवली होती. नगरविकास विभागाच्या ‘आशीर्वादा’ने महापालिकेतील कंत्राटे आणि विकासकामे मिळविण्याच्या शर्यतीत शिंदे गट पुढे गेल्याची चर्चा आहे.

त्यामुळे भाजप नेत्यांमध्ये नाराजी आहे. प्रत्युत्तरादाखल भाजपकडून शिंदे गटातील नेत्यांवर कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले जात आहेत. या वादातून थेट महायुती तुटण्याच्या उंबरठ्यावर आल्याचे मानले जाते. ऐरोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाची ताकद भाजपच्या तुल्यबळ वाढलेली आहे.

मात्र अंतर्गत गटबाजी न टाळल्यास पुन्हा भाजपच्या नगरसेवकांची सरशी होईल. बेलापूर मतदारसंघातही भाजपच्या तुलनेत शिंदे गट पक्षप्रवेश करून नगरसेवकांची मोठी फळी उभी करण्याच्या प्रयत्नात आहे. असे झाल्यास भाजपचा विजयरथ रोखण्यात महाविकास आघाडीपेक्षा शिंदे गट मोठी भूमिका बजावेल.

प्रभागपद्धती कोणाच्या पथ्यावर?

या निवडणुकीत पहिल्यांदा चार सदस्यांच्या प्रभागनिहाय निवडणूक लढवली जाणार आहे. २२ ऑगस्टला जाहीर झालेल्या आराखड्यात अनेक जुन्या प्रभागांचे तुकडे होऊन नवे प्रभाग तयार झाले आहेत. भाजप, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यातर्फे यावर आक्षेप घेण्यात येत आहे. मात्र शिंदे गटातील नेते सध्या मौन बाळगून आहेत. त्यामुळे ही रचना त्यांच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जाते. भाजपच्या प्रस्थापित नगरसेवकांना याचा फटाका बसण्याची दाट शक्यता आहे. तरीही बरेच नगरसेवक निवडणुकीच्या तयारीवर लक्ष केंद्रित करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे सध्या एकाच माजी नगरसेवकाची ताकद आहे. पण तरीही त्यांनी नव्या प्रभागरचनेवर आक्षेप घेतला आहे.

मतभेद चव्हाट्यावर

“आम्हाला महायुती म्हणून निवडणूक लढवायची आहे. परंतु भाजप नेत्यांकडून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सातत्याने टीका केली जाते. गरज पडल्यास स्वतंत्र लढण्याचा विचार करू शकतो,” अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी दिली. तर “स्थानिक स्वराज्य संस्थेत एकत्र लढायचे की वेगवेगळे, हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. पण नवी मुंबईत भाजपची ताकद जास्त आहे.

महापौरपद आमच्याकडे होते. त्यामुळे गरज पडल्यास आम्ही स्वबळावर सत्ता आणू शकतो,” असे प्रत्युत्तर भाजपचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे सध्या नवी मुंबईत महायुतीमध्येच एकमेकांविरोधात जोरदार टक्कर बघायला मिळत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होण्याऐवजी शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप असा कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.

प्रभाग रचनेतील वाद, अंतर्गत मतभेद आणि सतत बदलणारे पक्षीय बल या सगळ्यामुळे आगामी निवडणूक ही केवळ प्रभागांपुरती न राहता राज्य पातळीवरील राजकीय समीकरणांची चाचणी ठरणार आहे. नागरिकांच्या अपेक्षा मात्र साध्या आहेत, त्या म्हणजे - विकासकामे, सुविधा आणि पारदर्शक प्रशासन. हे ध्येय राजकीय लढतीत हरवू नये, हीच खरी कसोटी ठरणार आहे.

पक्षांची बदलती गणिते

२०१५   

  • राष्ट्रवादी काँग्रेस - ५२

  • काँग्रेस - १०

  • शिवसेना - ३८

  • भाजप - ०७

  • अपक्ष - ०५

२०२५ (पक्षप्रवेशांनंतर)   

  • भाजप - ५७

  • शिवसेना (शिंदे गट) - ४३

  • शिवसेना (ठाकरे गट) - ०५

  • राष्ट्रवादी (अजित पवार गट) - ०१

  • राष्ट्रवादी (शरद पवार गट) - ०३

  • काँग्रेस - ०१

  • अपक्ष - ०१

(ही आकडेवारी २०१५मधील माजी नगरसेवकांची आहे)

या आकडेवारीवरून दिसते की, गेल्या दहा वर्षांत भाजपने आपली ताकद प्रचंड वाढवली आहे. मात्र अलीकडील काँग्रेस, राष्ट्रवादी पवार गटातील अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेना (शिंदे गट) भाजपला सदस्यसंख्येत मागे टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येते.

निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यानंतर आणखी काही माजी नगरसेवक पक्षात येणार असल्याचा दावा शिवसेनेच्या शिंदे गटामार्फत केला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नवी मुंबईत फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येणार आहे, हे राजकीय जाणकारांच्या मते निश्चित मानले जात आहे.

(Edited by: Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT