
ठाणे जिल्हा हा पारंपरिकरीत्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा येथे प्रभाव आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या परिसरात मजबूत पकड आहे. शिंदेंचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातच कल्याण-डोंबिवलीचा समावेश आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेची कसोटी आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना आणि भाजपने मिळूनच पालिकेत सत्ता राखली आहे. मात्र, शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. शिंदे यांच्या शिवसेनेने सत्ताधारी म्हणून पक्षात अनेक माजी नगरसेवकांना सामील करून आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. तरीही गटबाजी, स्थानिक नाराजी आणि भाजपशी वाढत्या मतभेदांमुळे शिंदे गटासाठी ही निवडणूक सोपी राहणार नाही.
भाजपने गेल्या दशकात कल्याण-डोंबिवली परिसरात संघटनशक्ती वाढविण्यावर भर दिला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांचे नेतृत्व हा पक्षाचा येथे मोठा आधार आहे. राज्यात सत्तास्थानी असल्याचा लाभ घेत पक्ष प्रचार योजनेत प्रशासकीय अनुभवाचा उपयोग करताना दिसत आहे. चव्हाण यांनी अलीकडच्या भाषणात ‘भाजपचा महापौर बसलाच पाहिजे’ असा आत्मविश्वास दाखवून, गरज पडल्यास पक्ष स्वतंत्रपणेही निवडणूक लढवेल, असा संकेत दिला. या वक्तव्यामुळे शिंदे गट आणि भाजप यांच्यातील सूक्ष्म अन् सुप्त संघर्ष आता उघड झाला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने डोंबिवली-कल्याण परिसरात भावनिक लाट निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. स्थानिक नाराजी, पायाभूत सुविधा आणि सत्ताधाऱ्यांवर टीका या मुद्द्यांवर ठाकरेंची शिवसेना मतदारांना भिडण्याचा प्रयत्न करतो आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) स्थानिक प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेतली असून, काही प्रभागांमध्ये संघटित मतदारगट निर्माण केला आहे.
प्रभाग पद्धतीमुळे मनसेला मतांचे संकलन करण्यासाठी अधिक संधी मिळू शकते. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा यशस्वी झाली तर आगामी निवडणुकीची समीकरणे पूर्ण बदलू शकतात. या परिसरात लहान पक्ष आणि अपक्षांचा प्रभावही दुर्लक्ष करण्याजोगा नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांचा प्रभाव गेल्या काही वर्षांत कमी झाला असला तरी, स्थानिक पातळीवरील माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा प्रभाव कायम आहे. अपक्ष उमेदवार प्रभाग पद्धतीचा फायदा घेत पॅनेलप्रमाणे उभे राहून ‘किंगमेकर’ ठरू शकतात. प्रभाग पद्धतीत मतदारांना एकत्रित पद्धतीने मतदान करावे लागणार असल्याने स्थानिक पातळीवर लोकप्रियता असलेले उमेदवार पक्षनिष्ठेसह महत्त्वाची भूमिका बजावतील. प्रभागांत पक्षांसाठी योग्य उमेदवारांची निवड करणे, त्यांना तयार करणे हीच खरी कसोटी असेल.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत प्रभाग पद्धतीने होणाऱ्या या पहिल्या निवडणुकीत स्थानिक राजकारणाच्या रंगमंचावर नव्या समीकरणांचा खेळ होणार आहे. भाजपची संघटनशक्ती आणि सत्ता, शिंदे गटाची मजबूत फळी, ठाकरे गटाची भावनिक लाट, मनसेची स्थानिक ताकद, आणि अपक्षांची चतुराई या सर्वांमध्ये कोण सरस ठरेल, त्यातून आगामी पाच वर्षांसाठी शहराचे भविष्य ठरेल. कल्याण-डोंबिवलीसारख्या जलद वाढणाऱ्या शहराला योग्य नेतृत्व देणे हीच या सर्व पक्षांसमोरील खरे आव्हान आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत एकूण १२२ जागा असणार आहेत. यासाठी शहराची विभागणी ३१ प्रभागांमध्ये करण्यात आली आहे. या पैकी २ प्रभाग हे ३ सदस्यीय असतील तर उर्वरित २९ प्रभाग हे चार सदस्यीय असतील. महापालिका क्षेत्रातील एकूण लोकसंख्या १५ लाख ५० हजार १७१ आहे.
42 हजार 584
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.